नारळ फळपिकातील महत्त्वाचे रोग व नियंञण 🌴
( सौजन्य – कृषिसमर्पण समुह )
🌴 करपा:
काहीवेळा पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो, यामुळे पानावर लालसर-तपकिरी रंगाचे ठिपके पडून पाने पिवळी होतात, असे ठिपके पक्व पानावर अधिक असतात. सुरवातीला आकाराने लहान असणारे ठिपके मोठे होतात आणि एकमेकांत मिसळतात. परिणामतः संपूर्ण पान करपून जाते, त्यामुळे माड कमकुवत होऊन उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
उपाय : हा रोग पाण्याच्या आणि खताच्या कमतरतेमुळे बळावतो, म्हणून पावसाळ्यानंतर बागेला नियमित पाणी द्यावे. शेणखत आणि रासायनिक खते योग्य प्रमाणात द्यावीत. पावसाळ्यापूर्वी रोगग्रस्त माडावरील करपलेल्या झावळ्या काढून माडाच्या निरोगी झावळ्यांवर 1 टक्के तीव्रतेचे बोर्डो मिश्रण अथवा 2 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
🌴 फळगळ:
हा रोग कोवळ्या फळांच्या देठावर होतो, त्यामुळे फळे गळतात. सुरवातीला काही वेळेला नारळाच्या झाडांना फळ धरण्यासाठी मादी फुलांना नरफुलातील पुकेसर न मिळाल्याने फळांची नैसर्गिक गळ होते, परंतु काही वेळा बुरशीजन्य रोगांमुळेही फळगळ होते.
उपाय : यासाठी 1 टक्का बोर्डो मिश्रणाच्या दोन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने कराव्यात. पहिली फवारणी पावसाळ्याच्या सुरवातीला व त्यानंतरची फवारणी एक महिन्यानंतर करावी. नारळाच्या फळांची गळ प्रामुख्याने उंदरांच्या प्रादुर्भावाने होते. उंदीर कोवळी फळे पोखरतात. उंदरांच्या बंदोबस्तासाठी झावळ्या स्वच्छ ठेवाव्यात. औषध दिल्यानंतर 45 दिवस नारळ काढू नयेत, तसेच नारळास 10 किलो निंबोळी पेंड, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम व कॉपर ही अतिसूक्ष्म अन्नद्रव्ये 200 ग्रॅम प्रति झाड दर वर्षी द्यावीत.
🌴 कोंब कुजणे:
हा रोग मुख्यतः नदीकिनारी असणारी झाडे, समुद्रकिनाऱ्यालगतची झाडे तसेच पर्वत आणि दरीत असणाऱ्या झाडांतही मोठ्या प्रमाणात आढळून येतो. हा रोग झाला असेल तर लहान रोपांचे नुकतेच उमलत असलेले पान मलूल दिसते. असे पान बाहेरील बाजूवर हलक्या हाताने दुमडून पाहिल्यास पान नरम पडलेले दिसते. यावरून रोगास सुरवात झालेली आहे असे समजते.
उपाय : नदीकिनारी नारळाची लागवड करावयाची झाल्यास पावसाचा जोर ओसरल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. उघडीप मिळेल त्या वेळी एक टक्का बोर्डो मिश्रणाची सर्व रोपांवर फवारणी करावी मोठया झाडांसाठी कुजलेला संपूर्ण भाग काढून झाल्यावर त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. पावसाच्या सुरवातीस पाच ग्रॅम मॅन्कोझेब प्लॅस्टिक पिशवीत घेऊन त्याला टाचणीच्या साह्याने छिद्रे पाडावीत. अशा दोन पिशव्या नारळाच्या सुऱ्याजवळ झावळीला बांधाव्यात.
( सौजन्य – कृषिसमर्पण समूह )