तारा कादंबरीत बुद्धाच्या मध्यम मार्गाचे भावपूर्ण दर्शन घडते – प्रा. दामोदर मोरे
कल्याण – ” कोणत्याही स्वरुपाचा अतिरेकी दृष्टिकोण हा दु:खाला जन्म देत असतो. बुद्धाच्या मध्यम मार्गाचे अनुसरण केले तर माणूस अनेक जटिल समस्या सहज सोडवू शकतो. दु:खमुक्तीच्या दिशेने जात सफल आणि सुखी जीवन कसे जगू शकतो त्याचे भावपूर्ण दर्शन ” तारा ” या कादंबरीत घडते ” असे प्रतिपादन मराठी हिंदी साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांनी केले.
सुधीर भालेराव यांच्या तारा या कादंबरीचा प्रकाशन समारंभ सर्वोदय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. प्रा. मोरे पुढे म्हणाले कि “तारा” ही या कादंबरीतील संघर्षनायिका आहे. तिला सम्यक दृष्टी आहे. ती जे समाज हितकारी सम्यक संकल्प करते. ते ती धाडसीपणे सिद्धीस नेते. स्त्रिया सक्षम, स्वावलंबी झाल्या पाहिजेत. त्यांनी स्वत: स्वत:चा उद्धार केला पाहिजे. असा संदेश ही कादंबरी देते. कायदा हातात न घेता सनदशीर मार्गाने एखादी स्त्री समस्या कशा सोडवते त्याचा आदर्शच ताराच्या रुपाने लेखकाने उभा केला आहे.”
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी या कादंबरीतील काही प्रसंगावर भाष्य करुन लेखक भालेराव यांचे अभिनंदन केले. माजी शिक्षणाधिकारी सिद्धार्थ मोरे , कादंबरीचे प्रकाशक व्यंकटेश कल्याणकर ,आयु. शिवतारे यांचीही या प्रसंगी समयोचित भाषणे झाली.
लेखक सुधीर भालेराव यांनी कादंबरी लेखनाची प्रेरणा आपणास कशी मिळाली ते आपल्या मनोगतातून विशद केले. प्रियांका सपकाले- इंगळे, डॉ प्रियांका पगारे तायडे, प्रिया पगारे – शिरतुरे, साक्षी धोत्रे, सिंधु तायडे आणि रंजना गजरे – अवकाले या गुणवंत महिलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास साहित्यिक शिवा इंगोले, जीवन संघर्षकार कवी नवनाथ रणखांबे उपस्थित होते. समाधान मोरे यांनी या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.