March 19, 2024
dakshinayans-support-for-mass-movement-against-barsu-refinery-in-konkan
Home » कोकणातील बारसू रिफायनरी विरोधातील जनआंदोलनाला दाक्षिणायनचा पाठिंबा
काय चाललयं अवतीभवती

कोकणातील बारसू रिफायनरी विरोधातील जनआंदोलनाला दाक्षिणायनचा पाठिंबा

कोकणातील लेखक कविंसह राज्यातील साहित्यिक कलावंतांचा विरोध

गेल्या काही दिवसांपासून कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध अधिकाधिक तीव्र होत आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण, त्यातून जैविक सृष्टीचा विनाश या गंभीर कारणांवरुन ग्रामस्थांनी जनआंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकारात महाराष्ट्रातील मान्यवर लेखक कलावंतांनी पाठिंबा दिला आहे.

कोकण हा पृथ्वीवरील, औद्योगिकरणाच्या कचाट्यातुन अजूनही बऱ्याच प्रमाणात वाचलेला, जैविक विविधतेने मानवी अस्तित्वासाठी आवश्यक अशा पर्यावरणाचा ठेवा आहे. म्हणून तेथील सर्वसामान्य लोकांनी आजवर येऊ घातलेल्या प्रदूषणकारी प्रकल्पाला प्राण पणाला लावून विरोध केला आहे. यापूर्वी गेल्या वीस वर्षांत कोकणात गुहागरमधे तवसाळ येथे व राजापूरमधे नाणार येथील रिफायनरी प्रकल्पांना विरोध झाल्याने ते प्रकल्प सरकारला रद्द करावे लागले. परंतु बारसू येथे येऊ घातलेल्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे समर्थन तथाकथित विकासाचे कारण दाखवून केले जात आहे. शाश्वत विकासाच्या पर्यावरणपूरक संकल्पनेला नाकारून नवभांडवलशाही प्रवुत्ती ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयण करीत आहे. आपल्याला विकास हवा आहे, बेरोजगारी दूर करण्यासाठी लोकांच्या हाताला काम देण्याची क्षमता या प्रकल्पात आहे, असे सांगितले जात आहे. व्यापक हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी त्याग करायला पाहिजे, असे आवाहन केले जात आहे. परंतु साम्राज्यवादी शक्तींचा यामागील स्वार्थी व विनाशकारी हेतू ग्रामस्थांना समजावून सांगण्याची गरज आहे. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यानी नेटाने आंदोलन चालविले आहे. या आंदोलनाला बळ देण्याची गरज आहे.

बारसू येथे प्रस्तावित असलेल्या तेल शुद्धीकरण कारखान्याला ( रिफायनरीला ) व इतर अनेक गावांत होणाऱ्या निःक्षारीकरण प्रकल्प, प्लास्टिक निर्माण, औष्णिक वीजनिर्मिती, धरण इ. संलग्न कारखाने – प्रकल्पांना ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे. हा विरोध घटनात्मक पध्दतीने स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांमधे रितसर ठराव मंजूर करून व ते शासनाला सर्व स्तरावर देऊन व्यक्त झाला आहे. मुळात देशाची गरज १९ कोटी टन कच्च्या तेलाच्या शुध्दीकरणाची असताना २४ कोटी टन तेल शुध्दीकरण केले जात आहे. अधिकचे तेल युरोपला निर्यात केले जाते. तेथील सरकारे व सत्ताधारी स्वतःच्या देशात प्रदूषण न करता ते भारतात करून घेतात. रिफायनरी व एकूणच औद्योगिकरणाबाबत सध्याच्या परिस्थितीत सत्याला धरून विचार व्हावा. या वर्षी उन्हाळ्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यात देशात उष्णतेच्या लाटा, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, बर्फवृष्टी होत आहे.

पावसाळ्यातही थोडा पाऊस पडणाऱ्या विदर्भात अतिवृष्टी होत आहे. नद्यांना पूर येत आहेत. अशाप्रकारे हवामान बदलामुळे देशात सर्वत्र पिके गमावली जात आहेत. कोकणात आंबा व इतर फळांचे फक्त २५ टक्के उत्पादन झाले आहे. नुकतीच नवी मुंबईत खारघर येथील दुर्घटनेत उष्माघाताने १५ माणसे तडफडून मेली. जागोजागी तापमान ४५ – ५० °से ही माणुस जिवंत राहण्याची मर्यादा ओलांडत आहे. ही पृथ्वीची तापमानवाढ आहे. यास कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनाॅक्साईड, मिथेन इ. वायूंचे उत्सर्जन कारण आहे. यात पेट्रोल – डिझेल पुरवणारी रिफायनरी व औष्णिक म्हणजे कोळसा जाळून वीज निर्माण करणारे प्रकल्प सर्वांत दोषी आहेत. कार्बन डाय ऑक्साईड वायूच्या सुमारे ४००० कोटी टन वार्षिक उत्सर्जनात तेल जाळून होणारी वाहतुक व औष्णिक विजेचा वाटा ८६ टक्के आहे. १० टक्के वाटा सिमेट काँक्रिटचा आहे.

मानवजात वाचवण्यासाठी, कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी केलेल्या पॅरिस करारावर प्रधानमंत्री मोदींची स्वाक्षरी आहे. मानवजातीने जागे होण्याची गरज आहे. दोन वर्षांनी सन २०२५ मधे पृथ्वीच्या सरासरी तापमानात ३ अंश सेल्सिअसची वाढ होणार आहे. भारतातील वैज्ञानिक संस्था व हवामान खाते पूर्ण गाफील आहे. पृथ्वीवरील जीवन या गतीने फक्त १० ते ३० वर्षांत संपुष्टात येथ आहे. आज जेथे ४५ ते ५५ अंश सेल्सिअस तापमान होत आहे ( गेल्या वर्षी कुवेतला ६३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.) तेथे दोन वर्षांनंतर उच्चतम उष्णतेच्या लाटेत ५ ते १० अंश सेल्सिअसने जास्त असणार आहे. या स्थितीत मानव व इतर दृश्य जीवसृष्टी जिवंत राहणे शक्य नाही. हे कल्पनेपेक्षा निराशाजनक असे वैज्ञानिक सत्य आहे. या परिस्थितीत असलेल्या रिफायनऱ्या व चालणारी वाहने जिथे बंद करण्याची गरज आहे तिथे नव्या रिफायनरींचा विचार तरी कसा केला जाऊ शकतो? सदर प्रकल्पामुळे फक्त कोकणातील काही गावे बाधित नाहीत. मानवजात व जीवसृष्टी बाधित आहे. रिफायनरी प्रकल्प हा मानवजात व जीवनाशी द्रोह ठरेल, हत्येचा गुन्हा ठरेल. बारसू येथील रिफायनरी प्रकल्प तात्काळ रद्द व्हायला हवा. सर्व सुसंस्कृत माणसांनी जीवनाच्या व अस्तित्वाच्या बाजूने रिफायनरी विरोधात उभे रहावे.

बारसू प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कोकणातील सामाजिक कार्यकर्ते यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला दक्षिणायनच्या वतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ व मान्यवर लेखक-कवी, पत्रकार व कलाकार यांनी पाठिंबा आहे, असे एका पत्रकाद्वारा दक्षिणायन महाराष्ट्राचे निमंत्रक संदेश भंडारे आणि प्रमोद मुनघाटे यांनी जाहीर केले आहे.

बारसू रिफायनरी आंदोलकांच्या समर्थनार्थ या मान्यवरांनी सहमतीः

गणेश देवी, महेश एलकुंचवार, रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, छाया दातार, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, प्रज्ञा दया पवार, राजन गवस, अनुराधा पाटील, कौतिकराव ठाले पाटील, इब्राहिम अफगाण, निरंजन टकले, प्रवीण बांदेकर, अभय कांता, प्रमोद मुजुमदार, संध्या नारे पवार, अजय कांडर, किरण गुरव, रणधीर शिंदे, नीतीन रिंढे, प्रभू राजगडकर, प्रफुल्ल शिलेदार, कुसुम अलाम, राम काळुंखे, गोविंद काजरेकर, अमिताभ पावडे, संजीवनी पावडे, दत्ता घोलप, संजीव चांदोरकर, प्रफुल्ल शिलेदार, जयंत भीमसेन जोशी, निशा साळगावकर, दीपा पळशीकर, माधव पळशीकर, छाया सावरकर, अपर्णा फडके, मधुकर मातोंडकर, रणजित मेश्राम

Related posts

विवेकबोधाची दाटी

जन्नत-ए-कश्मिरच्या सौंदर्याची खाण..गुलमर्ग !

समतेच्या विचाराचे छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ जनमानसात पोहचविले पाहिजेत – डॉ. बालाजी जाधव

Leave a Comment