July 27, 2024
Spiritual Brightness article by Rajendra Ghorpade on Dnyneshwari
Home » आध्यात्मिक तेज
विश्वाचे आर्त

आध्यात्मिक तेज

स्थिरता योगातून येते. आध्यात्मिक विचारातून येते. ईश्‍वराच्या सतत स्मरणातून जीवनात ही स्थिरता येते. एकदा या स्थिरतेची ओढ लागली की आपोआप देवाचे स्मरण घडते. ती ओढ लागते. हे जे सहजपणे देवाकडे ओढणे, धावणे आहे त्यालाच आध्यात्मिक तेज असे म्हटले जाते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

ऐसें ईश्‍वराकडे निज । धावें आपसया सहज ।
तया नावं तेज । आध्यात्मिक तें ।। 189 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – अशा प्रकारें परमेश्वराकडे अंतःकरण सहज आपोआप धांव घेतें, त्याला आध्यात्मिक तेज म्हणतात.

जपानमध्ये त्सुनामी आली. ही दृष्ये पाहताना निसर्गाचा कोप काय असतो हे स्पष्ट दिसले. निसर्गापुढे कोणाचेही काही चालत नाही याची जाणीव झाली. अशा प्रसंगामुळे आपणास देवाची आठवण जरूर होते. पुराची दृष्ये पाहतानाही आपणास निसर्गाची शक्ती लक्षात येते. ठेच लागल्यावर जशी आईची आठवण होते. तोंडातून अगदी सहजपणे आई गं.. असे शब्द बाहेर पडतात. एकंदरीत संकटाच्या काळात आपणास देवाची आठवण होते. इतरवेळी देवाची आठवण होत नाही.

भीतीमुळे आपण देवाकडे वळतो. आधाराची गरज वाटते. पण प्रत्यक्षात अध्यात्मात असे काही नाही. नित्य देवाचे स्मरण करावे. आनंदी राहावे. विधीलिखीत आहे ते टाळता येत नाही. घडणारे घडतच राहणार. प्राप्त परिस्थितीत आनंदी कसे राहता येईल व दुसऱ्यांना कसे आनंदी ठेवता येईल हेच महत्त्वाचे आहे. अध्यात्मामध्ये आपोआप देवाची ओढ लागते. ती नैसर्गिक असते. अंतःकरणातून जेव्हा एखादी गोष्ट येते तेव्हा ती स्वतःला पटलेली असते. त्याच्यावर विश्वास असतो. प्रेम असते. आसक्ती असते. आपुलकी असते. अध्यात्मात अंतःकरणातून ओढ असावी लागते.

नव्या पिढीमध्ये देवाचा ओढा फारसा दिसत नाही. पुर्वीच्या काळी सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर देवाची स्तोत्रे म्हटली जायची. संध्याकाळची सुरवातही देवाच्या स्मरणाने व्हायची. पण आताच्या काळात असे फारसे आढळत नाही. हे संस्कार आताच्या पिढीत नाहीतच. फक्त संकटे आली की मगच देवाचे स्मरण होते. इतर वेळी नुसता दिखावा केला जातो. एवढेच काय देव धर्म मानणाऱ्या व्यक्तीला वेळेचा दुरपयोग करणारा मुर्ख असे समजले जाते. बदलत्या काळात वेळेला अधिक महत्त्व आले आहे. कमी वेळात किती नफा कमविला हेच पाहिले जाते. यावरच प्रगती ठरविली जाते.

जग वेगाने बदलत आहे. बदलत्या जगाचा वेग अधिक आहे. यानुसार माणसालाही धावावे लागत आहे. पूर्वी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाड्या आता ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने धावत आहेत. वेग वाढला म्हणून पृथ्वीचा फिरण्याचा वेग काही वाढलेला नाही. तो स्थिर आहे. यासाठी हृद्‌याचे ठोकेही स्थिर ठेवणे आवश्‍यक आहे. ते वाढले तर हृद्यविकाराचा झटका बसू शकतो. हे लक्षात घ्यायला हवे. हे स्थिर ठेवण्यासाठीच शरीराला स्थिरतेची गरज आहे. ही स्थिरता योगातून येते. आध्यात्मिक विचारातून येते. ईश्‍वराच्या सतत स्मरणातून जीवनात ही स्थिरता येते. एकदा या स्थिरतेची ओढ लागली की आपोआप देवाचे स्मरण घडते. ती ओढ लागते. हे जे सहजपणे देवाकडे ओढणे, धावणे आहे त्यालाच आध्यात्मिक तेज असे म्हटले जाते.

एखादा विषाणू जग थांबवू शकतो हे कोणी स्वप्नतही पाहीले नसेल. पण कोरोना विषाणूने हे करून दाखवले. असे संसर्गजन्य रोग पूर्वीही होते. पूर्वीही अशीच परिस्थिती ओढवली जात होती. अशावेळी आपणावर आलेले संकट टळावे यासाठी देवाला साकडे घातले जाते. साहजिकच मरणाच्या भितीपोटी का असेना पण आपण देवाकडे वळतो. पण अध्यात्माची ओढ ही वेगळी असते. अनुभुतीतून देवाचे अस्तित्व जेव्हा आपणास जाणवते तेव्हाच आपला खरा ओढा देवाकडे लागतो. देव सर्वत्र आहे तो आपल्यातही आहे हे जेव्हा कळते तेव्हा निश्चितच आपण देवाकडे सहजपणे ओढले जातो. असे हे सहज देवाचे स्मरण यालाच आध्यात्मिक तेज असे म्हटले जाते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा

भास-अभास

“ओपेक” ची  कपात जागतिक अर्थव्यवस्थेला मारक !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading