सोऽहम शब्द काय सांगतो? काय दर्शवितो? यामधून काय स्पष्ट होते? सोहम आपणास देह आणि आत्मा वेगळा आहे याची अनुभूती देतो. देहात आत्मा आला आहे. देहात आल्याने तो जन्मला असा भास आपणास होतो. आत्मा देहात आल्याने देहाला चैतन्य आले. देह सजीव झाला. अन्यथा तो निर्जीव आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
शब्दतत्त्वसारज्ञा । पैं देखणी तेचि प्रज्ञा ।
जे क्षेत्रा क्षेत्रज्ञा । अपाडु देखे ।। 1128 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – हे शब्दांच्या खऱ्या खऱ्या स्वरूपाचें मर्म जाणणाऱ्या अर्जुना, तीच बुद्धि डोळस की, जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांतील अंतर पाहते.
शब्दतत्त्वसारज्ञा अशी अर्जुनाची प्रशंसा संत ज्ञानेश्वरांनी येथे केली आहे. अर्जुन कसा आहे? याचा उल्लेख संत ज्ञानेश्वरांनी अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीत केला आहे. अर्जुन शब्दातील खरे खुरे स्वरूप जाणणारा असा आहे. मराठी भाषा कशी मोडाल तशी मोडता येते. एकाच शब्दाचे दोन दोन अर्थ काढता येतात. प्रसंग कसा आहे त्यानुसार त्याचा अर्थ स्वीकारला जातो. तो कोणता स्वीकारतो यावर त्याची विचारसरणी स्पष्ट होते. शब्दाचा अर्थ तो चांगला घेतो की अश्लील यावर त्याच्या मनाची पारख करता येते. शब्दाचे खरे स्वरूप जो जाणतो तो शब्दतत्त्वसारज्ञ.
सुन्न करणारी शांतताही मन मात्र अशांत करते. आपणास शांत बसण्यासाठी शांतता हवी असते; पण अति शांतता ही कधीकधी मनाची शांतता भंग करू शकते. शांतताच येथे अशांती निर्माण करते. मन कसा विचार करते, यावर शांततेचे कार्य ठरते. कोणी दंगा घालत असेल तर ध्यानात व्यत्यय येतो; पण हा दंगा आपण स्वीकारलाच नाही तर ध्यान भंग पावणार नाही. मोठ मोठे आवाज होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून आपण ध्यान करू शकतो. मनाला तशी सवय लावावी लागते. ध्यानात फक्त सोऽहम चा नादच ऐकायचा असतो. तशी मनाला त्याची सवय लावावी लागते. या स्वरात मग्न व्हायला शिकले पाहिजे. मन चंचल आहे; पण अभ्यासाने या चंचल मनाला स्थिर करता येते.
अर्जुन हा नेमबाज होता. अचूक लक्ष्य साध्य करायचा; पण यासाठी मनाची स्थिरता असावी लागते. मन चलबिचल असेल तर नेम चुकू शकतो. चंचल मनाला स्थिर करावे लागते. अर्जुन यासाठी पहाटे उठून साधना करायचा असा उल्लेख पुराणात आढळतो. साधनेने मनाची स्थिरता साधता येते. साधना करतो म्हणजे नेमके काय करतो? सोऽहम या शब्दाचे स्वर ऐकतो. मनात त्याचे पठण करतो. त्यावर मन केंद्रित करतो; पण या शब्दाचे खरे स्वरूप काय आहे? हे जो ओळखतो तो शब्दतत्त्वसारज्ञ.
सोऽहम शब्द काय सांगतो? काय दर्शवितो? यामधून काय स्पष्ट होते? सोहम आपणास देह आणि आत्मा वेगळा आहे याची अनुभूती देतो. देहात आत्मा आला आहे. देहात आल्याने तो जन्मला असा भास आपणास होतो. आत्मा देहात आल्याने देहाला चैतन्य आले. देह सजीव झाला. अन्यथा तो निर्जीव आहे. मरणानंतर देह जर तसाच पडला तर त्याला किडे लागतात. पक्ष्यांचे तो खाद्य होतो. यासाठी देहात आत्मा असतानाच तो वेगळा आहे याची अनुभूती घ्यायला हवी. जन्माचे सार्थक कशात आहे? आत्मज्ञानी होण्यातच जन्माचे सार्थक आहे; पण यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. संसारात असतानाही फक्त हे आत्मा आणि देह वेगळा आहे हे जाणता येते. अनुभवता येते.