November 21, 2024
Sant Tukaram Maharaj Send Abhang to Chhatrapati Shivaji Maharaj
Home » छत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग
संशोधन आणि तंत्रज्ञान

छत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग

छत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या चळवळीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी राजे यांना पाठवलेले अभंग खूपच महत्त्वाचे ठरतात. राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाने शिवछत्रपतींच्या नावे उभारलेली स्वराज्याची गुढी व तत्कालिन घडामोडीत संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंग हे या कार्यासाठी निश्चिचत मार्गदर्शक अन् प्रेरणादायी असे होते.

पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ।।
न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचे यास वेचे सांगा ।।
बैसलिये ठायी म्हणता रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ।।
संताचे वचनी मानिता विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ।।
खरें बोलता कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसे सांगा ।
तुका म्हणे देव जोडे याचसाटी । आणीक ते आटी न लगे काही ।।

परस्त्रीते म्हणता माता । चित्त लाजविते चित्ता ।।
काय बोलोनिया तोडें । मनामाजी कानकोडें ।।
धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्ट्या हाते नुडवी काग।।
जे जे कर्म वसे अंगी । ते ते आठवे प्रसंगी ।।
बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ।।

छत्रपती शिवाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांना आणण्यासाठी अबदागिरी घोडा, कारकून पाठवले होते. त्यावेळी संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी महाराज यांना पाठवलेले हे अभंग…

शिवाजी महाराज यांना पाठवलेले हे अभंग स्वराज्य स्थापनेच्या कालावधीतील म्हणजे 1645 सालचे असावेत असे तज्ज्ञांचे मत आहे. पण तत्कालिन परिस्थितीचा विचार करता राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य स्थापनेसाठी ते निश्चितच मार्गदर्शक ठरले आहेत. शहाजीराजे यांनी आता चाकरी सोडून स्वराज्य उभारावे असे संत तुकाराम महाराज यांना वाटत होते.

1878
‘दिवटया छत्री घोडे। हे तो बऱ्यात न पडे॥
आता येथे पंढरिराया। मज गोविसी कासया॥
मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्ठा ।।
तुका म्हणे देवा । माझे सोडववणे धांवा ।।

1879
नावडे जें चित्ता । तें चि होसी पुरविता ।।
का रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाटी ।। ध्रु ।।
न करावा संग । वाटे दुरावावें जग ।।
सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ।।
जन धन तन । वाटे लेखावे वमन ।
तुका म्हणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरिनाथा ।।

जाणोनि अंतर । टाळिसील करकर ।।
तुज लागली हे खोडी । पांडुरगा बहु कुडी ।।
उठविसी दारी । धरणें एखादिया परी ।।
तुका म्हणे पाये । कैसे सोडीन ते पाहें ।।

नाही विचारीत । मेघ हागनदारी सेंत ।।
नये पाहो त्याचा अंत । ठेवी कारणापे चित्त ।।
वर्जीत गंगा । नाही उत्तम अघम जगा ।।
तुका म्हणे मळ । नाही अग्नीसी विटाळ ।।

1882
काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठल चि व्हावा ।।
तुम्ही कळलेती उदार । साटी परिसाची गार ।।
जीव दिला तरी । वचना माझ्या नये सरी ।।
तुका म्हणे धन । आम्हा गोमासासमान ।।

1883
पिकवावे धन । ज्यासी आस करी जन ।।
पुढे उरे खातां देतां । नव्हे खंडण मविता ।।
खोली पडे ओली बीज । तरीच हाती लागे निज ।।
तुका म्हणे धनी । विठ्ठल अक्षरी ही तिन्ही ।।

1884
मुंगी आणि राव। आम्हा सारखाची देव॥
गेला मोह आणि आशा। कळिकाळाचा हा फासा॥
सोने आणि माती। आम्हा समान हे चित्ती॥
तुका म्हणे आले। घरा वैकुंठ हे सावळे॥’

1885
तिही त्रिभुवनी । आम्ही वैभवाचे धनी ।।
हाता आले घाव डाव । आमचा मायबाप देव ।।
काय त्रिभुवनी बळ । अंगी आमुच्या सकळ ।।
तुका म्हणे सत्ता । अवघी आमुची च आता ।।

1886
आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ।।
तुमचे येर वित्त धन । तें मज मृत्तिकेसमान ।।
कटी मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ।।
म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ।।

1887
नाहो काष्ठाचा गुमान । गोवी भ्रमरा सुमन ।।
प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ।।
पदरी घाली पिळा । बाप निर्बळ साटी बाळा ।।
तुका म्हणे भावे । भेणे देवा आकारावे ।।
भावापुढे बळ । नाही कोणाचे सबळ ।।
करी देवावरी सत्ता । कोण त्याहूनि परता ।।
बैसे तेथे येती । न पाचारिता सर्व शक्ति ।।
तुका म्हणे राहे । तयाकडे कोण पाहे ।।

1889
भावचिया बळें । आम्ही निर्भर दुर्बळे ।।
नाही आणिकांची सत्ता । सदा समाधान चित्ता ।।
तर्का नाही ठाव । येथे रिघावया वाव ।।
एकछत्री राज । तुक्या पांडुरंगी काज ।।

1890
सत्तावर्ते मन । पाळी विठ्ठलाची आन ।।
आज्ञा वाहोनिया शिरी । सांगितले ते चि करी ।।
सरलीसे धाव । न लगे वाढवावी हाव ।।
आहे नाही त्याचें । तुका म्हणे कळे साचें ।।

1891
खावें ल्यावे द्यावें । जमाखर्च तुझ्या नावे ।।
आता चुकली खटपट । झाड्या पाड्याचा बोभाट ।।
आहे नाही त्याचे । आम्हा काम सांगायाचे ।।
तुका म्हणे चिंता । भार वाहे तुझ्या माथा ।।

1892
आतां बरे जाले । माझे माथांचे निघाले ।।
चुकली हे मरमर । भार माथाचे डोंगर ।।
नसता काही जोडी । करिती बहुतें तडातोडी ।।
जाला झाडापाडा । तुका म्हणे गेली पीडा ।।

1893
संचितें चि खावें । पुढे कोणाचे न घ्यावे ।।
आता पुरे हे चाकरी । राहो बैसोनिया घरी ।।
नाही काम हाती । आराणूक दिसराती ।।
तुका म्हणे सत्ता । पुरे पराधीन आता ।।

1894
ज्याचे गांवी केला वास । त्यासी नसावे उदास ।।
तरीच जोडिलें ते भोगे । काही आघात न लगे ।।
वाढवावी थोरी । मुखे म्हणे तुझे हरी ।।
तुका म्हणे हे गोमटी । दासा न घलावी तुटी ।।

1895
माझा तुम्ही देवा केला अंगीकार । हे मज साचार कैसें कळे ।।
का हो काही माझ्या नये अनुभवा । विचारिता देवा आहे तैसा ।।
लौकिकाचा मज लाविसी आभार । शिरोरत्नभार दुःखाचा हा ।।
तुका म्हणे नाही पालट अंतरी । तेथे दिसे हरी ठकाठकी ।।

1896
तोंडे बोलावे ते तरी वाटे खरे । जीव येरेयेरें वंचिजे ना ।।
हे तुह्मा सांगणे काय उगवूनि । जावें समजोनि पांडुरंगा ।।
जेवित्याची खूण वाढित्या अंतरी । प्रीतीने हे घरी चाली तेथे ।।
तुका म्हणे बहु परीचे आदर । अत्यंत वेव्हारसंपादणी ।।

1897
न पालटे एक । भोळा भक्त चि भाविक ।।
येरा नास आहे पुढे । पुण्य सरता उघडे ।।
नेणे गर्भवास । एक विष्णूचा चि दास ।।
तुका म्हणे खरे । नाम विठोबाचे बरे ।।


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading