July 27, 2024
strength of human body with spiritual-self-knowledge
Home » आत्मज्ञानखड्गाने मानव देहाची बलाढ्यता
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानखड्गाने मानव देहाची बलाढ्यता

शस्त्रांनी देशाची बलाढ्यता सिद्ध होते. पण आत्मज्ञानाने मानव देहाची बलाढ्यता सिद्ध होते. शस्त्राने देश जगात बलाढ्य होईल. पण त्यात दहशत असेल. ही बलाढ्यता केव्हाही नष्ट होऊ शकते. पण आत्मज्ञानाच्या तलवारीने तुम्ही स्वतः जगापेक्षा बलाढ्य व्हाल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

ऐसा जरी थोरावे । तरी उपाये एके आंगवे।
जरी हातीं होय बरवे । ज्ञानखड्ग ।। २०७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ४ था

ओवीचा अर्थ – एवढा जरी तो वाढला, तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरुप खड्ग जर हाती असेल.

कोणताही उद्योग करताना त्याचे सर्वांगीण ज्ञान असणे आवश्यक आहे. तरच त्यामध्ये यश येते. शेतकऱ्याला पीक घेताना त्या पिकाची सर्व माहिती असायलाच हवी. रब्बीतील गहू खरिपात घेतला तर काय होते ? कोणत्या हंगामात कोणती पिके येतात. उत्पन्न वाढीसाठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. आजकाल हरितगृहांमुळे कृत्रिम वातावरणाची निर्मिती करून पिके घेतली जात आहेत. उत्कृष्ट दर्जाची उत्पादने घेण्यासाठी कोणते तंत्रज्ञान आवश्यक आहे. हे जाणणे गरजेचे आहे. यामुळे तो तोट्यात जाणार नाही.

सध्यस्थितीत नेमके हेच घडत नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारावर शेती केली जात आहे. पारंपरिक शेतीतून शेतकरी अद्यापही बाहेर पडलेला नाही. कष्ट करण्याची त्याची मानसिकता नाही. तसे प्रयत्नच केले जात नाहीत. यामुळे उत्पन्न म्हणावे तसे मिळत नाही. उपलब्ध साधनांच्या मदतीने जास्तीत जास्त नफा कसा कमविता येईल. हे अभ्यासणे आवश्यक आहे. विचार, चिंतन, मनन हे होतच नाही. सध्या व्यापारी दृष्टीकोन ठेवून शेती करायला हवी. जग बदलले आहे. झपाट्याने बदलत्या या जगात तरायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर ही ज्ञानाची तलवार हाती असणे आवश्यक आहे. पण तलवार ही धारदार असावी. तिला गंज चढलेला नसावा. ती वापरण्यास योग्य असावी.

ज्ञान आहे पण अद्ययावत नसेल तर काय उपयोग. सध्याच्या युगात, काळात उपयोगी असणारे ज्ञान आवश्यक आहे. सध्याच्या युगात चालणारी ज्ञानाची तलवार आत्मसात करायला हवी. संरक्षणासाठीची शस्त्रे बदलली. काळानुरूप त्यामध्ये बदल झाला. आता अण्वस्त्रे आली आहेत. ही अस्त्रे ज्याच्याकडे तो देश बलाढ्य समजला जात आहे. पुढील काळात आणखी नवी शस्त्रे, अस्त्रे येतील.

व्यवहारातील प्रगतीसाठी जसे ज्ञान हवे. तसे आध्यात्मिक प्रगतीसाठीही सर्वांगीण ज्ञानाचीच गरज आहे. आत्मज्ञानाची ही तलवार आत्मसात करायला हवी. यासाठी आवश्यक असणारे चिंतन, मनन, ध्यान याचा अभ्यास करायला हवा. विचारमंथन, पारायणे करायला हवीत. ते ज्ञान काय आहे हे जाणून घ्यायला हवे. अंधश्रद्धेने कोणत्याही गोष्टी करू नयेत. फसवणूक होऊ नये यासाठी हे सर्व गरजेचे आहे. शस्त्रांनी देशाची बलाढ्यता सिद्ध होते. पण आत्मज्ञानाने मानव देहाची बलाढ्यता सिद्ध होते. शस्त्राने देश जगात बलाढ्य होईल. पण त्यात दहशत असेल. ही बलाढ्यता केव्हाही नष्ट होऊ शकते. पण आत्मज्ञानाच्या तलवारीने तुम्ही स्वतः जगापेक्षा बलाढ्य व्हाल. या बलाढ्यतेमध्ये शांतीचा पुरस्कार असेल. आणि हे शस्त्र केव्हाही नष्ट होणारे नाही. यासाठी कोणत्या शस्त्राने बलाढ्य व्हायचे हे आपणच ठरवायला हवे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण अनुकूल

…यासाठीच नको विदेशी वृक्षांची लागवड

दिवाळी हरवत चालली आहे !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading