September 13, 2024
Easy way to get concentration in meditation
Home » साधनेत मन स्थिर होण्यासाठीचा सोपा उपाय
विश्वाचे आर्त

साधनेत मन स्थिर होण्यासाठीचा सोपा उपाय

आवाजामुळे मन विचलित होऊ नये यासाठी मनच स्थिर होणे गरजेचे आहे. ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले, असे म्हटले जाते. चंचलता हा मनाचा गुणधर्म आहे. हे विचारात घेऊन मनात विचारच उत्पन्न होणार नाहीत, यासाठी प्रयत्न व्हायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

एहींचि पांचे द्वारी । ज्ञानासिं धांव बाहेरी ।
जैसा कां हिरवे चारी । भांबावे पशु ।। ११८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – या पाच द्वारांनीच ज्ञान बाहेर धावतें, ते कसें ? तर जसें हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणामध्ये जनावरें भाबावतात तसें ज्ञान भांबावतें.

मनाला नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मन स्थिर राहिले तरच साधना होते. मन नेमके भरकटते कशामुळे ? आपणास जेवताना अनेक पदार्थ समोर ठेवले तर हे खाऊ का ते खाऊ, असे होते. मन चलबिचल होते. एकदम सगळे पदार्थ पाहून काही वेळेला खाण्याची इच्छाच राहात नाही. असे आपणास कित्येकदा होते. कुरणातील हिरवागार चारा पाहून जनावरेही भांबावतात.

शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. या ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. साधनेच्या काळात आपल्यामध्ये सूक्ष्म विचार करण्याची वृत्ती निर्माण होते. अति खोलवर एखाद्या गोष्टीचा विचार होतो. दूरचे आवाच स्पष्ट ऐकू येतात. दूरचे वासही स्पष्ट समजतात, इतकी ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढते. दूरच्या वासाने मन विचलित होऊ नये यासाठी काही जण साधना करण्यापूर्वी उदबत्ती लावतात किंवा काही जण सुगंधी अत्तर फवारतात. सुगंधामुळे मनाला मोहकता येते. मन प्रसन्न राहते. असे अनेक उपाय साधना करताना योजले जातात. हेतू एकच असतो की, मन स्थिर राहावे. मन चंचल होऊ नये; पण मन भरकटते म्हणून साधना सोडून देणे योग्य नाही.

बऱ्याचदा असे होते लावलेल्या उदबत्तीच्या वासानेही आपले मन साधनेवरून विचलित होते. साधनेत मन रमण्याऐवजी उदबत्तीच्या वासाकडेच मन आकर्षित होते. त्यातच मन गुतुंन राहाते. त्या उदबत्तीच्या वासाचाच विचार मनात घोळू लागतो. यासाठी भानावर येऊन साधना करायला हवी. मन साधनेत रमण्यासाठी सोहमच्या आवाजावरच मन केंद्रित करायला हवे. म्हणजेच नाकाच्या शेंड्यावर मन अन् नजर दोन्हीही केंद्रीत करायला हवे. म्हणजे मनाला तो सोहमचा स्वर ऐकू येईल. त्याची जाणीव होईल. त्याची अनुभुती येईल. मन स्थिर होण्यासाठी हा उपाय जरूर करायला हवा.

आवाजामुळे मन विचलित होऊ नये यासाठी मनच स्थिर होणे गरजेचे आहे. ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले, असे म्हटले जाते. चंचलता हा मनाचा गुणधर्म आहे. हे विचारात घेऊन मनात विचारच उत्पन्न होणार नाहीत, यासाठी प्रयत्न व्हायला हवा. गुरुमंत्रावर मन स्थिर करायचा प्रयत्न करायला हवा. हळूहळू साधनेने हे शक्य होते. फक्त यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

मनाने जेव्हा आपण सोहमचा स्वर ऐकू लागतो. म्हणजेच आपण त्या शब्दात गुंततो. त्या स्वराचा स्पर्श आपणाला जाणवतो. म्हणजेच त्या स्वराची अनुभुती येते. त्या स्वराला रुप नाही तरीही आपल्या मनात त्याचे रुप उमटते. त्याला चव नाही तरीही त्या स्वराच्या रसाचा उमाळा फुटतो. त्या रसाच्या गोडीत आपले मन गुंतते. त्याला वास नाही तरीही आपल्या मनाला त्याचा गंध येतो. म्हणजेच ही सर्व पंचेंद्रियावर आपले नियंत्रण राहाते. जेव्हा आपण त्या स्वराची अनुभुती घेतो. यासाठी तो स्वर अनुभवण्याचा प्रयत्न सातत्याने करायला हवा. म्हणजेच आपले मन नियंत्रित होऊ शकेल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Neettu Talks : परफ्युम निवडताना…

अण्णा भाऊ साठे जागतिक दर्जाचे साहित्यिक: डॉ. बाबुराव गुरव

गुरूंची आवश्यकता कशासाठी ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading