चांगल्या गुणांबरोबरच वाईट गुणही आपल्यामध्ये सुप्तावस्थेत असतात. त्यांनाही पोषक वातावरण मिळाले की तेही प्रकट होतात. यासाठीच संगत ही महत्त्वाची आहे. चांगल्या संगतीमध्ये आपल्यातील चांगल्या गुणांची वाढ होते. वाईटाच्या संगतीत आपल्यातील वाईट गुणही वाढू शकतात. यासाठी याची काळजी घेणे गरजेचे आहे. सुप्तावस्थेतेतील गुण प्रकट झाल्यानंतरच त्याची प्रचिती आपणास येते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
हे असो काष्ठापासोनि । मंथूनि घेतलिया वन्ही ।
मग काष्ठेही कोंडोनि । न ठके जैसा ।। १४०८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – हे राहू दे, काष्ठापासून मंथन करून अग्नि उत्पन्न केल्यावर मग तो जसा लाकडानीहि कोंडून राहात नाही.
जीवसृष्टीतील घटकांमध्ये अनेक गुण हे सुप्तावस्थेत असतात. या गुणांना पोषण वातावरण मिळाल्यास ते प्रकट होतात. आपल्या शरीरातही काही अंगभूत गुण आहेत पण त्यांच्यावाढीसाठी पोषक वातावरण मिळणे गरजेचे असते. अनेक कला, विचार आपल्यामध्ये सुप्तावस्थेत आहेत. याची जाणीवही आपणास नसते. ही जाणीव करून देण्यासाठीच मग एक गुरूची आवश्यकता भासते. कलेत पारंगत असणारा गुरू आपल्यातील हे गुण निश्चितच ओळखतो. अन् तो आपणाला जागे करतो. आपल्या गुणांना तो वाट करून देतो. अशा या गुरूची आवश्यकता याचसाठी आहे.
चांगल्या गुणांबरोबरच वाईट गुणही आपल्यामध्ये सुप्तावस्थेत असतात. त्यांनाही पोषक वातावरण मिळाले की तेही प्रकट होतात. यासाठीच संगत ही महत्त्वाची आहे. चांगल्या संगतीमध्ये आपल्यातील चांगल्या गुणांची वाढ होते. वाईटाच्या संगतीत आपल्यातील वाईट गुणही वाढू शकतात. यासाठी याची काळजी घेणे गरजेचे आहे. सुप्तावस्थेतेतील गुण प्रकट झाल्यानंतरच त्याची प्रचिती आपणास येते. यासाठी त्या गुणांचा अंकूर फुटताच आपणास त्याची जाणीव होणे गरजेचे आहे. चांगले गुण असतील त्या अंकूरांना वाढू द्यावे पण वाईट गुण असतील तर ते अंकूर खुटून काढावेत. म्हणजे त्यांची वाढ होणारच नाही. असे केल्यास आपल्यातील वाईट गुणांवर आपणास नियंत्रण मिळवणे शक्य होईल.
लाकडामध्ये अग्नी आहे. दह्यामध्ये लोणी आहे. पण हे आपणास वरवर पाहाता दिसत नाही. कारण ते गुण त्यामध्ये सामावलेले आहेत. ते गुण पोषक वातावरण मिळाल्यानंतर प्रकट होतात. लाकूड अग्नीजवळ नेल्यास ते पेट घेणार. लाकडामध्ये अग्नी हा सुप्तावस्थेत आहे. तो दुसऱ्या अग्नीमुळे प्रज्वलित होतो. मग लाकूड हे लाकूड राहात नाही, त्याची राख होते. या राखेपासून पुन्हा लाकूड करतो म्हटले तरी शक्य होणे नाही. तसेच दह्यामध्येही लोणी आहे. दही घुसळल्यानंतर त्याचे ताक होते व लोणी स्वतंत्र होते. या लोण्याचे पुन्हा दही करता येणे शक्य आहे का ? पण लोणी करण्यासाठी दह्याला घुसळावे लागते तेंव्हाच हे घडते हे लक्षात घ्यायला हवे.
या प्रमाणेच आपल्यामध्येही आत्मज्ञान हे सुप्तावस्थेत आहे. हे ज्ञान प्रकट करण्यासाठी आत्मज्ञानी गुरुंची गरज आहे. आपल्या शरीरातील आत्म्याची ओळख सद्गुरु करून देतात. आपली ओळख सद्गुरुंच्यामुळे होते. मी कोण आहे ? याचा बोध सद्गुरुंच्यामुळे होते. हे आत्मज्ञान तेव्हा प्रकट होते. एकदा ज्ञान झाल्यानंतर पुन्हा अज्ञानी कसे होता येईल ? म्हणजे पुन्हा माघारी येणे नाही. लाकडातील अग्नी जसा कोंडून राहात नाही तसा आपल्यातील आत्मज्ञानही कोंडून ठेवता येत नाही. योग्य वातावरण मिळाल्यास तेही प्रकट होते. आत्मज्ञानी संताच्या सहवासामध्ये ते प्रकट होते. संताच्या सहवासात अनुभूतीने हे ज्ञान होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.