कोण हुशार असतो. तर कोण मठ्ठ असतो. म्हणून या दोघांमध्ये असणारा आत्मा हा वेगळा नसतो. देहातील गुणापासून हा आत्मा वेगळा आहे. गुणानुसार आत्मा बदल नाही. दोन्ही ठिकाणी असणारा आत्मा हा एकच आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
परि पै गुळाची गोडी । नोहे बांधया सांगडी ।
तैसी गुण इंद्रियें फुडीं । नाहीं तेथ ।। 900 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – परंतु, गुळाची गोडी जरी ढेपेत सांपडलेली असते, तरी ती गोडी जरी ढेपेच्या आकाराची नसते. त्याप्रमाणे गुण व इंद्रिये यात जरी ब्रह्म वस्तु आहे तरी ब्रह्मवस्तुच्या ठिकाणी गुण व इंद्रिये ही खरोखर नाहीत.
देह आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. हे वारंवार ज्ञानेश्वरीत सांगितले आहे. ते समजण्यासाठी ज्ञानेश्वरीत अनेक उदाहरणे देण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणी हे वेगळेपण ओळखायचे आहे. त्याची अनुभूती घ्यायची आहे. यातूच आध्यात्मिक प्रगती साधायची आहे.
गुळाची चव गोड असते. ही गोडी गुळाच्या प्रत्येक कणात आहे. गुळाच्या ढेपेला आकार दिला म्हणून त्याची गोडी बदलत नाही. आहे तशीच त्याची गोडी आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानात गुळाची विक्री व्हावी यासाठी अनेक आकार देण्याचे प्रकार पाहायला मिळतात. भेट देण्यासाठी मोदकाच्या आकाराचा गुळ तयार केला जातो. काही ठिकाणी गुळाच्या चकत्या तयार केल्या जातात. चौकोनी आकाराच्या या चकत्या विक्रीसाठी उपयुक्त ठरतात. या सर्व प्रकारात गुळाची गोडी मात्र कायम असते. आकार बदलला म्हणून गोडी कमी होत नाही किंवा वाढतही नाही. गुळ हा गोडच लागतो. तो खारट होत नाही.
सांगण्याचा उद्देश हाच आहे की वेगवेगळ्या आकाराच्या देहात असणारा आत्मा हा एकच आहे. देहाचा आकार लहान मोठा असेल. पण या दोन्ही ठिकाणी असणारा आत्मा मात्र सारखाच आहे. कोणी दिसायला सुंदर असतो तर कोणी कुरुप असतो. देह सुंदर असो वा कुरुप पण त्या दोन्ही देहात असणारा आत्मा हा सारखाच आहे. गुळाच्या ढेपेचा आकार बदलला म्हणून गुळाची गोडी बदलत नाही तसे देहाची वेगवेगळी रुपे झाली म्हणून त्यातील आत्मा हा बदलत नाही. सर्व देहात असणारा आत्मा हा एकच आहे.
कोण हुशार असतो. तर कोण मठ्ठ असतो. म्हणून या दोघांमध्ये असणारा आत्मा हा वेगळा नसतो. देहातील गुणापासून हा आत्मा वेगळा आहे. गुणानुसार आत्मा बदल नाही. दोन्ही ठिकाणी असणारा आत्मा हा एकच आहे. शरीरातील इंद्रियामध्ये आत्मा कार्यरत आहे. पण या आत्मा त्यांच्यापासून अलिप्त आहे. या आत्म्याला इंद्रिये, गुण नाहीत. त्याचे हे वेगळेपण जाणून घ्यायचे आहे. म्हणजेच देह आणि आत्मा हे वेगळे आहेत हे जाणायचे आहे. म्हणजेच या ब्रह्म वस्तूची अनुभूती घ्यायची आहे.
देहात आत्मा आला आहे. तो म्हणजे देह नाही. तो देहापासून वेगळा आहे. याची अनुभूती घ्यायची आहे. या अनुभूतीतूनच आपण आत्मज्ञानी व्हायचे आहे. या आत्म्याचे ज्ञान हस्तगत करायचे आहे. ती स्थिती कायम ठेवायची आहे. एकदा का ही स्थिती प्राप्त झाली. ज्ञान प्राप्त झाले म्हणजे आपण सर्वज्ञ होतो. ब्रह्मसंपन्न होतो.