नवीन शिडी उभी करायची तर जुनी शिडी बाजूला करणे आवश्यक होते. हे काम खूपच धोकादायक असल्याने काळजीपूर्वक करावे लागणार होते. वाहतूक कठीण असल्याने साहित्य मर्यादित आणावे लागले. जुनी शिडी बाजूला करताना तोल जाऊन दरीत पडण्याची मोठी भीती होती. एका क्षणी जुनी शिडी उलटी करताना एका कामगाराचा तोल गेला आणि तो दरीत कोसळणार एवढ्यातच प्रसंगावधान राखत बाजूच्या कामगाराने पाठच्या बाजूने त्याचा शर्ट पकडल्याने तो बचावला.
जे . डी . पराडकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण भागात उभारलेल्या गड किल्ल्यांपैकी ज्या गडाचा आवर्जून उल्लेख केला जातो , तो म्हणजे प्रचितगड. ज्याला स्वतः मध्ये असलेल्या साहसाची प्रचिती घ्यायची आहे त्याने हा गड चढून पहावा . कदाचित साहसाच्या या प्रचितीमुळेच महाराजांनी या गडाचे नाव प्रचितगड ठेवले असावे. सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगेत एका बाजूला संगमेश्वर तालुक्याच्या हद्दीत हा गड आहे . सह्याद्रीच्या उंच शिखरावर असलेल्या या गडाचा उल्लेख मला ‘सह्याद्रीचा मुकुटमणी’ असा करावासा वाटला यालाही तितकेच महत्वाचे कारण आहे. कमी विस्तार असलेल्या या गडावर भवानीमातेचे छोटे मंदिर आणि कातळात खोदलेले थंड पाण्याचे कप्पे आहेत.
तीन जिल्ह्यांच्या हद्दीवर लक्ष ठेवणारा हा स्वराज्यातील अत्यंत सुरक्षित गड असल्याने हा सह्याद्रीचा मुकुटमणीच ठरतो. प्रचितगडावर जाण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातून दोन मार्ग आहेत. एक मार्ग शृंगारपूरमधून आहे. तो साडेतीन तासांच्या प्रवासाचा मात्र अत्यंत धोक्याचा तर नेरदवाडीतून दुसरा मार्ग आहे तो संपूर्ण जंगलमय भागातून जातो. या मार्गावरून जाण्यासाठी सहा तासांची पायपीट करावी लागते. प्रचितगडावर पोहचण्यासाठी जो शेवटचा टप्पा आहे तेथे असणारी शिडी ही अक्षरशः जीवघेणी होती. या शिडीच्या सहा पायऱ्या तुटून गेल्या होत्या. इतिहासप्रेमींना शिडीवरुन जाताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन गडावर जावे लागत होते. याबाबतचे वृत्त मी प्रसिध्द करताच चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी तातडीने या वृत्ताची दखल घेऊन शिडी तयार करण्यासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करून दिला. शृंगारपूर येथील गडप्रेमी विनोद म्हस्के यांनी अत्यंत जोखीम पत्करून हे काम नुकतेच पूर्ण केले. आमदार शेखर निकम , शिडीचे काम करणारे विनोद म्हस्के , कारागीर प्रकाश चाळके , संपत पवार हे शिवरायांना अभिप्रेत असणारे खरे मावळे होत.
प्रचितगडावर जाण्यासाठी असणाऱ्या धोकादायक शिडीबाबतचे वृत्त प्रसिध्द करताच केवळ आठवडाभरात याची दखल घेणारे आमदार शेखर निकम हे मी अनुभवलेले पहिलेच लोकप्रतिनिधी होय. प्रचितगडाच्या विकासाबाबत मी गेली दहा वर्षे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होतो. ऑक्टोबर २०२१ मध्ये काही शिवप्रेमी प्रचितगडावर गेले होते. त्यांनी गडावर जाण्यासाठी असणाऱ्या धोकादायक शिडीचा फोटो सोशल मिडियावर टाकला होता. आता तर एक एक करत या शिडीच्या सहा पायऱ्या तुटून दरीत पडल्या होत्या. एकावेळी एक व्यक्तीच या शिडीवरून जीव मुठीत घेऊन जाऊ शकत होती. शिडीवरून जाताना ती जोरात हलत असल्याने अपघात घडण्याचा मोठा धोका होता. पायरी तुटली तर थेट खोल दरीत कोसळण्याची मोठी भीती होती. शिडीची ही दुरावस्था पाहून मन विषण्ण झाले. परत एकदा लेखणीची ताकद अनुभवण्यासाठी वृत्त प्रसिध्द केले आणि काय आश्चर्य आठवडाभरात आमदार शेखर निकम यांचा मला फोन आला. आपण प्रसिध्द केलेल्या वृत्ताची मी दखल घेतली असून प्रचित गडावर जाण्यासाठी नवीन मजबूत शिडी उभारण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करावा यासाठी पत्र दिल्याचे सांगितले. इतिहासाबद्दल बेगडी प्रेम व्यक्त करण्यापेक्षा आपले कर्तव्य म्हणून कृती करावी याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवणारे लोकाभिमुख आमदार म्हणजे शेखर निकम , याची प्रचिती मला या प्रसंगातून आली.
इतिहासाबाबत राजकारण करूच नये , राजकीय पक्षदेखील पाहू नये असे म्हटले जाते. मात्र त्यावर कृती होत नाही. आमदार शेखर निकम यांनी निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपले हे अनेक कृतींमधून दाखवून दिले आहे. निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा साऱ्या जनतेचा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेखर निकम. काही कालावधीनंतर आमदार शेखर निकम यांचा मला परत फोन आला ते म्हणाले, प्रचितगड शिडी उभारणीसाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. हे सांगताना हे काम मी केले , यासाठी मी वेगळे प्रयत्न केले असा आविर्भाव बोलण्यात कोठेही नव्हता. ते नेहमी जसे बोलतात तसेच बोलले , ‘ मी शेखर बोलतोय प्रचितगड शिडीबाबत आपण जे वृत्त दिले होते त्याकरिता दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे . आपण वृत्त प्रसिध्द केल्यामुळे ही महत्वाची बाब माझ्या लक्षात आली लोकप्रतिनिधीजवळ एवढा विनय हे अपवादात्मक असल्याचे अनेकांचे अनुभव असतात. माझे सहकारी संजय कदम आणि अमित सुर्वे हे आपल्याला शिडीसाठी मंजूर झालेल्या निधीची कागदपत्रे पाठवतील आणि संपर्कातही राहतील असे निकम यांनी सांगितले. अशा प्रकारे काम करण्याची पध्दत पूर्वी गुहागरचे माजी आमदार डॉ . विनय नातू यांची होती . या प्रसंगामुळे मला त्यांची आठवण झाली.
प्रचितगडावर जाण्यासाठी आता नव्याने शिडी उभारली जाणार याची खात्री झाली . शिडी उभारणीसाठी निविदा देखील निघाली. अन्य वेळी निविदा घेण्यासाठी उडणारी झुंबड किंवा सामंजस्य येथे मात्र पहायला मिळाले नाही . काम अत्यंत जोखमीचे , प्रसंगी जीवावर बेतणारे आणि आर्थिक लाभ होण्याऐवजी नुकसान करणारे असल्याने ठेकेदारांची झुंबड उडाली नाही . अखेरीस या धाडसी कामासाठी पुढे आला तो वाघाचे काळीज असणारा शृंगारपूर या ऐतिहासिक गावातील विनोद म्हस्के. हा युवक असंख्य वेळा प्रचितगडावर जाऊन आलेला असल्याने त्याला या गडाबद्दल विशेष आस्था. त्यातच तो छत्रपतींच्या सासुरवाडीच्या गावातील त्यामुळे शिवरायांचा खराखुरा मावळा. विनोदने शिडी उभारण्याच्या कामाची जबाबदारी स्वीकारली आणि कामाच्या शुभारंभाचा दिवसही ठरला . मन खूप आनंदित झाले . आमदार निकम यांनी शृंगारपूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित रहाण्याचे निमंत्रण मला स्वतः फोन करून दिले . या कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांनी आपण टप्प्याटप्याने ऐतिहासिक स्थळे विकसित करण्यासाठी आणि येथील पर्यटन विकसित होण्यासाठी निधी देणार असल्याचे जाहीर केले आणि त्यांच्या या वक्तव्याचा अभिमान वाटला . शिडीचे काम करणाऱ्या विनोद म्हस्के याने या कार्यक्रमात जाहीर केले की मला कितीही त्रास झाला आणि माझ्या खिशातील पैसे खर्च झाले तरीही मी मागे हटणार नाही . मात्र शिडीचे काम अत्यंत दर्जेदार पध्दतीने पूर्ण करेन .
छत्रपतींचा मावळा विनोद म्हस्के , पाचांबे सरपंच संदेश घाडगे , तिवरे गावचे संतोष गुरव हे प्रचितगडावर पोहचले आणि नवीन शिडी कशी उभी करता येईल , याचे सर्वेक्षण करून आले . साहित्य जागेवर नेण्याचे नियोजन करण्यात केले . शिडीची उभारणी करण्यासाठी साताऱ्या पासून दोन तीन ठिकाणचे अनुभवी वेल्डर घेऊन विनोदने त्यांना प्रचितगडावर नेले . मात्र दरीतील पहिली गंजलेली शिडी हटवून नवीन शिडी उभारण्याची जोखीम घ्यायला कोणीही तयार होईना . यामागचे कारण देखील तसेच होते. काम करताना जरा देखील चूक झाली तर थेट दरीत कोसळून मृत्यू होण्याची मोठी भीती होती . वेल्डर मिळत नाही म्हणून विनोदने धीर सोडला नाही . प्रचितगडावरील भवानी मातेचे स्मरण करून त्याने वेल्डरचा नव्याने शोध सुरू केला . अखेरीस पातरपुंज गावातील प्रकाश चाळके आणि त्यांचा सहकारी संपत पवार हे शिडी उभारण्याचे काम पहायला आले आणि जोखीम असली तरी इतिहासप्रेमींसाठी त्यांनी ही जोखीम मोठ्या धाडसाने पत्करताच विनोदला कमालीचा आनंद झाला. आता साहित्याची जमवाजमव करायची तयारी सुरु झाली . पहिली शिडी लोखंडी असल्याने गंजली होती. आता स्टील धातू मध्ये न गंजणारी शिडी बनवायचे ठरवण्यात आले.
कोयना – चांदोली व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत प्रचितगड मार्ग येत असल्याने येथे साहित्याची वाहतूक करण्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. यासाठी आमदार शेखर निकम यांनी वनाधिकारी उत्तम सावंत तसेच हेळवाक येथील वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या महत्वपूर्ण कामाबाबत कल्पना देताच वनाधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केले. याबरोबरच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मठपती , उप अभियंता पोंगळे , कनिष्ठ अभियंता बाबा इंदूलकर यांनी शिडीच्या कामाबाबत विनोदला स्वातंत्र्य दिले . अधिकारी वर्गाने मनात आणले तर , अशक्य काम देखील शक्य होऊ शकते याची प्रचितीच या कामातून आली. सलग तीन दिवस अथक मेहनत घेतल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी योग्य मुहूर्तावर शिडीचे काम पूर्णत्वास गेले . या कामासाठी जनरेटर आवश्यक होता , मात्र तो गडापर्यंत नेणे शक्य नसल्याने गडापासून एक किमी दूर अंतरावर ठेवावा लागला . तेथून एक किमी लांब केबल आणून शिडीचे काम हाती घेण्यात आले. प्रकाश चाळके या वेल्डरनी अत्यंत कौशल्यपूर्ण काम केले आहे. शिडीला खालून आधार देण्यासाठी कातळात पाईपचा आधार दिला आहे. कातळाला छिद्र करून त्यात लिक्वीड टाकून आणि फासनर मारुन मजबूती आणली आहे.
नवीन शिडी उभी करायची तर जुनी शिडी बाजूला करणे आवश्यक होते. हे काम खूपच धोकादायक असल्याने काळजीपूर्वक करावे लागणार होते. वाहतूक कठीण असल्याने साहित्य मर्यादित आणावे लागले. जुनी शिडी बाजूला करताना तोल जाऊन दरीत पडण्याची मोठी भीती होती. एका क्षणी जुनी शिडी उलटी करताना एका कामगाराचा तोल गेला आणि तो दरीत कोसळणार एवढ्यातच प्रसंगावधान राखत बाजूच्या कामगाराने पाठच्या बाजूने त्याचा शर्ट पकडल्याने तो बचावला. भवानी मातेनेच रक्षण केले आणि बळ दिले असे मानून विनोद म्हस्के याच्यासह सर्वांनी भवानी मातेला नमस्कार करून परत मोठ्या शक्तीने कामाला सुरुवात केली . गड परिसरात श्वापदांचा वावर असल्याने मोठी भीती होती . सुदैवाने गडावर कातळाच्या कप्प्यात थंड पाणी असल्याने पाण्याची मुबलक उपलब्धता झाली . सलग तीन दिवस प्रचितगडावर राहून शिडीचे काम प्रकाश चाळके आणि त्यांचे सहकारी संपत पवार यांनी मोठ्या जिद्दीने आणि धाडसाने पूर्ण केले . तीन दिवस एकूण २५ माणसे शिडी उभारण्याच्या कामासाठी मेहनत घेत होती . अखेरीस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे काम पूर्ण झाले आणि एक नव्या इतिहासाची नोंद झाली . या कामात भले आपले नुकसान झाले तरी चालेल मात्र प्रचितगडावर जाण्यासाठी मजबूत शिडी उभारायचीच असा आपण निश्चय केला होता . या गडावर पूर्वी आपण वाटाड्या म्हणून अनेकदा गेलो आहोत , आता गडाच्या शिडीचे काम करण्याची संधी मिळाली हा भवानी मातेचा आशीर्वाद समजून गडाची वाट बंद पडू नये अथवा एखाद्या इतिहास प्रेमीचा शिडीवरून जाताना जीव धोक्यात येऊ नये यासाठीच आपण या कामाची जबाबदारी घेतल्याचे विनोद म्हस्के याने नम्रपणे सांगितले .
आमदार शेखर निकम यांच्यासारखे समाजभान असणारे लोकप्रतिनिधी असतील तर खरंच अशक्य ते शक्य करून दाखवता येऊ शकते हेच प्रचितगडाच्या नवीन शिडी उभारण्याच्या कामाने दाखवून दिले आहे . कसबा ते नायरी – शृंगारपूर पर्यंत दुर्लक्षित असणारी ऐतिहासिक ठिकाणे विकसित करण्याचा आणि या भागात पर्यटकांना मोठ्या संख्येने वळविण्याचा प्रयत्न आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून सुरू आहे हे नक्कीच अभिनंदनीय आहे . विनोद म्हस्केंसारखे तरुण अशा आव्हानात्मक कामांसाठी स्वतःहून पुढे येत आहेत हे अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे . संगमेश्वर येथील व्यापारी सुशांत कोळवणकर आणि त्यांच्या मित्रमंडळींनी काही वर्षांपूर्वी प्रचितगडावर असणाऱ्या भवानीमाता मंदिरावर पत्र्याचे छप्पर घातले होते . मात्र जबरदस्त वारा आणि पाऊस यामुळे हे छप्पर गंजून उडून गेले . आता या भवानीमाता मंदिरावर मजबूत छप्पर करण्याची आस विनोदला लागली आहे . पर्यटन विकासच्या माध्यमातून मंदिरावर छप्पर करण्याची मागणी शृंगारपूर , नायरी येथील ग्रामस्थ आमदार शेखर निकम यांच्याकडे करणार आहेत . तूर्तास प्रचितगडावर जाण्यासाठी मजबूत शिडी उभारण्यात आली हे नक्कीच कौतुकास्पद आहे . आमदार शेखर निकम , विनोद म्हस्के यांना यासाठी धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत .