December 12, 2024
Pranpoli made form moha Vidharabha Kitchen Tradition
Home » मोहाची पोळी (मोहाची पुरणपोळी) – विदर्भाची खाद्यसंस्कृती
मुक्त संवाद

मोहाची पोळी (मोहाची पुरणपोळी) – विदर्भाची खाद्यसंस्कृती

विदर्भात पूर्वापार या मोह फुलाचा उपयोग आहारात केला जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मी बघितलेली उदाहरणे म्हणजे मोह फुले भाजून खाणे, मोह फुले टाकून पुरणपोळी तयार करणे, मोहफुलाचे लाडु तयार करणे. यातील मोहाच्या पुरणपोळीची आज आपण चर्चा करणार आहोत.

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जिल्हा वर्धा

आषाढ, आषाढात पडणारा रिमझिम पाऊस, त्यातही झडीचे वातावरण, आणी आषाढीचा (गुरुपौर्णिमा) सण. आषाढी (गुरुपौर्णिमा) ज्याला विदर्भात “अखाडी” म्हणून संबोधतात. हा तसा अक्षय तृतीयेनंतरचा पहिला सण विदर्भात या सणाला फार महत्त्व आहे. नवीन लग्न झालेल्या मुली या पहिल्या आषाढीचे दिवशी पतीच्या घरी राहत नाही. तर त्या माहेरी येतात. पेरणी, पेरणीची कामे आटोपलेली असतात. मग पहिल्या सणाला काही गोडधोड तर होणारच. ते म्हणजे पुरणपोळी. विदर्भात पुरणपोळी या पदार्थाचे विशेष महिमान आहे आणि उर्वरित महाराष्ट्र पेक्षा पोळी करण्याची पद्धतही वेगळी आहे. विदर्भाची पोळी ही घट्ट गोड पूर्ण पुरण भरलेली आणि फक्त तव्यावर राहावी एवढीच कणीक लावलेली असते. पूर्वी या आषाढीला मोहाच्या पोळीचा किंवा मग पुरणपोळीचा बेत असायचा आमच्या घरी आमची आजी आषाढीला मोहाचीच पोळी करायची जर आषाढीला करता नाही आली तर मात्र ती पावसाळ्यात एखादी झड पाहून नक्की करायची मला पुरणपोळी अजिबात आवडायची नाही मात्र मी मोहाची पोळी आवडीने दोनचार दिवस खायचो.

आता मोहाचे नाव काढले तर समोर येतात ती मोह फुले व त्या फुलापासून तयार होणारी दारू. मोह फुलापासून दारू तयार होते हे सर्वश्रुत आहे. पण या मोह फुलाचे अनेक गुणकारी उपयोग सुद्धा आहे. आदिवासी समाजात मोहाच्या झाडास कल्पवृक्षाचे स्थान आहे. मोहाच्या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. विज्ञानाने ही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. मोह फुलापासून अनेक पदार्थ तयार होतात. मोह फुलातील पोषक तत्त्वांचा उपयोग मानवी आहारात जास्तीत जास्त कसा करता येईल या करिता संस्थात्मक व शासकीय पातळीवर अनेक प्रयोग सुरू आहेत. जसे मोहा लाडू, मोह फुलापासून शरबत, मोहाच्या टोळीपासुन तेल इत्यादी.

मात्र विदर्भात पूर्वापार या मोह फुलाचा उपयोग आहारात केला जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मी बघितलेली उदाहरणे म्हणजे मोह फुले भाजून खाणे, मोह फुले टाकून पुरणपोळी तयार करणे, मोहफुलाचे लाडु तयार करणे. यातील मोहाच्या पुरणपोळीची आज आपण चर्चा करणार आहोत.

तर ही मोहाची पोळी करायची कशी? तर विदर्भात जे पुरण केलं जातं, ज्या पद्धतीने पुरणपोळी केली जाते. त्याच पद्धतीने ती करायची म्हणजे चणाडाळ त्यात पाहिजे त्या प्रमाणात गुळ व त्यात सुकलेल्या मोहाची फुले साफ करून टाकायचे. आता याचे प्रमाण किती तर जर अर्धा किलो चणाडाळ असेल तर त्याला अर्धा किलो म्हणजे समप्रमाणात गुळ व त्यात दीड वाटी सुकलेली साफ केलेली मोहाची फुले. (अगोदर हे माप शेरात अदलीत होतं) ही फुले या पुरणात टाकायची व चांगले शिजू द्यायचे व घरच्या पाट्यावर पुरणासारखे वाटायचे. आता मिक्सरमध्ये ही वाटता येईल. यामध्ये साखरही टाकता येते पण गुळाची पोळी चवीस छान लागते. पण आपण साखरही वापरु शकतो. ही पोळी तव्यावर तयार करताना मात्र पुरणपोळीला जसे तूप वापरतात तसे तूप न वापरता जवसाचे तेल वापरल्या जाते व ही पुरणपोळी तयार केली जाते. खाणाऱ्याला खातानाही तुपाऐवजी छोट्या वाटीत जवसाचे तेल दिले जाते व या जवसाच्या तेला सोबत खायला दिली जाते. या मोहफुलापासुन तयार केलेल्या पुरणाच्या पोळीची चव ही अप्रतिम असते. शिळी पोळी दह्यासोबत खायलाही मस्त लागते. आमची आजी दर आषाढीला नाहीतर वर्षात एकदा तरी न चुकता ही पोळी करायचीच. गेल्या पाच सात वर्षाची पोळी खायला मिळाली नसली तरी या पोळीची चव आजही जिभेवर सतत रेंगाळत असते. विदर्भाच्या खाद्य संस्कृतीतला हा अप्रतिम ठेवा आज हरवु पाहत आहे. त्याला जिवंत करणे व वृद्धिंगत करणे सहज सोपे आहे. आपल्या स्वीट डिशच्या यादीत एक पोषक पदार्थाची भर टाकणे सहज शक्य आहे तर चला मग एकदा तरी खाऊन बघूया. मोहाची पोळी. जी माझ्या आजीच्या स्वयंपाकघरातील माझ्यासाठी न विसरता येणारा ठेवा आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading