लेखिका वकील असल्याने पुरावे देण्याची काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे पारशी, चकमा, हाजोंग, तिबेटी, नेपाळी, भूतानी या स्थलांतरितांचा प्रश्न कसा वेगळा आहे याचे विवेचन लेखिकेने केले आहे.
डॉ. सच्चिदानंद शेवडे
निर्वासित आणि घुसखोर यातील नेमका फरक आपल्याला माहिती नसती. तो या पुस्तकाने सहज भाषेत आणि उत्तम रीतीने समजावून सांगितलेला आहे. अत्यंत महत्त्वाच्या वेळेला प्रकाशित झालेले व सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या शंका दूर करणारे, म्हणून या पुस्तकाचे वर्णन करता येईल.
केवळ यूपीएससी आणि एमपीएससी चे विद्यार्थी यांच्यापासून ते सर्वसामान्य वाचकाला सुद्धा निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा हा नेमका काय आहे हे समजवण्याचा या पुस्तकांनी मोठाच प्रयत्न केलेला आहे. देशाच्या विविध प्रांतांमध्ये घुसखोरी कशी चालू आहे, हे लेखिकेने आकडेवारी व तपशीलानिशी मांडले आहे. प्रत्येक प्रकरणाला भक्कम संदर्भ ग्रंथांचा आधार आहे.
लेखिका वकील असल्याने पुरावे देण्याची काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे पारशी, चकमा, हाजोंग, तिबेटी, नेपाळी, भूतानी या स्थलांतरितांचा प्रश्न कसा वेगळा आहे याचे विवेचन लेखिकेने केले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांची अत्यंत समर्पक प्रस्तावना आहे. आपल्याकडे ज्या वेळेला हा कायदा लोकशाही मार्गाने मंजूर झाला, त्यावेळी विविध संघटनांनी या कायद्याविरुद्ध निदर्शनं, आंदोलन केली. यामुळे लोकांच्या मनात कुठेतरी काहीतरी शंका निर्माण झाली. या शंका निरसनाचा उत्तम प्रयत्न या पुस्तकाने निश्चितच होईल.
अतिशय सोप्या भाषेत सतरा प्रकरणे, यापैकी काही प्रकरणांच्या पोटात उपप्रकरणे अशी मांडणी आहे. यात विषय प्रवेश, पार्श्वभूमी, राष्ट्र उभारणी आणि त्यामागील विचारधारा, आंतरराष्ट्रीय निर्वासित कायदे/ संकेत आणि नागरिकत्व सुधारणा, भारतीय कायदे, बांगलादेशी निर्वासित आणि अवैध घुसखोर, अफगाणिस्तान – इतिहास आणि सद्य:स्थिती, भारतातील इतर स्थलांतरित, विरोध आणि निदर्शने, विरोध आणि तथ्य, ईशान्येकडील विरोध आणि तथ्य, विरोधाची कारणे आणि संविधानिकता, जागतिक दबाव – रवानगी की नागरिकत्व, काही प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या मते…, सर्वसामान्य स्थलांतरण की विशिष्ट स्थिती, थिओक्रटिक स्टेट विरुद्ध धर्मनिरपेक्ष भारत, उपसंहार आणि भारतीय राष्ट्रविचार अशा १७ प्रकरणांमध्ये मोठ्या कुशलतेने प्रवाही भाषेत लेखिकेने हा पट विणला आहे. त्यामुळे मोठा विषय खूप सोपा करून त्यांनी सांगितला आहे.
पुस्तकाचे नाव – निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा – मिथ्य आणि सत्य
लेखक – विभावरी बिडवे
प्रकाशक – कृष्णा पब्लिकेशन्स
पृष्ठे – २२१ मूल्य – २९९