झोपडीवजा छपराचा आधार नाहीसा झाल्यावर आश्रित द्वारकाची लहानग्या पोरीसह झालेली फरफट, कथानकाच्या शेवटी राशाटेक या दंतकथेचे वर्णन मनाला भारून जाते. कथानकाचा शेवट तर कादंबरीच्या नावाशी एकरुप करण्यात लेखिकेचे कसब वाखाणण्याजोगे आहे.
बा.स.जठार, गारगोटी
9850393996
डॉ. प्रतिमा इंगोले यांचा साहित्य प्रपंच नेटका आहे. राशाटेक ही त्यातीलच एक कादंबरी आहे. ग्रामीण जीवनातील साद पडसादाचा लेखाजोखा मांडणारी त्यांची ही सातवी कादंबरी होय. स्वार्थ आणि निस्वार्थ भावनांचे पदर उलगडत ही कादंबरी द्वारकाभोवती पिंगा घालत तिची कर्मकहाणी संवेदनशील शब्दात मांडते.
तकलादू खोपटात आयुष्यप्रवास सुखकर करू पाहणारी द्वारका रविराजाच्या आगमनानंतर नित्याच्या कामकाजाला सुरूवात करायची. चार हात दूर राहिलेल्या नातेवाईकांच्या तुटक्या आधाराच्या भरवशावर अवलंबून न राहता स्वतःच्या हिमतीवर ती जगत होती. पाखरांच्या पांगलेल्या थव्यागत लहाणपणीचा गोतावळा विसरून आईच्या वाट्याला आलेल्या खडतर मार्गावरून चालणारी, असह्य संसारकळा सोसणारी द्वारका लेखिकेंनी भावनिक शब्दांनी यथायोग्यपणे रेखाटलेली आहे.
संसाररूपी ठिगळांना सांधण्याचा प्रयत्न करणारा सासरा, नाईलाजाने स्वार्थाला आपलंसं करणारा जेठ आणि आपल्याच मर्जीप्रमाणे जगणारा नवरा अशा मानवी वृत्तींना आपलंसं करत संसाररूपी बाग फुलवू पाहणारी अपयशी द्वारका, तिची मनकवडी आई अशा विविध पात्रांच्या सहाय्याने सरकणारं कथानक वाचकाची भावनिकता उफाळून आणतं. मायच्या मृत्यूनंतर कोरडा झालेला गोतावळा, स्वार्थरुपी वाळवीने ग्रासलेले भाऊ आणि बाह्यरखेल नवरा अशा फरफटीतून, येणारा प्रत्येक दिवस आशेवर ढकलणारी नायिका भट्टीतील लोखंडावाणी तावून सुलाखून निघते आणि आपल्या दु:खरूपी संसारात कणखर बनते.
संसारगाडा चालवण्यासाठी दुस-यांच्यात मजुरीला गेल्यावर गडणींच्याकडून मिळणारी आपलेपणाची भावना, काही मानवी समज – संकेत, स्वार्थ – परमार्थ, आधार – निराधार, मायचं स्वप्नात येणं अशातून नायिकेची बाळंतपणाकडे चाललेली वाटचाल, बाळंतपणानंतर तिच्या आहाराची घेतली जाणारी काळजी या साऱ्या घटनांतून पुढेपुढे सरकताना कथानकाला चढविलेल्या ग्रामीण ढंगामुळे लेखिकेंच्या मुरलेल्या लेखणीचा प्रत्यक्ष अनुभव वाचकाला समजून येतो.
बारशाच्या प्रसंगातील ज्येष्ठांची मदत, सहका-यांचे आपलेपण, आजोबाच्या ताटात नातवाचं जेवणं अशा सा-या घटनांतून ग्रामीण गोतावळ्यातील शब्दात मांडलेला आपलेपणा, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी दिसून येते.
ओल्या बाळंतीणीची बाळासह घेतली जाणारी काळजी, बाळाला न्हाऊमाखू घालायला येणारी मांगीण, बाळाच्या प्रेमापोटी झोपा करण्यात आईने गमावलेला आत्मविश्वास यामुळे गावगाड्यापासून फारकत घेऊ पाहणाऱ्या हल्लीच्या मोबाईल जमान्यातील समाजघटकांना आत्मकेंद्री प्रवृत्ती बाजूला सारून समाजात मिळून मिसळून राहण्याचा सल्ला ही कादंबरी देऊन जाते.
आयुष्यभराच्या काळजीतच मानवी जीवन गुरफटलेले आहे. कादंबरीतील नायिकेचंही असेच आहे. पोटच्या पोरीची काळजी करत ती येणारा दिवस मागे सारत कथानकाचा प्रवास चालवत राहते. जीवघेण्या कष्टाबरोबर आपुलकीच्या धाग्याने ती माहेराशी पुन्हा जोडली जाते आणि माहेरसुखाचा आस्वादही चाखून घेण्यात ती यशस्वी होते. झोपडीवजा छपराचा आधार नाहीसा झाल्यावर आश्रित द्वारकाची लहानग्या पोरीसह झालेली फरफट, कथानकाच्या शेवटी राशाटेक या दंतकथेचे वर्णन मनाला भारून जाते. कथानकाचा शेवट तर कादंबरीच्या नावाशी एकरुप करण्यात लेखिकेचे कसब वाखाणण्याजोगे आहे.
कथानकाशी समरस होणा-या मुखपृष्ठाबरोबर आकर्षक बांधणीतून राशाटेक वाचकांच्या मनाचा टेकऑफ घेते हे नक्की. मानवी मनाची संवेदनशिलता दोलायमान करणा-या लेखिकेंच्या साहित्य प्रवासास माझ्या लाख लाख शुभेच्छा !
कादंबरीचे नाव – राशाटेक
लेखिका – डॉ. प्रतिमा इंगोले, मोबाईल – 98501 17969
प्रकाशक – सोशल प्रकाशन, दर्यापूर
पृष्ठे – २०८
किंमत – ₹ २५०
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.