March 5, 2024
Inflation hits poor peoples article by sartia Patil
Home » महागाईचा भस्मासुर
विशेष संपादकीय

महागाईचा भस्मासुर

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, अडते आणि दलाली कमी होऊन महागाईचा दर कमी करण्याचा प्रयत्न करुन लोकांना दिलासा द्यावा नाहीतर ऐन उन्हाळ्यात महागाईचा भस्मासुर गरीब जनतेला जाळून टाकल्या शिवाय राहणार नाही.

अॅड. सौ. सरीता सदानंद पाटील

वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे (प).

आपण शाळेत असताना महागाईचा भस्मासुर या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितला जायचा. त्यावेळी वाटायचे कि खरच महागाईचा पण भस्मासुर असतो का ? खरचं माणूस म्हणजेच सामान्य लोक महागाईत भस्म होतात का ? पण खरच शालेय जीवन संपून आपण आईवडिलांचा घर सोडून उच्च शिक्षणासाठी शहरात येतो तेंव्हा थोडी थोडी या महागाईची आपल्याला कल्पना येत असते. त्याच्या नंतर सुद्धा आपण जेव्हा जबाबदार नागरिक बनतो तेव्हा खरे तर या महागाईची आपल्याला खरी झळ बसते नाही; लागते आणि चटके बसतात आणि आपसूकच आपल्याला कवयित्री बहिणाबाई चौधरींची कविता ओठावर येते. ‘अरे संसार-संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर’. हे चटके चुलीचे तर असतातच शिवाय महागाईचे पण असतात.

अच्छे दिनचे स्वप्नच

अलीकडे चार-पाच वर्षात तर महागाईने अगदी कळस गाठला आहे. सत्तेवर येणाऱ्या मायबाप सरकारने तर ‘अच्छे दिन’ आयेंगे म्हणून आशा दाखवली पण ते ‘अच्छे दिन’ ना आले ना येण्याची सुतराम शक्यता नाही. यातच गेल्या दोन वर्षात भर पडली ती कोरोना महामारीची. कोरोना महामारीत बहुतेकांची रोजीरोटी बंद झाली आणि बेरोजगारी वाढली. सामान्य ते गरीब लोक अगदी मेटाकुटीला आले. आता कुठे थोडे सुरळीत होते आहे तोवर रशिया-युक्रेन जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणखीनच सर्व जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. कोरोना महामारी, महापूर ,वादळे, अवकाळी पाऊस आणि आता जागतिक युद्ध हि संकंटाची मालिका संपता संपत नाही त्यामुळे महागाईचा आलेख चढतच आहे तो खाली कधी येणार की स्वप्नवतच राहणार असे वाटू लागले आहे.

पगार अन् महागाई व्यस्त प्रमाण

जीवनावश्यक वस्तुंचे कांदा, बटाटा , डाळी, तेल वा इतर अन्नधान्य यांच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. महागाईच्या पटीत पगार तर वाढत नाहीत आणि म्हणून पगार आणि महागाई यांचे कायम व्यस्त प्रमाण राहते. त्यामुळे महागाईचा दर हा नेहमी चढाच असतो. जानेवारी २०२२ मध्ये हा दर म्हणजेच कन्झुमर प्राइस इंडेक्स ६.१ टक्के होता हा गेल्या सात महिन्यातील उच्चांकी रेट आहे. शिवाय आंतररास्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति ब्यारल ११३ डॉलर म्हणजेच सरासरी ८५०० रुपये झाला आहे. त्यामुळे सर्व खाद्य तेलांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. उदाहरणादाखल रीसो १ की. २१० रु., शेंगदाणा तेल २५०रु., पाम तेल १६० रु. सुर्यफुल तेल २४० रु. हे किरकोळ बाजारातील दर सध्याचे आहेत. होलसेल मध्ये प्रत्येक किलोला १० ते २० रु. कमी होतात. पण हेच दर सहा महिन्यापूर्वी अर्धे होते. दर महिन्याला असे दर वाढत गेले तर गरीब लोकांनी जेवणात तेल वापरायचे कि नाही हा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे. त्यामुळे घर चालवता चालवता गृहिणींचे अगदी कंबरडे मोडायला आले आहे. पाच-सहा महिन्यांपूर्वी रोज ४०-८० पैसे पेट्रोल आणि डिझेल दर वाढायचे म्हणजे ह्या किरकोळ वाढणाऱ्या दरIकडे लोकांचे लक्ष जात नव्हते आणि हळूहळू ही दरवाढ १०० रीच्या पार गेली. आता तर ११० रुपयांच्या पार जावून आणखी भडकणार आहे.

हातावर पोट असणाऱ्यांचे काय ?

आज जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचे दर १२५ रु. पार झाले आहेत. लोकांना एकदा चढ्या भावाची सवय झाली कि मग लोक कधी काळी कमी भाव होते हे विसरूनच जातात. मग एखादे आंदोलन- मोर्चा झाला की २-३ रु. नी भाव कमी करायचे हे सगळेच हास्यास्पद आहे. नाही पण आता आणखी निवडणुकानंतर महागाई वाढणार आहे म्हणजे हा भडका वाढतच जावून गरिबांना भस्म करू टाकणार. घरगुती इंधनाचा दर सिलिंडर मागे ९०० ते ९५० रु.आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात शेतकर्यांचे महिन्याचे खर्चाचे अंदाजपत्रक पूर्ण कोलमडले आहे. कांद्याचे भावही चार महिन्यांपासून चढेच आहेत. २० ते २५ रु. नी मिळणारा कांदा ४० त ५० रु झाला आहे. जवळ जवळ ४-५ महिन्यांपासून भाव उतरलाच नाही. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान होते आणि त्यामुळे सर्व डाळी, कडधान्य, कांदे इ. पिकांचे नुकसान होते आणि भाववाढ अटल होते. नैसर्गिक संकंटांचे समजू शकतो पण व्यापाऱ्यांची कृत्रिम साठेबाजीसुद्धा तितकीच जबाबदार आहे. भारतीयांचे कांदा, तेल आणि डाळी याशिवाय जेवण अपुरेच आहे आणि याच वस्तुंचे जर भाव गगनाला भिडले तर सामान्य लोकांनी व हातावर पोट असणाऱ्या लोकांनी खायचे काय ?

‘ये रे माझ्या मागल्याच’

दोन वर्षापासून तर संकंटांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे सामान्य लोकांचे हाल कुत्रे खात नाही ही वस्तुस्थिती आहे. दरवेळी येणारे सरकार निवडणुका आल्या कि पोकळ आश्वासने देते पण निवडून आल्यानंतर हे आश्वासनांचे फुगे हवेत विरून जातात आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्याच’ अजून बांधकाम व वीज उपकरणांच्या क्षेत्रातील कच्च्या मालाचे दर पण खूपच वाढले आहेत. अजून यात भर म्हणून खेड्यातील लोकांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जणारी एस. टी. सुद्धा संपाच्या भोवऱ्यात सापडली आहे त्यामुळे गरीब लोकांना जवळच्या शहरात आठवडी बाजारात जाण्यासाठी जास्तीचे पैसे मोजून खाजगी वाहनाने जावे लागते. शाळा- कॉलेज च्या मुलांचे रोजचे हाल होतात ते आणखी दुखणे वेगळेच.

आर्थिक विषमता कशी भरून काढणार ?

पण या उलट आपण राजकारणातील लोकांची किंबहुना मंत्र्यांची मालमत्ता कोटींच्या घरात आहे हे रोजच दूरदर्शनवर बघतो. प्रत्येकाची मालमत्ता एवढी आहे कि सात पिढ्यापर्यंत पुरेल एवढी साठवून ठेवली आहे आणि त्यातही घराणेशाही. मग मुठभर लोकांकडे जर एवढी मालमत्ता व पैसे असतील तर मग जनता गरीबच राहणार आणि मग ही आर्थिक विषमता कशी भरून निघणार ?

उन्हाळ्यात महागाईचा भडका

लोकप्रतिनिधी तर एकमेकांचे उणे-दुणे काढण्यातच धन्यता मIनत आहेत. शिवाय महाराष्ट्रावर कोळसा टंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होतंय त्यामुळे राज्याला अंधारात बुडण्याचा धोका टांगत्या तलवारी सारखा आहेच. त्यामुळे लोकप्रतिनिधीनी, मंत्र्यांनी, स्थानिक प्रशासनानी फक्त स्वताच्या तुंबड्या भरण्याकडे लक्ष न देता जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले तर बरे होईल. प्रश्नाच्या मुळIशी जावून प्रश्न सोडवले पाहिजेत वर-वर मलमपट्टी करुन चालणार नाही. शहरात लोकप्रतिनिधीनी नुसती ब्यानरबाजी न करता निस्वार्थी समाजसेवा करणे जनतेच्या हिताचे आहे. लोकंIच्या करांचे पैसे लोकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी खर्च झाले पाहिजेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, अडते आणि दलाली कमी होऊन महागाईचा दर कमी करण्याचा प्रयत्न करुन लोकांना दिलासा द्यावा नाहीतर ऐन उन्हाळ्यात महागाईचा भस्मासुर गरीब जनतेला जाळून टाकल्या शिवाय राहणार नाही.

Related posts

देशात 30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रे लवकरच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

डॉ. अपर्णा पाटील यांच्या कावेरी कादंबरीचे शनिवारी प्रकाशन

सर्पगंधा ( ओळख औषधी वनस्पती )

Leave a Comment