April 24, 2024
The thought of Swarajya creates Swarajya
Home » स्वराज्याचा विचारच स्वराज्य उभे करतो
विश्वाचे आर्त

स्वराज्याचा विचारच स्वराज्य उभे करतो

आइका आकाश गिंवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें ।
म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारितां ।। ६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १ ला

ओवीचा अर्थ – हे पहा, आकाशाला कवळायाचे असल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजें, म्हणूनच हे सर्व करणे, विचार केला असता, माझ्या योग्यते बाहेरचें आहे.

आपले विचार हे नेहमी मोठे अन् उच्च असावेत. मोठे होण्याचेच स्वप्न पाहायचे. इच्छा, आशा, आकांक्षा, ध्येय हे मोठेच ठेवायचे. छोटीशी आशा आकाशाला आव्हान देऊ शकत नाही. मोठे व्हायचे स्वप्न पाहाताना तसे नियोजनही मोठेच करावे लागते. तशी विचाराची उंचीही वाढते. हा विचारच आपणाला प्रोत्साहित करत असतो. अधिकारी व्हायचे असेल तर, अधिकाऱ्यासारखे वागण्याचा प्रयत्न करायला नको का ? चालण्यात, बोलण्यात, वागण्यात हा फरक व्हायलाच हवा. पण हे सर्व मर्यादा ठेवून असायला हवे. काम करण्याची पद्धती बदलायला हवी, तरच त्यात मोठेपण दिसू लागेल. कारण कोणतीही व्यक्ती ही कर्माने मोठी ठरत असते. नुसता रुबाब दाखवून कोणी मोठे ठरत नसते. या गोष्टीचीही जाणीव ठेवायला हवी.

स्वराज्य उभे करायचे आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य कसे उभे केले याचा अभ्यास करायला नको का ? शहाजीराजांनी स्वराज्य संकल्पना मांडली. ते स्वप्न पाहीले. अन् राजमाता जिजाऊ यांना शिवाजीसह पुण्याला धाडले. चाकरी करायचा विचार मोडून स्वतःचे अस्तित्व, स्वतःचे वैभव उभे करण्याचा विचार केला. म्हणजेच स्वराज्य उभे करण्यासाठी मनामध्ये तसा विचार उत्पन्न व्हायला हवा म्हणजे आपोआपच मनाची विचार करण्याची पद्धती बदलते. शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक उद्योगपतींच्या यशोगाथाही अशाच विचाराने प्रेरीत आहेत. ज्या यंत्रावर आपण काम करतो ते यंत्र स्वतः खरेदी करून स्वतःचा उद्योग आपण का उभारू नये ? असा प्रश्न, असा विचार जेंव्हा मनात डोकावतो तेंव्हाच तो स्वतःच्या पायावर उभा राहातो.

स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे तर तसे स्वतःचे महत्त्व वाढवायला हवे. त्याप्रमाणे विचार करायला लागलो तरच ते कृतीत उतरेल. आजकाल हवा करून मोठे झालेल्यांची अनेक उदाहरणे देता येतील. लाटेवर स्वार होऊन मोठे झालेले लाटेबरोबरच संपतात, हे ही लक्षात घ्यायला हवे. हवा संपली की त्यांचेही अस्तित्व संपते. असे का होते ? कारण ते स्वतःच्या पायावर उभे नव्हते. स्व बळावर त्यांनी साम्राज्य उभे केले नव्हते. पायाच भक्कम नसेल तर मोठी इमारत किती वर्षे टिकणार ? यासाठी पायाच भक्कम उभा करावा लागतो. तो उभा करण्यासाठी मोठे कष्ट पडले तरी ते झेलण्याचे सामर्थ्य आपल्यात असायला हवे.

लाचारी पत्करून मोठी पदे मिळवता येतात. पण त्या पदावर काम करताना मर्यादा येतात. अशी माणसे कधी प्रतिभावंत होत नाहीत. प्रतिभावंताजवळ स्वतःचे असे एक वेगळे वलय असते. हा व्यासंग आपोआप तयार होत असतो. तो उत्स्फुर्तपणे तयार झालेला असावा लागतो. सध्या असे व्यासंगी व्यक्तीमत्वे खूपच कमी पाहायला मिळतात. व्यासंग असल्याचे भासवून मोठे होणारीच आजकाल अधिक आहेत. उत्स्फुर्तपणे निर्माण झालेले वलय एकाएकी नष्ट होण्याचा संभव नसतो. खरेतर ते नष्टही करता येत नाही. यासाठीच कृतीतून मोठे व्हायला हवे. तसे विचार मग आपोआपच आपल्यात निर्माण व्हायला हवेत. मोठे स्वप्न सत्यात उतरण्यास फार कालावधी लागत नाही. फक्त तसा विचार कृतीत आणायला हवा. मग आपोआपच स्वराज्य उभे राहाते.

आकाशाला कवटाळायचे, आकाश आपल्यात सामावे असा विचार जेंव्हा आपण करतो तेंव्हा आपण आकाशा ऐवढे मोठे होण्याचा विचार हा ठेवावा लागतो. हा विचारच आपल्यात योग्य ती कृती निर्माण करतो. योग्य तो बदल घडवतो. भले यात एकदा अपयश येईल, दोनदा अपयश येईल, असे दहादा अपयशी होईल पण एकदातरी निश्चितच यशाचे शिखर गाठता येईल. एकदा त्या शिखरावर गेल्यानंतर पुन्हा उतरती कळा लागत नाही कारण अनेक अपयश पचवून तेथे पर्यंत पोहोचलेलो असतो. हा अनुभवच हे यश शाश्वत, अमर करत असतो. म्हणूनच मोठी स्वप्न पाहायला शिकावे. तेंव्हाच ती पूर्ण करण्याची उर्मी अंगात भरेल अन् आपल्यात तसे विचार उत्पन्न करेल. यातच आपला खरा व्यक्तिमत्व विकास होत असतो.

Related posts

अवकाळीच्या वल्गनाकडे दुर्लक्ष करा

सक्युलंटची काळजी कशी घ्यायची ?

नव्या शब्दकळेनं नटलेल्या ग्रामीण कथा

Leave a Comment