June 20, 2024
book-review-of-khurap-by-mahadev-more
Home » ग्रामीण भागातील स्त्री जीवन एक प्रकारची वेठबिगारीच…
मुक्त संवाद

ग्रामीण भागातील स्त्री जीवन एक प्रकारची वेठबिगारीच…

कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यांमधील ग्रामीण जीवनाचा दस्तावेज सुचिता घोरपडे यांच्या कथांतून पानोपानी आढळून येतो. विज्ञान शाखेच्या त्या पदवीधर असूनही मराठी वाङ्मयाबद्दलची व कथालेखनाबद्दलची त्यांची आतड्याची ओळख कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील स्त्री जीवन हे एक प्रकारची वेठबिगारीच असते याचा प्रत्यय त्यांच्या कथातून प्रकर्षाने येतो.

महादेव मोरे

‘खुरपं’ हा नवोदित लेखिका सुचिता घोरपडे यांचा पहिलाच कथासंग्रह असला तरी तो तसा आहे यावर विश्वास बसू नये अशा त्यातील सर्वच कथा कसदार असून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ग्रामीण कथेच्या प्रांतात एका महिलेने दमदार पाऊल टाकल्याने काही मान्यवर वगैरे असलेल्यांच्या भुवया उंचावण्यास यास हरकत नाही. काही वर्षांपूर्वी माझे स्नेही कै. भोसले गुरुजी (मळणगावकर) यांनी ‘चारुता सागर’ हे नाव धारण करून एकाहून एक सरस ग्रामीण कथा लिहिण्याची कामगिरी करून जी. ए. कुलकर्णी, एकसंबेकर सारख्या धारवाडस्थित मराठीतील एक श्रेष्ठ कथाकारालाही चक्रावून टाकले होते. तसाच काहीसा प्रत्यय आता आला तरी आश्चर्य वाटू नये.

कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यांमधील ग्रामीण जीवनाचा दस्तावेज सुचिता घोरपडे यांच्या कथांतून पानोपानी आढळून येतो. विज्ञान शाखेच्या त्या पदवीधर असूनही मराठी वाङ्मयाबद्दलची व कथालेखनाबद्दलची त्यांची आतड्याची ओळख कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील स्त्री जीवन हे एक प्रकारची वेठबिगारीच असते याचा प्रत्यय त्यांच्या कथातून प्रकर्षाने येतो.

लग्न करून एखाद्या पोरीला घरी आणायचे व दोन वेळच्या जेवणावर आयुष्यभर तिला राबवून घ्यायचे व वंशाच्या विस्ताराचे एक साधन म्हणून वापरायचे व या साऱ्यावर धार्मिक विवाहाचे अवगुंठण त्यामुळे त्यातील वेठबिगारी व शोषण लपते. खुरपं मधील कथा वाचताना हे सारे तीव्रपणे जाणवून येते हे या कथांचं यश मानावं लागेल. कै. श्री. म. माटे, कै. श्री. र. वा. दिघे, तसेच कै. व्यंकटेश माडगुळकर, कै. शंकर पाटील, कै. डॉ. आनंद यादव तसेच अलीकडील एक दोन पिढ्यांतील डॉ. राजन गवस, कृष्णात खोत, रंगराव बापू पाटील यांचे कथा वाङ्मय वाचताना स्त्री जीवनाची खोल पराणी काळजाला लागते. सुचिता यांच्या कथा वाचताना तीच अनुभूती मिळते.

मराठवाड्यातील प्राचार्य प्रतिभा इंगोले यांनी सं. सुभाष सावरकरांच्या अक्षरवैदर्भी मधून बरंच ग्रामीण कथालेखन केले. तसेच कै. उद्धव शेळके यांनी वानगी सारख्या संग्रहातूनही व (धग कादंबरीतही) ग्रामीण स्त्रियांचा वनवास ठळकपणे अधोरेखित केला पण सुचिता घोरपडे यांच्या कथा वाचल्यावर कष्टकरी ग्रामीण महिलांची, मुलींची आयुष्य डोळ्यात भस्सदिशी घुसून घाव घाव घालतात. बहुतेक नव्या कथाकारांच्या लेखनात जो नवखेपणा असतो तो सुचिताच्या कथांमध्ये दिसून येत नाही. त्यांनी कथा बीज मनात चांगली रुजवून मग लेखणी उचलण्याचा प्रगल्भपणा दाखविला आहे, हे महत्त्वाचे आहे. या प्रगल्भपणामुळे ग्रामजीवनाची नस त्यांना अचूक गावली आहे; त्यामुळे त्यांनी एकापेक्षा एक सरस अशी कथाशिल्पे निर्माण तर केली आहेतच. ग्रामीण कथालेखन ही पुरुषांची मक्तेदारी असा एक समज करून बसलेल्या वाचकांना घोरपडेचं कथालेखन हा एक सुखद धक्काच मानावा लागेल.

या संग्रहात एकूण दहा कथा असून अव्वल दर्जाच्या नियतकालिकात प्रसिद्ध होण्याचे त्यांना भाग्य लाभले आहे. या सर्व कथा लिहिताना लेखिकेच्या हातून एक वेगळीच अशी निवेदनशैली निर्माण झाली आहे. संपूर्ण ग्रामीण निवेदन शैलीतील पहिली ग्रामीण कथा गेल्या पिढीतील सराई, पानकळा, पड रे पाण्या या कादंबऱ्यांचे लेखक कै. श्री. र.वा दिघे यांनी मौज दिवाळी अंकात आई नावाने लिहिली. तशाच शैलीच्या कथा नंतर श्री. महादेव मोरे यांनी साठ सालच्या आसपास लिहिल्या. तेव्हा हिरवे जग कवितांमधून चितारण्यात रमलेले कै. डॉ. आनंद यादव ही तशा शैलीत कसदार लेखन सत्यकथेत वगैरे सारख्या नियतकालिकातून केले आणि आता सुचिता घोरपडे यांनी ही ग्रामीण निवेदन शैली व नागरशैली यांचे मिश्रण करून अशी एक ओघवती शैली निर्माण केली आहे की त्यामुळे वाचक लोहचुंबकासारखा शेवटपर्यंत ओढला जातो.

‘किनव्या’ ( पृष्ठ १३८) कथेच्या सुरुवातीलाच लेखिकेच्या लेखणीचा वातावरण निर्मिती करण्याच्या कौशल्याचा प्रत्यय येतो तर काही कथांची सुरुवात ‘ अरं माझ्या हांट्या, किडं पडतील की रं वसाड्या..’(पृष्ठ ४५ ‘माचुळी’ कथा) अशा बोलण्यातील खास शब्दांनी होऊन कथेतील पात्रांचे स्वभाव विशेष ही त्यामुळे मनावर ठसते. यासाठी त्यांच्याकडे असलेल्या खास वेगळ्या व कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यात वापरल्या जाणाऱ्या ग्रामीण शब्दांचे फार मोलाचे सहाय्य होते.

संग्रहाचे शीर्षक ठरलेली ‘खुरपं’ ही कथा सत्यकथा मासिकाच्या बहराच्या काळात तेथेच प्रसिद्ध झालेल्या शंकर पाटलांच्या ‘वेणा’ कथेची उंची न चुकता गाठते हे लेखिकेच्या लेखणीचे फार मोठे यश मानावे लागेल. येडताक कथेच्या (पृष्ठ ५९) शेवट ओ हेन्रीच्या कथासारखा शेवटालाच कलाटणी देणारा असल्याने वाचक सुखावून जातो (असे शेवटला कलाटणी देणारे प्रयोग कामेरीकर श्रीरंगराव बापू पाटील यांनीही आपल्या काही ग्रामीण कथातून केले आहेत.) कथेत खेड्यातील एक गरीब गड्याचं गहिरं संसार चित्र रेखाटले गेलं आहे. ‘उतारा’ या कथेत खेड्यातील उतारा, पिशाच्च वापर करून कथेत चांगलीच खुमारी आणली आहे. संग्रहातील खेकडे या मिश्कील कथेचा एकमेव अपवाद वगळता तर सर्व कथांचे केंद्रबिंदू खेड्यातील स्त्रियांचे सर्व पावळीवर होणारे शोषण हा असून त्याचे चित्रण करताना कुठेही उर बडवेपणा न करता ते तटस्थ राहून केल्याने कथा भेदक होऊन वाचकांवर छाप सोडतात व वाचक सुन्न होऊन जातो.

पहिलाच कथासंग्रह असा लक्षवेधी ठरणे हे लेखिकेचे घवघवीत यश मानले पाहिजे. अशाच कसदार कथा यापुढेही त्यांच्या लेखणीतून उतरून ग्रामीण कथेची कक्षा विस्तृत करण्यात मदत करून हीच या निमित्ताने शुभेच्छा.

पुस्तकाचे नाव – खुरपं (कथासंग्रह)
लेखिका – सुचिता घोरपडे
प्रकाशक – आर्ष प्रकाशन
पृष्ठे – १६४, किंमत – २०० रुपये

महादेव मोरे मराठीतील एक ज्येष्ठ, श्रेष्ठ लेखक. सीमाभागातील गोरगरीब आणि तळागाळातील कष्टकरी सामान्य माणसातलं माणूसपण ,त्यांच्या कथा ,व्यथा महादेव मोरे काकांनी आपल्या कथा,कादंबरीमधून मांडल्या. या कथांनी मराठी साहित्यात आपले एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण केलेले आहे. शोषितांच्या अंतरंगाचा वेध घेणाऱ्या त्यांच्या कथा वास्तवाचे विदारक चित्र उभे करतात. विडी कामगार स्त्रियांच्या भावविश्वाचा घेतलेला आढावा मनाला हेलावून टाकतो. माझे माहेर निपाणी.. महादेव मोरे काकांचे लिखाण वाचतंच आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यांच्या सोबत बोलताना नेहमीच एका वेगळ्या जगात पोहचल्याची अनुभूती मिळते. खूप काही शिकायला, समजून घ्यायला मिळते. महादेव मोरे काकांसारख्या ज्येष्ठ लेखकानी ‘खुरपं’ बद्दल लिहावं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. ‘मुराळी’ अंक नेहमीच खूप जवळचा आहे. आणि ‘मुराळी’ सारख्या दर्जेदार अंकात ‘खुरपं’ ची निवड होणे ही माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

सुचिता घोरपडे

Related posts

रेडिमेड झालं जगणं

परिस्थितीशी झुंजणाऱ्या माणसांच्या संघर्षकथा

सामाजिक उपचारची दवाई : चारोळीसंग्रह अंतर -मंतर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406