February 29, 2024
Spirituality teaches us to live a worry-free life
Home » अध्यात्म चिंतामुक्त जीवन जगण्यास शिकवते
विश्वाचे आर्त

अध्यात्म चिंतामुक्त जीवन जगण्यास शिकवते

म्हणोनि तयाचे कांही । चिंती ना आपुला ठाई ।
तुझे पापपुण्य पाही । मीचि होईन ।। १४१२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – म्हणून तूं आपल्या ठिकाणी तुझ्या धर्माधर्मांविषयी काळजी करूं नकोस. तुझे पुण्यपाप मीचि होईन पाहा.

आपल्या पाठीशी कोणी तरी उभे आहे अशा विश्वास जेंव्हा असतो तेंव्हा आपण निर्धास्तपणे काम करत राहातो. यात आपणास अपेक्षित यशही प्राप्त होते. समोरच्या संकटावर मात करण्याचे सामर्थ्य आपल्यात राहाते. आपण सहजच सर्व गोष्टी धाडसाने करतो. सद्गुरु आपल्या पाठीशी आहेत या विश्वासावरच आपण खंबीरपणे उभे राहातो. सर्वकृतीवर सद्गुरुंचे बारीक लक्ष असते. शिष्याच्या सर्व चुका माफ करून त्याला सद्बुद्धी देण्याचे ते नित्य प्रयत्न करत असतात. बोधातून शिष्याला ते मार्गदर्शन करत असतात. याची जाणीव शिष्याला असल्यानेच शिष्य निर्धास्तपणे आपले काम करून त्यात यशस्वी होत असतो.

कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस असा विश्वास सद्गुरु देतात. तेंव्हा त्यांच्या सांगण्यात मोठा आधार असतो. मानसिकतेचा विचार केल्यास त्यांच्या बोलण्यातून मिळालेल्या आधारावर शिष्याची मानसिकताच पूर्ण बदलते. सद्गुरुंच्या आधाराने शिष्य मोठ्या धैर्याने काम करून यश मिळवतो. चिंतेने ग्रस्त असणाऱ्या या शिष्याची या यशाने सर्व चिंताच दूर होतात. इतके सामर्थ्य सद्गुरुंच्या शब्दात असते. जे होईल ते पाहाता येईल आत्ताचे सुरू असलेले कार्य मन लावून उत्तमप्रकारे करण्याचा निर्धार केल्याने मार्ग आपोआपच सापडत जातात. यातून एक स्पष्ट होते चिंतामुक्त जीवन जगण्यास अध्यात्म शिकवते. सर्व प्रथम मनातील सर्व चिंता, काळजी सोडून कामाला लागा असा सल्ला हे शास्त्र देते.

धकाधकीच्या जीवनशैलीत मनाची अवस्था बिकट होते. हे धकाधकीचे जीवन पूर्वीच्याकाळीही होते. फक्त त्याचे स्वरूप वेगळे होते. तत्कालिन परिस्थिती वेगळी होती पण समस्या तीच आहे. धकाधकीच्या जीवनात उपासमार, वेळेवर जेवण न होणे, उपलब्ध पदार्थ खाऊन भूक भागवणे अशा या जेवणाच्या प्रकारामुळे आरोग्य बिघडते. हे पूर्वीच्याकाळीही घडत होते. धकाधकीमुळे आधिच अनेक समस्यांनी आपण ग्रस्त असतो. त्यात अशा या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्येची अधिकची भर पडते. यावर मात करायची असेल तर जीवनशैलीचे योग्य नियोजन हाच उपाय आहे. पण तेही योग्य प्रकारे होऊ शकत नाही. यावर मात करण्यासाठी वेळ हा काढावा लागतो. चिंता सोडून आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करण्यानेच आपली प्रगती होईल.

चिंता हाच मोठा प्रश्न नव्या पिढीसमोर आहे. अभ्यासाची चिंता, नोकरीची चिंता, व्यवसायाची चिंता, घरातील विविध गोष्टींची चिंता अर्थात संसाराची चिंता या आपल्या जीवनात आपणास त्रस्त करत असतात. अशातून आलेल्या नैराश्येतून आत्महत्येचे पर्याय निवडले जातात. जीवनात आलेल्या नैराश्येतून अशी पाऊले उचलली जातात. ही समस्या दूर करायची असेल तर चिंतामुक्त जीवनशैली विकसित करण्याची गरज आहे. अतिहाव माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. यासाठी आहे त्यात समाधान मानून आनंदी जीवन जगणे हेच खरे सुखी जीवन आहे. अध्यात्म हेच शिकवते.

Related posts

साहित्य विचार आणि सन्मान संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी

आश्चर्यकारक ! कडा सर करणारा वीर

मुर्झाच्या संमेलनात झाडीबोलीचा जागर

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More