October 4, 2023
Ganesh Festival special article on Dnyneshwari by Rajendra Ghorpade
Home » आत्मरुपी गणेश…
विश्वाचे आर्त

आत्मरुपी गणेश…

श्रीगणेशा हा आत्मरुपाच्या अनुभुतीपासून करायला हवा. येथून प्रारंभ केल्यानंतर सर्व विचार आत्मसात होतात. सर्व शक्तींची ओळख होते. सर्व विद्यांचे ज्ञान होते. सर्व विद्या हस्तगत होतात. यासाठी या आत्मरुपाचे नित्य स्मरण ठेवून त्याची आराधना करायला हवी. यासाठीच साधना आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

आत्मरुप गणेशु स्मरण । सकल विद्यांचे अधिकरण ।
तेचि वंदू श्रीचरण । श्रीगुरुंचे ।। 1 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरुप गणेशाचे स्मरण तेच श्रीगुरुंचे श्रीचरण होय त्यास नमस्कार करू.

सृष्टीची निर्मिती कशी झाली ? परग्रहावर सजीव सृष्टी आहे का ? ग्रहांची निर्मिती कशी झाली ? अवकाशातील पोकळी कुठे संपते ? अशी विज्ञानाची अनेक प्रश्ने अनुत्तरित आहेत. या प्रश्नांची उकल झाली नाही. यासाठी शोध सुरुच आहे. विविध प्रयोग केले जात आहेत. पण अद्याप बऱ्याच गोष्टींचा उलघडा होऊ शकलेला नाही. असे म्हणतात विज्ञान जिथे संपते तिथे अध्यात्म सुरु होते.
अवकाशाच्या पोकळीचा अंत कोणालाही शोधता आलेला नाही. इथे विज्ञानाचा शेवट होतो. या पोकळीचा जेव्हा विचार सुरु होतो तेथे मग अध्यात्म सुरु होते. अध्यात्म मात्र स्वतः विषयीच बोलायला सुरु करते. अध्यात्म हे सांगते की इतक्या लांब शोध घेण्यापेक्षा शोधाची सुरुवात स्वतःपासून करा. मी स्वतः कोण आहे याचा प्रथम शोध घ्या. स्वःच्या शोधातच सर्व शोधांचे रहस्य दडले आहे.

मी म्हणजे देह आहे का ? नाही तर मी म्हणजे एक आत्मा आहे. आत्मा काय आहे ? तो दिसत नाही. त्याला वास नाही. त्याला गंध आहे. तो अमर आहे. त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. जन्मालाच येत नाही तेथे मृत्यू असण्याचा प्रश्नच नाही. असे अमरत्व आहे. कारण त्याचे अस्तित्व आहे. तो सर्वत्र सामावलेला आहे. श्वासात तो आहे. मृत्यू होतो तेव्हा श्वासाची क्रिया थांबते. सर्व इंद्रियांची क्रिया थांबते. देहात अडकलेला हा आत्मा देहातून मुक्त होतो.

म्हणजेच हा प्राण आहे. ती एक वायूरुपी शक्ती आहे. त्याची ओळख आपण करून घ्यायला हवी. त्याचे आत्मरुप जाणून घ्यायला हवे. यासाठी श्रीगणेशा हा आत्मरुपाच्या अनुभुतीपासून करायला हवा. येथून प्रारंभ केल्यानंतर सर्व विचार आत्मसात होतात. सर्व शक्तींची ओळख होते. सर्व विद्यांचे ज्ञान होते. सर्व विद्या हस्तगत होतात. यासाठी या आत्मरुपाचे नित्य स्मरण ठेवून त्याची आराधना करायला हवी. यासाठीच साधना आहे. सोहम साधना तर हीच आहे. मी कोण आहे हेच समजून घेणे आणि त्याचा अनुभव घेणे. त्याचे नित्य स्मरण ठेवणे हीच साधना आहे. नित्य स्मरण राहावे यासाठी साधना करायला हवी.

साधनेत ही स्थिरता आत्मसात केल्यानंतर ती नित्य आपल्याजवळ असते. ज्या देहात त्याची ओळख झाली आहे त्या आत्मज्ञानी श्रीगुरुंच्या देहाचे चरणी नमन करावे. मनात नित्य स्मरण राहून त्याची अनुभुती येत राहावी, या अनुभुतीतून मग आपल्या देहाचा नारायण व्हावा. म्हणजेच आपणही आत्मज्ञानी व्हावे. यासाठी आत्मरुपी गणेशाचे स्मरण नित्य करावे.

Related posts

नीळिमा अंबरी । कां मृगतृष्णालहरी । (एकतरी ओवी अनुभवावी)

सकारात्मक विचारांची उभारू गुढी

नामस्मरणानेच नराचे नारायणात नामांतर

Leave a Comment