काळानुसार झालेला शिक्षणपद्धतीमधील बदल हा विचारात घ्यायला हवा. अध्यात्मिक शिक्षणपद्धतीत शिष्याला घडविण्याचा, ज्ञानी करण्याचा, आत्मज्ञानी करण्याचा उद्देश असतो. एका अक्षरामध्ये इतके सामर्थ्य आहे. हे अक्षरच आपले जीवन आहे. आपले त्या अक्षराकडे लक्ष असो नसो. मात्र ते अक्षर नित्य आपल्यात आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तया अक्षराआंतील भावो । पाववीन मी चुमचा ठावा ।
आइका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ।। 415 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा
ओवीचा अर्थ – त्या अक्षरांतील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोचवीन (तुम्हाला सांगेन) तो तुम्ही ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर (महाराज) म्हणतात.
सदगुरु अनुग्रह देतात म्हणजे नेमके काय करतात ? साधनेसाठी गुरुमंत्र देतात. मंत्र म्हणजे काय ? तर ते एक अक्षर किंवा अक्षरेच ना ! पण या अक्षरातील भाव अनुभवायाचा असतो. त्या अक्षराची अनुभुती घ्यायची असते. हे अक्षर नित्य स्मरणात ठेवायचे असते. नित्य त्याची साधना करायची असते. त्या अक्षराच्या स्मरणातून होणारा आनंद अनुभवायचा असतो. यातूनच नित्य साधना होत असते. म्हणूनच म्हणतात साधना करायची नसते तर ती आपोआप आपल्याकडून करवून घेतली जात असते. सहज होत असते. इतकी सहजता त्यामध्ये असते. हे सर्व अनुभवाचे शास्त्र आहे. अक्षरातच सर्व सामावलेले आहे. याचा अनुभव साधना करताना येतो. यातूनच आपण आपली अध्यात्मिक प्रगती साधायची असते.
ज्ञानेश्वरीतील शिक्षणपद्धती किंवा अध्यात्मातील शिक्षणपद्धती कशी असते हे या ओवीतून स्पष्ट होते. गुरु शिष्याकडून कसा अभ्यास करून घेतात हे सुद्धा यातून समजते. शिष्याने स्वतःच अभ्यास करायचा आहे. स्वतःच सर्व शोधायचे आहे आणि काय शोधले हे गुरुंना सांगायचे आहे. गुरु फक्त एक मंत्र देतात. पण या मंत्रातून आलेला अनुभव हा शिष्याने स्वतः अनुभवायाचा आहे. अन् काय अनुभवले हे गुरु समोर मांडायचे आहे. या सर्व प्रक्रियेतून स्वतःच त्याचा अभ्यास करायचा आहे. गुरु-शिष्यातील हा संस्कार खूप महत्त्वाचा आहे. गुरुकडून शिष्य कसा घडवला जातो ? हा ज्ञान संस्कार भावी पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक असा आहे.
सध्याच्या शिक्षणपद्धतीत गुरुंनी शाळेत किंवा महाविद्यालयात काही शिकवले नाही म्हणून ते अभ्यासायले जात नाही. किंवा त्यावर परीक्षेत प्रश्न विचारण्यासही परवानगी नसते. विचारले तर न शिकवलेल्या भागावरच प्रश्न विचारले अशी ओरड होते. इतकेच या मुद्द्यावर विद्यार्थी संघटनांकडून आंदोलनेही होतात. सध्याची शिक्षणपद्धती ही अशी आहे. केवळ गुण मिळवण्यासाठी अभ्यास केला जातो. कोणाला किती गुण यावरच त्याची हुशारी समजली जाते. पुढच्या प्रवेशासाठीही हेच महत्त्वाचे धरले जाते. अशाने विद्यार्थी हे उच्चशिक्षित होतो खरा पण तो त्या विषयात किती पांरगत आहे किंवा त्याने त्या ज्ञानाचा वापर कसा केला हे सांगता येणे कठीण आहे. त्या विषयातील संशोधक वृत्ती त्या विद्यार्थ्यात किती आहे हे सुद्धा सांगता येणे कठीण आहे.
काळानुसार झालेला शिक्षणपद्धतीमधील बदल हा विचारात घ्यायला हवा. अध्यात्मिक शिक्षणपद्धतीत शिष्याला घडविण्याचा, ज्ञानी करण्याचा, आत्मज्ञानी करण्याचा उद्देश असतो. एका अक्षरामध्ये इतके सामर्थ्य आहे. हे अक्षरच आपले जीवन आहे. आपले त्या अक्षराकडे लक्ष असो नसो. मात्र ते अक्षर नित्य आपल्यात आहे. नित्य त्याचे येणे-जाणे सुरु आहे. फक्त आपण त्याला अवधान देऊन समजून घ्यायचे आहे. त्याची नित्यता अनुभवायची आहे. त्या अक्षराचे सामर्थ्य जेव्हा आपल्या अनुभवाला येईल तेव्हाच खऱ्या अर्थ्याने आपली अध्यात्मिक प्रगती होईल. ते अक्षर आपणास किती समजले. हे सदगुरुंना सांगून त्या अक्षरातून आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न नित्य करायला हवा. अक्षराच्या आतील भाव समजून घेऊन प्रगती साधायला हवी. गुरु-शिष्य परंपरेचा ही साखळी पुढे अशीच सुरु ठेवायला हवी.
काळ बदलला, परंपरा बदलल्या, शिक्षण पद्धती बदलल्या, एकंदरीत आपली जीवनशैलीही बदलली तरी गुरू-शिष्याची ज्ञानदानाची परंपरा ही नित्य आहे. त्यात कधीही खंड पडत नाही. त्यातील अखंडता, अभंगता जाणून घ्यायला हवी अन् ते ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.