February 22, 2024
The Gita Shastra is received with earnestness
Home » गीता शास्त्र आस्थेने प्राप्त होते
विश्वाचे आर्त

गीता शास्त्र आस्थेने प्राप्त होते

सागरु गंभीरु होये । हे कोण ना म्हणत आहे ।
परी वृष्टि वायां जाये । जाली तेथ ।। १४९२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – समुद्र गंभीर आहे हे कोण नाही म्हणतो ? परंतु त्या सागरावर पाऊस पडला तर तो व्यर्थ जातो.

गीतेचे तत्वज्ञान समजण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी पात्रता असावी लागते. तरच ते समजते. मनाची योग्य स्थिती, एक अवस्था, मानसिक तयारी असावी लागते. कारण हे अनुभव शास्त्र आहे. अनुभुतीतून ते समजते. आत्मसात होते. मनाची योग्य स्थिती नसेल तर हे शास्त्र कधीही समजणार नाही. हजारो तपे केली, हजारो पारायणे केली पण मनाची स्थिती प्राप्त झाली नाही तर हे शास्त्र आत्मसात होणार नाही. हुशारी असूनही ती व्यर्थ आहे. हुशारीपेक्षा कौशल्य महत्त्वाचे आहे. मंत्र तोंडपाठ असून उपयोगाचे नाही तर ते मंत्र आपल्यात उतरायला हवेत. मनात, आचरणात यायला हवेत. तरच त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. अन्यथा सर्व व्यर्थ आहे.

यासाठीच गीता शास्त्र शिकण्याची कोणावरही सक्ती करू नये. गीता शास्त्र समजायला खूपच सोपे आहे. आत्मसात होण्यासाठीही खूप सोपे आहे. पण ते केंव्हा ? जर समजून घेण्याची मानसिकता नसेल तर ते कधीच समजणार नाही. हिंदू धर्म आणि संस्कृती व जगभरातील इतर धर्म अन् संस्कृती यामध्ये हाच मोठा फरक आहे. म्हणून भारता बाहेर आपल्या धर्माचा प्रसार झालेला नाही. धर्माची सक्तीही कोठे करण्यात आली नाही. हा धर्म, ही संस्कृती सक्तीने शिकवता येत नाही. तो आत्मसातही करता येत नाही. हे शिकलेच पाहीजे असा अट्टाहासही येथे नाही. पटले तर व्हय म्हणा, अन्यथा सोडून द्या असे हे तत्त्वज्ञान आहे. मानवाच्या कल्याणाचा विचार या तत्त्वज्ञानात आहे, पण तो समजण्यासाठी मनाची योग्य तयारी असावी लागते.

परकीय अनेक धर्म आपल्या देशात आले. त्यांनी त्यांच्या धर्माची सक्तीही केली. हिंदूंची मंदिरेही त्यांनी नष्ट करून त्यांच्या धर्माची सक्ती केली. इतिहासात याची अनेक उदाहरणे देता येतील. पण हिंदूंनी कोठे सक्ती केल्याचे आपणास आढळणार नाही. कारण हे शास्त्र, हे तत्त्वज्ञान सक्ती करून आत्मसात करता येत नाही. गीतेचा प्रसार करताना सक्ती करू नये. किंवा ज्याला शिकण्याची इच्छा नाही त्याला शिकवण्याचा प्रयत्नही करू नये. त्याची इच्छा होईल तेंव्हा तो आपोआप शिकले असे हे तत्त्वज्ञान आहे.

शेतात बी पेरताना जमिनीचा वाफसा महत्त्वाच आहे. तरच ते बी योग्य प्रकारे पेरले जाते अन् रुजते. अध्यात्माचे बी पेरताना, गीतेचे बी पेरताना तशी अवस्था असणे आवश्यक आहे अन्यथा ते बी वाया जाणार, रुजणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. समुद्रावर पाऊस पडून त्याचा काही उपयोग नाही. भूमीवर पाऊस पडला तर ते पाणी उपयुक्त ठरू शकते. त्याचा वापर होऊ शकतो. समुद्रावर पाऊस पडला तर खाऱ्या पाण्यात ते पाणी खारेच होणार. खाऱ्या पाण्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. यासाठी गीतेचे तत्त्वज्ञान योग्य व्यक्तीलाच सांगावे. तरच त्याचा फायदा होईल.

Related posts

इथरेल फवारणीचे चांगले परिणाम मिळण्यासाठी…

महिला ट्रेकर्सचे रोमांचक अनुभव कथन

त्या मुलीकडे पाहून मला उगीचच का भीती वाटावी ?

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More