रचना यांची ही आत्मचिंतन करायला लावणारी कविता अन् त्यावर नांदेड येथील छाया बेले यांनी केलेली स्पष्टीकरण…
सकाळी सकाळी
गुलाबजलची बाटली
साफ करण्यासाठी
सवयीनं
लिक्विड सोप ओतलं
प्रत्येक बाटली
साफ करताना वापरतात तसं
अन काळजात चर्रर्र झालं …
गुलाबाच्या मंद सुगंध
मिटविण्यासाठी
रसायनाचा वापर
अगदी
खूप सारं
प्रेमाच चॅट
डिलीट फॉर एव्हरीवन
किंवा क्लिअर चॅट
केल्यासारखं
गुलाबाचा सुगंध संपूर्णतः
मिटवण्याचा प्रयत्न …
इतके कृतघ्न आपण
स्वतःचा आत्मा
डिजीटल करून घेताना
नैसर्गिक गुलाबी सुगंध
कायमचा निकालात काढत
सेंद्रियत्व हरवून
आम्ही होतोय
रासायनिक
मुळासकट साफ करत
व्हाईट कॉलर क्लिअर
अन डिजिटल
एका क्लिकवर
माणसा सकट सारंच डिलीट करत
भावनाशून्य होत …
करतोय का आम्ही
आमचं जगणं सुकर
की होतोय
दिवसेंदिवस
मनोरूग्ण …
कवयित्री – रचना
सध्याचा काळ हा एवढ्या वेगाने धावतोय की बघून उर दडपून जातो. या पंचवीस वर्षांत म्हणजे मोबाईल फोन आल्यानंतर त्याचे मानवी जीवनावर झालेले परिणाम कवयित्री रचनाने अगदी अचूकपणे टिपले आहेत. आपण मुकाटपणे सोसत असलेलं दुखणं कोणीतरी लक्षात आणून देतं तेव्हा त्यातली तीव्रता नव्याने जाणवते. असंच काहीसं ही कविता वाचून जाणवलं. मानवी जीवनाला कृत्रिमता किती भयावह पद्धतीने विळखा घालून बसली आहे.कुठे गेला तो अस्सल जगण्याचा काळ ? आज सगळंच भासमय झालं आहे. जो तो स्वतःत मग्न झाल्यासारखं वाटतं पण हे तरी खरं आहे का ? तर नाही असंच उत्तर मिळेल. माणूस स्वतःच्याही जवळ नाही. तो दुरावला आहे स्वतःपासून, इतरांपासून. माणूस भासात हरवत चालला आहे. सुखाचे दुःखाचे फक्त भास !!
खरोखर आनंदाने उर भरून येणं, किंवा काळजात चर्रर्र होण्याची जी अनुभूती असायची ती आता कमी होत आहे किंवा ती शिल्लक आहे का अशी ही शंका येते.
फुलांचे आकर्षक ईमोजीच्या काळात आपण फुलांचा गंध विसरत चाललो आहोत. धो धो कोसळणाऱ्या आभासी पावसाच्या रिळ बघताना विसरून जातो की आपण पावसात चिंब भिजल्याला किती काळ लोटला आहे. फुल्ल मेकप करून तयार केलेले जोडप्यांचे रोमॅंटीक व्हिडिओ बघत असताना आपल्या जोडीदाराचा चेहरा निरखून कधी बघितला हेही लक्षात राहत नाही.
तीस पस्तीस वर्षांपूर्वीचा तो पत्रांचा काळ. त्यासोबत दुरवरून वाहत येणारा जिव्हाळा, काळजी ते हाती पडल्यावरचा आनंद काही औरच असायचा.
आता सगळं अस्पर्शित. भावनारहीत. माणसाच्या हातून जगण्याचा गाभाच निसटून कुठेतरी हरवला आहे. नुसतं फोलफट हातात घेऊन धावत असताना आतली अस्वस्थता लपविण्यासाठी सुखी असल्याचा अभिनय सुरू आहे. अस्वस्थ भवताल बघून मनाची होणारी घालमेल कवयित्रीने या कवितेतून मांडली आहे.
आत्मा डिजीटल करून घेताना..
सेंद्रियत्व हरवून आम्ही होतोय
रासायनिक..
या ओळीतून आजच्या काळाचं वास्तव नेमकेपणानं मांडलं आहे .
प्रेमाचं चॅट
डिलीट फॉर एव्हरीवन
किंवा क्लिअर चॅट केल्यासारखं
या ओळीतून आजच्या मानवी जीवनात घटित स्थित्यंतराची चपखल मांडणी रचनाने केली आहे. सगळंच मानवी संबंध त्यातल्या भावभावनांतील ओरिजनॅलिटी कुठेतरी हरवत चालली आहे. माणूस म्हणून त्याची पात्रता ही कमी होत आहे. सगळं जगणंच वरवरचं, यांत्रिक, दिखाऊ सजलेल्या बाजारपेठेसारखं !!
हे बघून संवेदनशील मन व्याकूळ झाले नाही तरच नवल !!
शेवटी जागे असणाऱ्यांनी ‘ जागते रहो ‘ म्हणून हाळी देत राहणं गरजेचं आहे.
रचनाच्या कविता नेहमीच आत्मचिंतन करायला लावणाऱ्या असतात पैकी अशीच एक मला आवडलेली कविता.
छाया बेले, नांदेड.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.