April 14, 2024
poet-suresh-mohite-poem-in-delhi-conference
Home » कृष्णाकाठची कविता घेऊन कवी सुरेश मोहिते निघाले दिल्लीला….
मुक्त संवाद

कृष्णाकाठची कविता घेऊन कवी सुरेश मोहिते निघाले दिल्लीला….

बहे…. इस्लामपूर… कृष्णा काठी वसलेला गाव…कृष्णेचा विस्तार इथे खूप मोठा आहे…. जवळपास चारशे मीटर लांबीचा पूल… पूर्वेला रामलिंग बेट… दोन्ही बाजूंनी संथपणे वाहणारी कृष्णामाई…. याच गावचा कवी मित्र सुरेश मोहिते…ताजे मासे आणि सुरमई कविता ऐकायची हुक्की आली की सुरेशला फोन करायचा…इस्लामपूरातून सवड असेलच तर प्रा एकनाथ पाटील सोबतीला…. एक पूर्ण दिवस राहून त्याचा जगावेगळा पाहुणचार घेऊन चक्क कृष्णाकाठावर रात्रीच्या टिपूर चांदण्यात सुरेशकडून त्याची नदी कविता ऐकणं हा एक विलक्षण अनुभव आहे….
नदी हासरी.. नदी बोलकी…. नदी वाहते संथपणाने… त्या नदिचा डोह गहिरा… गहिरा खोल पाणी….

या ओळी म्हणताना त्यातील गहिरा… गहिरा हे शब्द सुरेशच्या कंठातून आणखी गहिरे होऊन बाहेर पडतात….

तीरावरल्या मंदिरातूनी घंटानादे पहाट उमलते….
नदी शुभ्र प्राजक्त सुरांनी हळूवार भूपाळी गाते….

या ओळी गातांना सुरेशची जी तंद्री लागते.. त्यातून घंटानाद ऐकायला येतोय…उमलणारी पहाट आणि शुभ्र प्राजक्त सुरातलं नदीचं गाणं आपल्याला चांदण्यात चिंब भिजवून जातं…

नदी ही सुरेशची अत्यंत गाजलेली आणि मैलाचा दगड ठरलेली एक नितांतसुंदर कविता आहे..ही कविता आठवली याचं एक अभिमान वाटावं असं कारण आहे…
भारत देशाचे सांस्कृतिक मंत्रालय आणि साहित्य अकादमी आयोजित” साहित्योत्सव” कार्यक्रमासाठी सुरेशला ११ मार्च ते १६ मार्च २०२४ या कालावधीत सात दिवसांसाठी जाता येताचं विमान तिकीट देऊन आमंत्रित केले आहे….सात दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात सुरेश आपली कृष्णामाई सोबत घेऊन मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीला निघालाय….
क्षमता असूनही उपेक्षा वाट्याला आलेला तो हुनरवाला कवी आहे….कळप आणि चाटूगिरीचा संसर्गजन्य रोग मराठी साहित्य विश्वात वेगाने पसरतोय…सरकारी साहित्य संस्थाही त्याला अपवाद नाहीत तथापि या सगळ्याला फाट्यावर मारून सुरेश शेती आणि कवितेच्या प्रांतात रमलेला अस्सल कवी आहे… त्याचं हे कवीपण जपणारे रसिक आणि नव्याने गठीत झालेल्या लेखक विश्वास पाटील यांच्यासारख्या अकादमी सदस्यांनी सुरेशला ही संधी उपलब्ध करून दिली आहे….कृष्णा आणि कृष्णाकाठच्या दर्जेदार कवितेचा हा सन्मान आहे….

Related posts

कातळशिल्पांची अभ्यासपूर्ण माहिती असलेले पुस्तक

निसर्ग-थोर कलावंत

मन हा मोगरा !

Leave a Comment