June 25, 2024
review-of-guni-sobat-shikuya-pradnya-vaze-gharpure-book
Home » ‘गुणीसोबत शिकूया’ तून मनोरंजनातून मुलांचे ज्ञानवर्धन
मुक्त संवाद

‘गुणीसोबत शिकूया’ तून मनोरंजनातून मुलांचे ज्ञानवर्धन

खरं तर छोट्याछोट्या गोष्टीतून मुलांचे मनोरंजन होईल व ज्ञानवर्धनही होईल या बालसाहित्याच्या मुळ हेतूशी प्रामाणिक राहून प्रज्ञा वझे- घारपुरे यांनी या पुस्तकाचे लेखन व मांडणी केल्याचे पानोपानी जाणवते.

बसवराज कोटगी

इचलकरंजी

आदिमानवाच्या काळापासून माणसाने ज्ञानग्रहण करण्यास चित्र, रेखाचित्र या माध्यमांचा वापर केला. आजच्या आधुनिक युगातही ‘बोलकी चित्रे’ अर्थात कॉमिक्सची संकल्पना अफाट लोकप्रियता मिळवत आहे. मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तर आज विविध भाषेत कॉमिक्स उपलब्ध आहेत. – याच माध्यमाचा वापर करून मुलांचे सामान्य ज्ञान वाढावे, मुलांनी संस्कार शिकावे, अभ्यासाची गोडी वाढावी अशा पध्दतीची संकल्पना घेऊन लेखिका प्रज्ञा वझे- घारपुरे यांनी ‘गुणी सोबत शिकूया’ या पुस्तिकेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले आहेत. यातील ‘आपण कुठे आहोत, घरी येणारी माणसं’ हे भाग आता वाचकांसाठी उपलब्ध आहेत.

खरं तर छोट्याछोट्या गोष्टीतून मुलांचे मनोरंजन होईल व ज्ञानवर्धनही होईल या बालसाहित्याच्या मुळ हेतूशी प्रामाणिक राहून प्रज्ञा वझे- घारपुरे यांनी या पुस्तकाचे लेखन व मांडणी केल्याचे पानोपानी जाणवते. कोणताही फाफटपसारा न मांडता अगदी दैनंदिन बोलीभाषेचा वापर करून मुलांमध्ये वाचनाची व अवलोकनाची गोडी वाढावी असे लेखन या पुस्तिका मालिकेत झाले आहे.

प्रत्येक घरात एक गुणी बाळ मुलगा, मुलगी रूपाने असतेच. त्याचाच विचार करून बहुधा लेखिकेने ‘गुणी’ या पात्राची रचना केली आहे. पुस्तक गुणीसारख्याच हुशार, चुणचुणीत, उत्साही, उद्योगी आणि जिज्ञासू मुला-मुलींच्या अथक प्रश्नांना सहज भाषेत उत्तर देणारे हे मराठीतील पुस्तक वाचनीय आहे. सौरभ उपळेकर आणि कौस्तुभ -उपळेकर यांनी ‘गणी’ सह संवाद कथेतील इतर पात्रांचे रेखाटलेली चित्रे आपल्याच घरातील सदस्यांशी मिळती जुळती वाटल्याने पुस्तक वाचताना एक आपुलकी वाटते.

 ‘उजवा-डावा’ ,’पुढे-मागे’ हा आपल्याला रोज पडणारा प्रश्न किती सहजरित्या लेखिकेने समजावून सांगितला आहे. हे वाचताना लक्षात येते. ‘घरी येणारी माणसं’ या मालिकेत मुलांचे सामान्य ज्ञान कसे वाढवावे, लोकांची ओळख कशी करून द्यावी याचे शिक्षणच पालकांनाही मिळते. विनोदी पध्दतीने सहजज्ञान ग्रहण व्हावे असा लेखिकेचा हेतू असला तरी प्रसंगी पात्रांच्या तोंडी गंभीर प्रश्नही येतात. ‘कामवाली’ या पात्राचे, ओळख करून देताना शेवटी गुणीच्या तोंडी जो प्रश्न येतो तो भावनिक भाग सुंदर आहे.

‘आई’ सखु मावशीला ताप आला, तर तिच्या घरची कामं कोण करतं गं..? हा गुणीचा सवाल सर्वांनाच निरूत्तर करतो. एकंदरीत मुलांसाठी उपयुक्त अशी ही ‘गुणी’च्या संवाद कथा नक्कीच मुलांसह त्यांच्या पालकांना आवडण्यासारख्याच आहेत. लेखिकेचा सहज शब्दात लिहिण्याचा हातखडा असाच चालत राहावा व ‘गुणी’ च्या अनेक कथा वाचकांसमोर याव्यात याच शुभेच्छा! मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी, वाचन वाढावे यासाठी ‘गुणीसोबत शिकूया’ हे परिक्षण पुस्तक महत्वाचे व वाचनीय ठरते.

सुट्टीचे, सोहळ्यांचे दिवस जवळ येत आहेत. यावेळेस मुलांना एक वेगळी भेट द्यायची ? वाचनाकडे, थोडंसं अभ्यासाकडे घेऊन जायचं; पण त्यांना आवडेल अशा पद्धतीने! २ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी गुणीसोबत शिकूया हा एक मस्त पर्याय आहे ! या पुस्तक मालिकेत छोट्या छोट्या चित्रकथुल्यांमधून एकेका विषयाची हसत खेळत ओळख करून दिली आहे; ज्याने मुलांना मराठी पुस्तके वाचण्याची आवड निर्माण होईल. ‘घरी येणारी माणसं’ हे या मालिकेतील पहिलं पुस्तक. यात दूधवाले भैय्या, कामवाली मावशी, कुरियर दादा यांची ओळख करून देणाऱ्या आकर्षक, रंगीबेरंगी आणि मुलांना खिळवून ठेवणाऱ्या, कुतूहल जागवणाऱ्या अशा चित्रकथुल्या आहेत; ज्या कमीत कमी शब्दांत मुलांशी संवाद साधतात, त्यांचं आणि पुस्तकातल्या माणसांशी, गुणीच्या कुटुंबाशी नातं जोडतात. गुणीसोबत शिकूया – आपण कुठे आहोत ? या पुस्तकामधे स्थळ-दर्शक कथुल्या आहेत. पानभर चित्रं, एखाद-दुसरा संवाद, आणि तीन-चार पानांमधे एक गोष्ट सामावेल, अशाच प्रकारे याही पुस्तकाची रचना केली आहे. मुलं पाहता क्षणी चित्रांमधे रंगून जातील; त्यांना आपल्या परीने त्यातलं जग समजून घेऊ द्या. स्वतःच्या जगाशी त्यातलं सांधर्म्य शोधू द्या, चित्रांकडे बघत त्यांच्या त्यांच्या गोष्टी बनवून सांगू द्या. पालकांनी पुढे हळूहळू एकेक गोष्ट वाचून दाखवत मुलांची शब्दांशी, भाषेशी, पुस्तकातील गोष्टींची ओळख करून द्यायची आहे.

प्रज्ञा वझे – घारपुरे

पुस्तकासाठी संपर्क – 9480612643

पुस्तकाचे नाव – गुणीसोबत शिकूया.
संदर्भ बालसाहित्य, संवादकथा
लेखिका – प्रज्ञा वझे, घारपुरे
किंमत – १५० रू
मुद्रक – इम्प्रेशन्स, बेळगाव
पुस्तकासाठी संपर्क – 9480612643

Related posts

दु:खाला आवर घाल माणसा…

मोहाडी येथे मार्चमध्ये ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन

मराठीमध्ये विश्वाची भाषा बनण्याचे गुण

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406