निर्जलीकरण का ?
कृत्रिमरित्या नियंत्रित तापमानात अत्यंत आरोग्यदायी पद्धतीने शेतमालावर निर्जलीकरणाची प्रक्रिया करता येते हा शोध औद्योगिक क्रांतीनंतर कल्पक संशोधकांनी लावला आणि त्यातुन अवाढव्य प्रकल्प उभे राहीले
संजय सोनवणी
भारतामध्ये दरवर्षी ५८००० कोटी मुल्याच्या फळ-पालेभाज्या आणि फळे वाया जातात. हा झाला सरकारी आकडा..प्रत्यक्षात त्याहीपेक्षा कितीतरी पटीने वाया जाण्याचे प्रमाण आहे. याला मुख्यत्वे कारण आहे प्रक्रिया उद्योगांचा आणि शीतगृहांचा अभाव. एकुण उत्पादनापैकी २ ते ३ % पेक्षा अधिक शेतमालावर प्रक्रिया होत नाही. प्रक्रिया अनेक पद्धतीने होवू शकतात…पण त्या अत्यंत महागड्या असल्याने (उदा. डीप फ्रीझिंग) अंतत: त्याच्या किंमती अवास्तव वाढतात व त्याला हवी तशी बाजारपेठ मिळत नाही.
निर्जलीकरण ही सर्वांच्या परिचयाची, मानवाने हजारो वर्षांपुर्वी शोधलेली प्रक्रिया आहे. आपण रोज कितीतरी निर्जलीकृत पदार्थ आहारात रोज वापरत असतो. धने असोत कि हळद, सुके मासे असोत कि वाटाण्यादी कडधान्ये. अर्थात ती उन्हात उघड्यावर वाळवलेली असतात. पण त्यामुळे ती हायजिनिकही नसतात. सुदैवाने भारतात सुर्यप्रकाशाची कमतरता नाही. पण वेळोवेळी होणारे वातारणीय बदल, अवेळी पाऊस आदी कारणांनी केवढे फटके बसतात हे दरवर्षी बघत असतो. त्यामुळे वाया जाणारा माल ही राष्ट्रीय आणि व्यक्तिगत संपत्तीचा नाशच असतो. शिवाय साराच शेतमाल उन्हात वाळवता येत नाही.
कृत्रिमरित्या नियंत्रित तापमानात अत्यंत आरोग्यदायी पद्धतीने शेतमालावर निर्जलीकरणाची प्रक्रिया करता येते हा शोध औद्योगिक क्रांतीनंतर कल्पक संशोधकांनी लावला आणि त्यातुन अवाढव्य प्रकल्प उभे राहीले. भारतात उन्हात वाळवणी सोडली तर नवे आर्थिक धोरण येईपर्यंत हे तंत्रज्ञान आले नव्हते. अजुनही ते अत्यंत मर्यादित आहे. याचे खरे कारण म्हणजे त्यांनी युरोपियन तंत्रज्ञान जसेच्या तसे येथे वापरण्याचा प्रयत्न केला. भारतातील वातावरणीय परिस्थिती, ठिकठिकाणचे बदलते वायुमान, हवेतील आद्रता, तापमान याचा विचारच केला नव्हता त्यामुळे अनेक कारखाने बंद पडले. काहींचे हेतुही प्रामाणिक नव्हते. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे मुळात अत्यंत साधे – सोपे असणारे हे तंत्रज्ञान पुरस्कृत केले गेले नाही…सरकार यात मागे पडले.
शेतमालाचा विनाश तसाच चालु राहिला. आणि आजही आपण बदललो नाही तर तो तसाच सुरू राहील. निर्जलीकरणामुळे शेतमालाचे आयुष्य तर वाढतेच (किमान २ वर्ष) पण वजनही कमी झाल्याने वाहतुकीचा खर्च कमी होतो. चवीतही वाढ होत असल्याने ती जनसामांन्यात लवकर लोकप्रिय होवू शकतात.
यावर होऊ शकते निर्जलीकरण
१. कोथिंबीर ते सर्व पालेभाज्या, फळभाज्या, टोमॅटो ते सर्व प्रकारची फळे, मांस- मासे इत्यादी
प्रत्येक पदार्थासाठीच्या प्रक्रियेत थोडाफार फरक असतो. पण शक्य तेवढ्या शेतमालावर गावोगावी छोट्या निर्जलीकरण प्रकल्पातुन प्रक्रिया करणे.
२. स्थानिक रोजगार वाढवणे.
३. एक पातेही/फळही फेकुन द्यावे लागणार नाही याची कालजी घेणे.
४. बाजारभाव आपसुक नियंत्रित करणे. (बाजारभाव उत्पादन किंमतीपेक्षा कमी असले तर एक किलोही ताजा माल बाजारात न पाठवणे.)
५. प्रक्रियायुक्त मालाचे विपणन करण्याची यंत्रणा उभारणे.
६. शेतमालाची एकुणातील मुल्यवृद्धी साधणे.
यातुन शेतकऱ्यांना मोठेच आर्थिक बळ मिळेल. गावोगावी (वा ४ ते ५ गावे मिळुन एक) असे प्रकल्प उभे झाले तर मोठी शेतकी क्रांती घडू शकते. हे तंत्रज्ञान खरोखर खुप सोपे आहे. मोठ्या भांडवलाची गरज नाही. कुशल तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही.
आपल्याला जर खरी शेतकी क्रांती घडवायची असेल, शेतकऱ्यांना दैन्यावस्थेतुन बाहेर काढायचे असेल तर हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. एक लक्षात घ्या निर्जलीकृत शेतमालाला जगभर मागणी आहे. असंख्य पदार्थ आपण रोज आहारात वापरत आलेलोच आहोत. निर्जलीकरण केल्याने मुळ चवीत कसलाही फरक पडत नसून उलट त्यात वाढच झालेली असते. नियंत्रित वातावरणात उत्पादन केल्याने ताज्या मालापेक्षा हे निर्जलीकृत पदार्थ कैक पटीने आरोग्यदायी असतात. निर्जलीकरण म्हणजे अन्य काही नसून फळ-पालेभाज्यांतील अतिरिक्त जल आपण नियंत्रित तापमानात काढुन घेत त्याचे आयुष्य वाढवत असतो. त्यात कसलेली अन्य द्रव्य मिसळावे लागत नाही. त्यामुळे ते जसेच्या तसे शुद्ध रहात असते. दिवसा १ टन ते १० टन कच्च्या मालावर प्रक्रिया करता येईल असे लघु प्रकल्प अधिक यशदायी ठरतील.