November 11, 2024
Steps to develop spirituality Dnyneshwari speech by Rajendra Ghorpade
Home » म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । (एकतरी ओवी अनुभवावी)
विश्वाचे आर्त

म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । (एकतरी ओवी अनुभवावी)

मीपणा कसा जातो ? विषयांपासून कशी मुक्ती मिळते ? वासनेवर कसे नियंत्रण मिळवायचे ?वाईट विचार कसे नाहीसे करायचे ? याचा अभ्यास करून त्यावर विजय मिळवायचा आहे.

राजेंद्र घोरपडे

मोबाईल ९०११०८७४०६

म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती ।
अभ्यासूचि प्रस्तुती । करणे एथ ।।१४० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा

ओवीचा अर्थ – म्हणूनच अर्जुना, शांती प्राप्त होण्याकरिता हाच ( आता सांगितलेला) काय तो क्रम आहे. म्हणून सांप्रतकाळी तुला अभ्यासच केला पाहिजे.

पदवी मिळवायची तर त्या पदवीची परिक्षा द्यावी लागते. एकदम शेवटच्या वर्षाची परिक्षा नसते. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष असे मग शेवटचे वर्ष असते. शेवटच्या वर्षाची परिक्षा पास झाल्यानंतर मगच पदवी प्राप्त होते. या परिक्षा पास होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय परिक्षा पास होता येत नाही. अध्यात्मातही तसेच आहे. एकदम आत्मज्ञान प्राप्त होत नाही. गुरुकृपा होण्यासाठी अभ्यास हा करावा लागतो. ती पात्रता मिळवावी लागते. अंगी तसे गुण प्राप्त करून घ्यावे लागतात. मगच आपणाला आत्मज्ञानाचा लाभ होतो.

पात्रतेशिवाय आत्मज्ञानाची पदवी मिळत नाही. यासाठी सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गांनी अभ्यास हा करावा लागतो. या अभ्यासातूनच मग आपल्यात ती पात्रता येते. त्या पात्रतेला आपण योग्य होतो. तेव्हाच आत्मज्ञानाची पदवी प्राप्ती होते. विविध क्रम या पदवीच्या प्राप्तीसाठी सांगितले आहेत. आपल्यात ते गुण यायला हवेत. कर्माचे समर्पण यामध्ये मीपणाचा त्याग होतो. हे मी केले, ते मी केले. हे माझ्यामुळे झाले हा जो अहंकार असतो तो येथे नाहीसा होतो. मी पणाचा त्याग, अहंकार, काम, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष हे गुण आत्मज्ञानाला अडथळा करत असतात. ते आपोआप या विचारांनी नाहीसे होतात. यासाठी समर्पणाचा विचार आत्मसात करायला हवा.

मीपणा कसा जातो ?, विषयांपासून कशी मुक्ती मिळते ?, वासनेवर कसे नियंत्रण मिळवायचे ?, वाईट विचार कसे नाहीसे करायचे ? याचा अभ्यास करून त्यावर विजय मिळवायचा आहे. कर्माचे समर्पन केल्याने अहंकार जातो. मीपणा जातो. यामुळे साहजिकच या कर्मापासून आपणाला मुक्ती मिळते. कर्म हे आपल्याकडून करवून घेतले हा भाव मनात यायला हवा. तेव्हा आपल्यातील मीपणा आपोआप जातो.

महामारीमुळे सर्व जग थांबले. असे घडेल असे कधी कोणाला वाटले होते का ? पण आज ते घडले आहे. पण अशा विचलित करणाऱ्या घटनांकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. नकारात्मक विचार आपणाला अधोगतीकडे नेतो. हे विचारात घ्यायला हवे. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या सर्व घटनांकडे सकारात्मक दृष्टिने पाहायला हवे. या अशा विचारांनी आपल्यातील आत्मविश्वास बळावतो. वाईट विचारावर विजय मिळवणे सहजच शक्य होते.

महामारीमुळे सुट्टी मिळाली यातून अनेक अडचणी उभ्या राहील्या. यातून आपला आत्मविश्वास खचू नये यासाठी आपण त्याकडे सकारात्मक दृष्टिने पाहायला हवे. आलेली समस्या ही समस्या नसून किंवा आलेले अपयश हे अपयश नसून ती यशाची पहिली पायरी आहे. काट्यानेच काटा काढायचा आहे. समस्याच आपणाला या समस्येतून सोडवणार आहे आपली प्रगती करणार आहे. पुढे नेणार आहे. असे समजून कामाला लागायला हवे. असा सकारात्मक विचारच या परिस्थितीतून आपणाला योग्य मार्ग दाखवू शकतो. आव्हाने स्विकारायला शिकले पाहीजे. म्हणजे त्यावर मात करणे सहज शक्य होते. यामुळे निर्माण होणारी चिंता न वाटता परिस्थितीला सामोरे जाऊन येणारे बदल हे स्वीकारायला हवेत. तरच आपण प्रगती करू शकू.

सकारात्मक विचारांच्या वाढीसाठी चांगल्या विचारांची संगत करायला हवी. सदविचार अंगी बाणायला हवेत. सदविचारात, चांगल्या विचारात आपण गुंतलो तर विषय, वासनांपासून आपोआपच आपणाला मुक्ती मिळते. विषय, वासना आपल्यापासून दूर जातात. यासाठी मनात सतत चागले विचार घोळत ठेवायला हवेत. तशी सवय आपण आपल्या मनाला लावायला हवी. यासाठी साधना सांगण्यात आली आहे. साधनेत मन रमले की मग आपोआपच विषय, वासना कमी होतात. सद्गुरुंनी दिलेल्या मंत्राने यावर मात करता येते. यासाठी मंत्राची साधना नित्य करायला हवी. अभ्यासाने हे सर्व सहज शक्य आहे. यासाठी तसे प्रयत्न सातत्याने करायला हवेत.

विवेकी विचार नेहमीच वाईटावर मात करू शकतो. यासाठी सदैव आपल्यातील विवेक हा जागृत ठेवायला हवा. विवेक, सदविचार, सदभाव सदैव जागृत असेल तर आपणाला निश्चितच शांतीची प्राप्ती होते. मनात येणाऱ्या विषयांवर मात करण्यासाठी विवेकी विचारांच्या साधनेत मन रमवायला हवे. अशा साधनेने मनातील राग, अहंकार, क्रोध आदी व्याधी दूर होतात. विषय वासनांवर सहज मात करता येते. यातून आपल्यात एक प्रकारची शांती अंगी येते. ही शांतीच आत्मज्ञानाकडे ओढते. अशा पद्धतीने अभ्यासाने ही आत्मज्ञानाची पदवी प्राप्त होते. यासाठी योग्य अभ्यासाठी गरज आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading