September 7, 2024
Success should be achieved only by facing the situation
Home » परिस्थितीशी सामना करूनच मिळवावे यश
विश्वाचे आर्त

परिस्थितीशी सामना करूनच मिळवावे यश

हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला ।
हा सांगे बोलु उरला । निकाकायी ।। २०८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा

ओवीचा अर्थ – ते म्हणतील, हा पळाला रे पळाला. अर्जुन आम्हांला भ्याला, असा दोष तुझ्यावर राहीला तर ते चांगले का ? सांग.

आत्मज्ञानाच्या ओढीने प्रयत्न करत असताना साधकाला अनेक समस्या भेडसावत असतात. गुरुंचा शोध अन् शोधानंतर अनुग्रहासाठी अभ्यास यातही अनेक अडचणी येत असतात. प्रत्यक्षात सद्गुरुंनाच आज्ञाधारक अन् चिकाटीने अभ्यास करणारा शिष्य हवा असतो. अशा शिष्याच्या शोधात ते असतात. गुरुंचा शोध संपतो तेंव्हा आपल्यामध्ये आपोआपच मोठा बदल घडतो. गुरुभेटीतच शोधातून आलेला थकवा दूर होऊन एक आत्मिक शांती-समाधान प्राप्त होते अन् गुरुंच्या अनुग्रहानंतर आत्मज्ञानाची ओढ तीव्र होते.

या सर्व घटनात आपल्या कार्यात व्यत्यय आणणारेही खूप असतात. आसपासचे वातावरण आपणास पोषक असतेच असे नाही. एखाद्याचे चांगले होत असेल तर अनेकांना ते पाहावत नाही. स्वतःचा स्वार्थ पाहाणारेही आपल्या कार्यात अडचणी निर्माण करतात. अल्पसंतुष्टवृत्तीची ही माणसे असमाधानी तर असतातच पण त्याबरोबरच अज्ञानीही असतात. आपले कार्य सिद्धीस न्ह्यायचे असेल तर कठोर अंतकरणाने हा त्रास आपणाला सहन करावा लागतो. आपल्यावर टीका करून ते आपणास भडकवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या कामात खोडा घालण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांना फक्त आपली साधना भंग करायची असते. आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही, यासाठीच त्यांचा प्रयत्न असतो. अशावेळी आपण रणभुमी सोडून पळून जाणे योग्य आहे का ? असे केले तर उलटा अधिकच त्रास होईल, याचा विचार करायला हवा अन् लढायला तयार राहावे.

बाह्यजगताचा विचार करताना अंर्तजगताचाही विचार असाच करायला हवा. आपल्या साधनेत व्यत्यय आणणारे विचार, विकार आपल्या मनात उत्पन्न होत असतात. आपले मन इतरत्र भरकटावे असे प्रयत्न या विकारांकडून होत असते. काम, क्रोध, लोभ, माया अशा या विकारांनी साधनेमध्ये नेहमीच व्यत्यय येत असतो. यावर मात करण्यासाठी यांच्याशी लढायला तयार राहायला हवे. यांना सोडून देऊ तर ते आपणास कधीही माफ करत नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. यांना सोडून न देता यांच्याशी दोन हात करण्यासाठी उभे राहील्यास आपोआपच ते माघार घेतात. पण यांना भिऊन आपण पळू लागलो तर ते आपणास अधिकच त्रस्त करतात. मानसिक संतूलन ढळू न देणे हाच यावरचा उपाय आहे.

शत्रूला कधी पाठ दाखवून पळून जायचे नसते. तसे केल्यास तो आपला पाठलाग करतो, अन् आपणाला गाठून संपवतो. यासाठीच परिस्थितीशी सामना करण्याचा विचार सदैव ठेवायला हवा. लढताना यश-अपयश हे येतच असतात. जीवनात चढ-उतार हे येत असतात. कधी प्रचंड प्रगती होते, तर कधी कधी अधोगतीशी सामना करावा लागतो. या परिस्थितीत झालेल्या चुका टाळून त्या कशा कमी करता येतील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे केल्यास प्रगती साधते. साधनेत येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी होणाऱ्या चुका शोधून त्या दुरूस्त करण्याचा प्रयत्न करायला हवा. असे केल्यास साधनेत प्रगती निश्चितच होते, अन् अपेक्षीत यशही प्राप्त होते.

राजेंद्र जलादेवी कृष्णराव घोरपडे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

रत्नागिरीतील किल्ल्यांच्या इतिहासाचा तपशीलवार आढावा

सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी बालकविता

उडदाचे दर कमी होण्यास सुरुवात, पावसामुळे खरिपाच्या लागवड क्षेत्रात वाढ

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading