March 29, 2024
Religious restrictions only for the sake of lifes caution
Home » जीवनातील सावधानतेसाठीच धार्मिक बंधने
विश्वाचे आर्त

जीवनातील सावधानतेसाठीच धार्मिक बंधने

भारतीय संस्कृती मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, हे शिकवते. यासाठी काही नियम केले आहेत. यामुळे ही टीका मुळात टीका नसून मन नियंत्रणात ठेवण्यासाठी सांगितलेले उपदेश आहेत. स्त्री-पुरुषांनी समाजात वावरताना कोणती कर्तव्य पाळावीत, हे त्यामध्ये सांगितले आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

चित्त आराधीं स्त्रियेचें । स्त्रियेचेनि छंदे नाचे ।
माकड गारुडियाचे । जैसे होय ।।७९२।। ज्ञानेश्वरी अध्याय १३

ओवीचा अर्थ – ज्या प्रमाणे गारुड्याचें माकड गारुड्याच्या छंदाप्रमाणे वागणारें असते, तसा जो स्त्रीच्या चित्ताचें आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो.

सध्या सर्वच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. स्त्री-पुरुष असा भेदभावही संपला आहे. पुरुषप्रधान संस्कृती आता मागे पडत आहे. आर्थिक संपन्नतेमुळे सामाजिक बदलही झाला आहे. चंगळवादी संस्कृती सध्या पाय रोवू लागली आहे. याचा कुटुंब व्यवस्थेला मोठा धोका पोहोचू शकतो. संपन्नतेने शांती येतेच, असे नाही. उलट शांती कमी होताना दिसते. एकतर्फी प्रेम, अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, लग्न न करताच स्त्री-पुरुषांनी एकत्र राहण्याची नवी पद्धत, असे अनेक प्रश्न सध्या समाजात भेडसावत आहेत. यासाठी समाजात योग्य संस्कारांची गरज आहे.

समाजात शांती नांदावी असे जर वाटत असेल, तर कुटुंब व्यवस्था ही टिकायलाच हवी. बदलत्या परिस्थितीनुसार स्त्री-पुरुष नातेसंबंधात बदलत होत आहे. जीवनात येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी हे बदल पाहायला मिळत आहेत. पण यातून फसवणूकीचे प्रकारही घडत आहेत. नातेसंबंध हे विश्वासाने टिकत असतात. पण विश्वास कोणावर ठेवायचा अन् कसा ठेवायचा हे सांगणे सध्याच्या परिस्थितीत कठीण झाले आहे. किरकोळ कारणांनी मोठे वाद होतात, लगेचच घटस्फोट. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. तू नाही तर लगेच दुसरा किंवा दुसरी, अशी अवस्था आज संसाराची झाली आहे.

चंगळवादाने अशा समस्या उद्भवत आहेत. तसे पाहता पूर्वीच्या काळीही असे प्रश्न होते, पण त्यांचे प्रमाण कमी होते. समाजाच्या चौकटीत अशांना मान नव्हता. त्यामुळे असे प्रकार कमी घडत असत. स्त्रियांच्या प्रश्नांवर चर्चाही केली जाते, पण स्त्री-स्वातंत्र्यामुळे उलट त्यांच्या सुरक्षेचाच प्रश्न मोठा झाला आहे. बलात्कार, लैंगिक शोषण असे अनेक प्रकार डोके वर काढत आहेत. या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा तरच हे प्रश्न सुटतील. सामाजिक संस्कारांचे महत्त्व जनतेला पटवून द्यायला हवे. धर्मामध्ये स्त्रियांवर टीका केली आहे म्हणून तो सोडून देणे योग्य नाही. टीका ही का केली आहे, याचा प्रथम विचार करायला हवा. टीकेमागचा हेतू जाणून घ्यायला हवा.

भारतीय संस्कृती मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, हे शिकवते. यासाठी काही नियम केले आहेत. यामुळे ही टीका मुळात टीका नसून मन नियंत्रणात ठेवण्यासाठी सांगितलेले उपदेश आहेत. स्त्री-पुरुषांनी समाजात वावरताना कोणती कर्तव्य पाळावीत, हे त्यामध्ये सांगितले आहे. हे शांती, समृद्धीसाठी सांगितले आहे. चंगळवादी संस्कृतीवर मात करण्याचे सामर्थ्य या विचारात आहे. यासाठी याचा अभ्यास करायला हवा. पुरुषांनी स्त्रीच्या मागे लागून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये यासाठी हे नियमन आहे. अनेक स्त्रिया स्वतःच्या स्वार्थासाठी पुरुषांना स्वतःच्या बोटावर नाचवतात अन् पुरुषही त्याच्या आहारी जातात. हे असे घडू नये यात पुरुषांनी सावध व्हावे असा या मागचा हेतू असतो. पण हे लक्षात न घेतले जात नसल्याने खरे प्रश्न आज समाजात निर्माण होत आहेत. सर्वच स्त्रिया अशा असतात असे नाही. थोर पुरुषांना घडविण्यामागे स्त्रीचे मोठे योगदान आहे हे सुद्धा विचारात घ्यायला हवे. अशी स्त्री कोणत्या जातीची, धर्माची आहे. हे सुद्धा यात विचारात घेतले जाऊ नये. तिचे योगदान महत्त्वाचे आहे. यासाठीच संस्काराचे महत्त्व इथे अधोरेखीत होते.

Related posts

गुलाम…

उपेक्षित, वंचित, गरजू मुलांना मुख्य प्रवाहात आणणारी विनया

मानवता धर्म मानणाऱ्या शैक्षणिक अन् सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आरती घुले

Leave a Comment