June 19, 2024
Shadows of women in Red Light area
Home » वेश्या वस्ती मधील बायांच्या सावल्या
मुक्त संवाद

वेश्या वस्ती मधील बायांच्या सावल्या

कोरोना काळात सरकारने सगळ्या शोषितांना आधार दिला पण देहविक्री करणाऱ्या महिलांकडे मात्र दुर्लक्ष झालं. याच कारण हे देहविक्रीचे जग आपले नाहीच एवढी असंवेदनशीलता समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने या महिलांसाठी सुविधा दिल्या तरी त्या कोरोना काळात पोहचल्या नव्हत्या. त्यामुळे या वेगळ्या जगातील तनिषा सारखी स्त्री साऱ्या पुरुष जातीचा उद्धार करत होती.

तनिषा पुढे म्हणाली, आमच्या या मोहल्यात शासनाच्या वतीने धान्याचे वाटप करण्यात आले. आमच्या या मुली तिथे धान्य मिळेल म्हणून रांग लावायला गेल्या. तर त्यांना या भागातील राजकीय कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून रांगेत अन्य बायकांनी उभे राहू दिलं नाही. तरी या मुली वाद घालत तिथेच थांबल्या. मात्र धान्य घ्यायचा नंबर त्यांचा आला तेव्हा या सगळ्या त्यांच्या दृष्टीने बदनाम वस्तीतल्या असल्याचे लक्षात आल्यावर तिथल्या पुरुष वर्गाने आमच्या मुलींना हाकलून लावले. आमच्याकडे रेशन कार्ड नाही, आमच्याकडे मतदानाचं ओळखपत्र नाही, मग आमचा फायदा या राजकीय लोकांना कसा होईल ? म्हणून आम्हाला मदतीपासून झिडकारलं. या जगात पोटाची भूक सगळ्यांना समानच असते. श्रीमंताला, गरीबाला, तुम्ही समजता त्या कुलीन मुलींना आणि आमच्या या वस्तीतील मुलींना पोटाची भूक काही वेगवेगळी लागते का ? असा सवाल करताना तनिषाचा चेहरा लालेलाल झाला होता. तिला पुढे काय बोलावं हे सुचत नव्हतं.

पानाची तपकिरी पुन्हा आपल्याकडे ओढत तिने पुन्हा पानाचा विडा बनवला. तो तोंडात घालताना पाठीवर मोकळे सोडलेले केस पुन्हा घट्ट बांधले आणि बसल्या जागी जोरात हात जमिनीवर मारत वाटोळं वाटोळं होईल या समस्त पुरुष वर्गाचे असं म्हणत ती उठून आतमध्ये निघून गेली. तेव्हा तर मला या वेश्या वस्तीमधील अंधारात बसलेल्या बायांच्या सावल्या अधिकच भयान वाटू लागल्या. महामारी येते तेव्हा देहविक्री करणारा वर्ग सर्वाधिक दुर्लक्षित राहतो आणि त्याची सर्वाधिक कुचेष्टाही केली जाते. हे किती भयानक आहे.

तनिषाशी बोलत असतानाच मध्ये लाईट गेली होती. बहुदा तिथे इन्व्हर्टरची सोय नसावी. समोरच्या टेबलवर मेणबत्त्या पेटत होत्या. त्या मेणबत्तीच्या उजेडात माझ्यासमोर दहा-बारा बसलेल्या देहविक्री करणाऱ्या मुलींचे चेहरे अधिक काळवंडल्यासारखे भासत होते. माझ्या बाजूला जॉन बसले होते. मी तनिषा हिच्याशी बोलत असताना जॉन हे आपलेपणाने त्या मुलींशी चर्चा करून त्यांची कोरोना काळातील चौकशी करत होते. तनिषा उठून गेल्यावर माझं लक्ष तिकडे गेल. इतक्यात जॉन यांनी माझा हात घट्ट हाताशी धरून घाबरू नको असा धीर देण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्याशी थोडा हसण्याचा प्रयत्न केला आणि तसाच जागेवर बसून राहिलो. जॉन यांना माहीत होतं, माझ्यासमोर त्या मुली फार मोकळेपणाने बोलणार नाहीत. किंबहुना त्या या व्यवसायापर्यंत कशा पोहोचल्या ? याची माहितीही सांगणार नाहीत. त्यामुळे तेच त्यांच्याशी बोलत राहिले. खूप गप्पा झाल्यानंतर मी ही तिथल्या अंधाराला सरसावलो. माझीही भीती कमी कमी होत गेली आणि त्या सगळ्या मुलीही आमच्याशी अतिशय विश्वासाने गप्पा मारू लागल्या.

अर्थात या सगळ्या मागे जॉन यांनी या वस्तीत केलेल्या कामाची ही पोच पावती होती. या मुलींशीच मग गप्पा मारताना कळले, की सुमारे 30 ते 35 वर्ष जॉन हे देहविक्री करणाऱ्या वस्तीमध्ये या मुलींच्या आरोग्यासाठी काम करत आहेत. यांतील काही मुली त्यांना “चाचा” म्हणत होत्या. काही मुली “भैय्या” म्हणत होत्या. बोलता बोलता एक मुलगी म्हणाली, जॉन चाचा ‘हमको हमारे बाप की तरह है !’ या सगळ्या कौतुकावर जॉन हे अगदी निरागसपणे हसत होते. हे त्यांचं हसणं खूप विश्वासाचं आणि धीर देणारं वाटत होतं.

दुसरी मुलगी म्हणाली, जॉन चाचा यांनी आमच्यासाठी खूप केलं. त्यांच्या औरतची, अपने बच्चोंकी त्यांनी काळजी घेतली नसेल त्यापेक्षा कितीतरी काळजी त्यांनी आमची आजवर घेतली आहे. दर पंधरा दिवसांनी ते स्वतःच्या खर्चाने या वस्तीमध्ये डॉक्टर घेऊन येतात. आमच्या आरोग्याची तपासणी करतात. ते जर महिनाभर मुंबईत नसतील तर त्यांच्या मित्रांना सांगून ते डॉक्टरांना आमच्या आरोग्याची तपासणी करायला पाठवतात. प्रसंगी आम्ही डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली नाही तर ते खूप रागावतात, जोरात ओरडतात. असं सांगत असताना अचानक सगळ्या मुलींनी एकमेकाकडे पाहिलं आणि त्या जोरजोरात हसू लागल्या. त्याबरोबर जॉनही जोरात हसू लागले. क्षणभर मला काहीच कळले नाही. माझं काहीतरी चुकलं असं समजून मीच खाली मान घातली. इतक्यात एक मुलगी म्हणाली.

आताच आठ दिवसापूर्वी जॉन चाचा डॉक्टरांना घेऊन इथे आले. सगळ्या मुलींची आरोग्य तपासणी चालू होती;पण एक मुलगी रूममधून बाहेर येत नव्हती. सगळ्या मुलींनीही तपासणी करून घेण्यास तिला आग्रह केला. तरी ती तपासणी करून घेत नव्हती. शेवटी जॉन यांना तिचा राग आला. ते ताडकन तिच्या रूममध्ये गेले. तिला बाहेर येण्याची विनंती केली. तरीही ती बाहेर यायला मागेना. शेवटी जॉन यांनी रागाच्या भरात तिच्या कानाखाली आवाज काढला. त्यानंतर ती रागारागाने आपल्या आरोग्याची तपासणी करायला बाहेर आली. ही घटना या मुलींना आठवली आणि कानाखाली आवाज बसलेल्या त्या मुलीकडे पाहून त्या मुलीसह साऱ्याजणी जोरजोरात हसू लागल्या होत्या. हे मला कळताच मग मीही हसायला लागलो. मी या कुठल्या अपरिचित वस्तीत बसलो आहे हेही विसरून गेलो होतो. त्या क्षणी तरी मीही त्यांच्याच संवेदनशीलतेचा एक भाग झालो होतो. हे सारे ऐकून जॉन यांना मनोमनी मी नमस्कार केला. या देहविक्री करणाऱ्या मुलींसाठी जॉन हे देवदूतच बनले होते असे मनात वाटून गेले.

अजय कांडर

Related posts

भारतातल्या ‘ऐतिहासिक वारसा’ पर्यटन स्थळांविषयी जगाला आकर्षण

आध्यात्मिक शब्दातून सात्विक समाज निर्मिती शक्य

मीपणा गेल्यावरच आध्यात्मिक प्रगती

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406