July 21, 2024
save-food-from wastage-in-consolation
Home » सांत्वनाच्या जेवणाची नासाडी
मुक्त संवाद

सांत्वनाच्या जेवणाची नासाडी

     गावी एखाद्या घरातील व्यक्ती वृद्ध, आजारी, किंवा कोणत्यIही कारणाने मरण पावते तेव्हा त्या घरात  आजूबाजूचे वा बरेचसे शेजारी पाजारी तीन दिवस ते बारा दिवसापर्यंत आजूबाजूच्या गावातील सर्व नातेवाईक भरपूर जेवण आणून देत असतात. पण दररोज एक वा दोघांनी जेवण दिले तर ते पुरेसे असते. पण हे जवळ असून सुद्धा न सांगता एकाच वेळी चार पाच जण जेवण आणून देतात. आता प्रत्येक घरात चार पाचच माणसे असतात आणी त्यावेळी जास्त जरी असली तरी एवढे जेवण खाल्ले जात नाही किंबहुना संपत नाही मग ते रोज दोनतीन लिटर आमटी, मोठी दोन पातेली भात, आणि १० ते १५ भाकरी आणि भाजीसुद्धा गोबरग्यास मध्ये फेकले जाते किंवा दुसऱ्याच्या गोबरग्यासमध्ये टाकण्यासाठी दिले जाते.

ही अन्नाची नासाडी १० ते १२ दिवस होत असते आणि घरच्या दु;खातील लोकांना अन्न फेकण्याचे जास्तीचे काम लावले जाते हे पूर्ण चुकीचे आहे. बऱ्याच घरात भात भाकरी जनावरांना घातली जाते पण माणसांचे अन्न जनावरांना घालणे हे त्यांच्याही आरोग्याला घातक आहे. ही प्रथा अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात विशेषतः चंदगड तालुक्यात आणि करियादी भाग (हाडलगे, कोवाड, सामरे, कार्वे, ढोलगरवाडी, मलतवाडी आदी गावे) इकडे सर्रास चालू आहे. बऱ्याच तालुक्यात, गावात ही प्रथा बंद होऊन केवळ कोरडे साहित्य देतात. काही ठिकाणी फक्त तीन दिवस शेजारी जेवण आणून देतात. शहरात हे होत नाही म्हणून मी मुद्दाम गावी शब्द वापरला आहे.

मृत्यू झालेल्या घरात खरचं दुःख झालेले असते पण तीन दिवसानंतर जेवण करण्याइतपत सावरलेले असतात. घरचे लोक दु:खात असतात सांत्वन म्हणून शेजारी पाजारी, नातेवाईक जेवण आणून देतात हे बरोबर आहे. पण आपले जेवण जर खरेच त्या लोकांनी खाल्ले तरच तो हेतू साध्य होतो असे मला वाटते. नाहीतर उगाच सगळे देतात म्हणून किंवा प्रथा आहे म्हणून ते जेवण देऊन उपयोग नाही. गल्लीतलेच लोकं असतात तर दररोज त्यांचे बोलणे होतच असते तर एकमेकांसी बोलून ठरवून दररोज केवळ एकदोघांनी जेवण दिले तर खरेच ते जेवण वाया जाणार नाही असे मला वाटते.

या डिजिटल युगात साधा मेसेज करुन ही गोष्ट शिकलेली लोकं सहज करू शकतात. आपण त्या घरातल्या लोकांना खरेच खाऊ घालावे त्यांच्या दुखात सहभागी व्हावे असे वाटते तर घरी जावून सांगून यावे कि मी आज जेवण देते करू नका. कारण काही घरात देतात कि नाही म्हणून जेवण घरात पण केले जाते. पूर्वी गरिबी होती म्हणून सर्व जेवण खाल्ले जायचं पण आता ती  परिस्थिती राहिली नाही याचा लोकांनी जरूर विचार केला पाहिजे. गल्लीतल्या लोकांचे ठीक आहे ते एवढे जास्त देत नाहीत किंवा ते तीन दिवसा पुरते असते म्हणून समजू शकतो. पण दुरून येणारे नातेवाईक एक १०-१२ माणसांचे जेवण अख्खा दिवस खर्च करुन भाताचे मोठे पातेले, भाकरी, भाजी, आमटी मोठी किटली भरून  गाडीवरून/ गाडीतून घेवून येतात आणि तेही एकाच दिवशी ४-५ जण मग ते जेवण कसे संपेल? आता प्रत्येक घरी नव्हे, प्रत्येकाकडे भ्रमणध्वनी असतो तर घरातल्या मुख्य माणसाना कसे सांगायेचे असे वाटत असेल तर इतर मुलांना/ लोकांना फोन किंवा संदेश देवून सांगू शकतो. पण अजूनही लोक बाकीच्यांनी दिले मग आपण कसे रहायचं असे म्हणन आणून देतात मग ते नाही खाल्ले तरी चालेल. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहींत पण एका फोनवर जर १० माणसांच्या अन्नाची नासाडी व त्यापाठीमागचे कष्ट वाचत असेल तर का पर्याय वापरू नये.  

घरातील बायका अगदी पहाटे उठून हे अधिकचे जेवण करत असतात अधिकची त्यांची शेतीतील कामे असतात. त्यामुळे त्यांनी एवढ्या कष्टाने केलेले जेवण नाही खाल्ले तर त्यांचे श्रम आणि जेवण दोन्हीही वाया जाते. सध्याच्या महागाईच्या काळात एवढे अन्न फेकणे कोणालाच परवडत नाही. याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. कारण दु:खाच्या घरात ५/६ माणसे असतात आणि जेवण १०-२० माणसांचे संपणार तरी कसे? हे उरलेले अन्न फेकताना बघून खूप दु:ख होते कारण आपल्या देशात रोज कितीतरी गरीब लोक भुकेने मरतात.

बऱ्याच गरीब लोकांना रोजचे दोन वेळ पोटभर जेवण मिळत नाही. हे सर्व बघून आमच्यासारख्या शहरातील लोकांनी काही तरी सल्ले दिले तर ते ऐकलेही जात नाहीत. घरच्या शेतातील धान्य असते म्हणून खेड्यातील लोकांना त्याचे काहीही वाटत नाही. अर्थात काही लोक अपवाद असतीलही पण सर्रास असे खेड्यात घडत असते. पूर्वी संवाद माध्यमे नसल्यामुळे सांगता येत नव्हते पण आता भ्रमणध्वनीच्या काळात हे सहज शक्य आहे. त्या घरच्या लोकांना एक संदेश देवून किंवा इतर नातेवाईकाना आपापसांत फोन करुन ही अन्नाची नासाडी नक्कीच टाळता येणे शक्य आहे. खेड्यातून अजूनही बऱ्याच घरांमधून शीतपेटी (फ्रीज) नसल्यामुळे शिल्लक अन्न फेकावेच लागते. त्यामुळे नातेवाईकांनी शिजवलेले अन्न देण्यापेक्षा कच्चे डाळ-तांदूळ, भाज्या, गुळ ई. साहित्य दिले तर उत्तम. शेवटी ‘कालाय तस्मे नमः’ या संस्कृत उक्तीनुसार लोकांनी काळानुसार  बदलले पाहिजे हेच खरे. 

हे करता येणे शक्य आहे…

  • शिजवलेले अन्न देण्याचे टाळून केवळ कच्चे डाळ-तांदूळ, भाज्या, गुळ ई. साहित्य द्यावे.
  • द्यायचेच असेल घरातील कोणलाही फोनवर विचारून द्या किंवा त्याची कल्पना तरी द्या.
  • इतर कोणी देत असेल तर दुसऱ्या दिवशी द्यावे.
  • सकाळी किंवा संध्याकाळी हे सुद्धा स्पष्ट करा म्हणजे ताजे जेवण मिळेल.    
  • एकाच घरातील वेगळे झालेले चार भाऊ आपापसांत चर्चा करुन एक एक पदार्थ पुरेसा बनवावा.
  •  एकाच दिवशी सर्व मिळून येत असाल तर एकानेच कोण तरी शिजवलेले अन्न द्यावे आणि मी आज देत आहे तुम्ही देऊ नका असे मोकळे बोला. कारण फोनवर इतर गप्पा होताच असतात.    

सरीता सदानंद पाटील,
वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे.    
         


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

परब्रह्माच्या विकासासाठी विषय वासनेच्या शेंड्याची छाटणी

स्त्री भ्रुण हत्या थांबून मुलीचे स्वागत व्हावे या उदात्त हेतूनेच पुस्तकाची निर्मिती…

अपयशी आर्थिक धोरणे बदलण्याची गरज !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading