October 16, 2024
tukaram-did-not-approve-of-Superstition
Home » Privacy Policy » अंगात येणे ईश्वर भक्तीचा मार्ग नव्हे
मुक्त संवाद

अंगात येणे ईश्वर भक्तीचा मार्ग नव्हे

अंगात घेऊनिया वारे दया देती ।। १ ।।
देव्हारा बैसोनि हलविती सुपे । ऐसर पापी पापें लिंपताती ॥ २ ॥
एकी बेकी न्याये होतसे प्रचित । तेणे लोक समस्त भुलताती ॥ ३ ॥
तयांचे स्वाधीन दैवते असते । तरी का मरती त्यांची पोरे ॥४ ॥
तुका म्हणे पापी अंगारा ज्याचा । भक्त कान्होबाचा तोही नव्हे ॥ ५ ॥

संत तुकारामांनी कर्मयोग, नीतिविचार आणि सक्रियता याचा स्वीकार करण्याबाबतचा विचार सांगितला. क्रियाशील राहूनच जीवनाचा आंतर उपभोगायचा आणि आलेल्या संकटाशी सामना करायचा आहे, ही शिकवण त्यांनी दिली. खरे तर शूद्र देवता भक्ती, अंधश्रद्धा, भयानुकूलता, उत्सवप्रियता, दीनवाणेपणा असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले.

असे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या तुकारामांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरागत प्रथा यांचीही दखल घेतली. ज्योतिषी, मांत्रिक, ढोंगी साधूंवर टीकेची झोड उठवलीच; त्याचबरोबर अंगात येणे, कौल लावणे अशासारख्या घटनांचाही धिक्कार केला. ते सर्व थोतांड आहे, असे अत्यंत कळकळीने सांगितले. या प्रकारची कृती ही केवळ लोकांची फसवणूक करून पैसे उकळण्याचा धंदा आहे, असेही त्यांनी बजावले.

अंगामध्ये वारे आणून लोकांवर दया दाखविणाऱ्या या भोंदू भक्तांच्या हाती काही लागत नाही. अंगात येणे ही एक अशी अवस्था की जी मान गरगर फिरवत आणि मेंदू सुन्न करून अतिश्रमातून आलेली जणू संवेदनहीनता होय. शरीराला आलेला झटका आणि मेंदूला आलेली बधिरता यातलाच हा प्रकार. अंगात आलेल्यांना भक्त म्हणवून घेणाऱ्यांना इतर समस्याग्रस्त लोक प्रश्न विचारतात आणि सांगितलेल्या अनेक गोष्टीपैकी एखादी खरी ठरते आणि तेवढ्यावरून सगळे लोक भुलतात. त्यांना मान व धन देऊनही स्वत:चा विश्वास व्यक्त करण्याचा काहींचा प्रयत्न असतो. या कृतीचा तुकारामांनी निषेध केला.

शुद्ध आचरण करणाऱ्यांना अंगात येणाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याची, मताची गरजच काय ? शिवाय ज्यांच्या अंगात येते ते तरी कुठं संकटमुक्त असतात. काही वेळा त्यांची स्वत:चीच मुले मरतात. ती का मेली असती ? जो पाणी, अंगारा देतो तोही कान्होबाचा भक्त असतो.

एखादे भूत पिशाच्च वा देवता एखाद्या व्यक्तीच्या अंगात शिरते. मग ती व्यक्ती नाचू – घुमू लागते आणि तिच्या तोंडून तिला झपाटणारे भूत व दैवत बोलू लागते. आणि त्या पूर्तीसाठी काय केले पाहिजे ते सांगावे असे अपेक्षितात. मग ती अंगात आलेली व्यक्ती नव्हे तर म्हणे ते भूत अथवा दैवत उत्तरे देते. हा प्रकार अंधश्रद्धाच होय. तुकारामांनी त्याचा धिक्कार केला. अंगात येणे हे भक्ताकडून घडते. परंतु हा काही ईश्वराचा भक्ती मार्ग होऊच शकत नाही. ही ईश्वराची कृपा वा प्रसाद मिळविण्याचा मार्ग नसून पापाचा मार्ग आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

अंगात येणे हा भक्तीचा मार्ग नाही व ज्यांच्या अंगात येते तो ईश्वराचा खरा भक्त नाही असे स्पष्ट प्रतिपादन केले. सर्वसामान्य माणसांनी असे प्रकार करणाऱ्या ढोंगी लोकांच्या नादी लागू नये. जी माणसं अंगात येणाऱ्या माणसांच्या नादी कशी लागतात याची तुकारामांनी केलेली कारणमीमांसा विज्ञानयुगापूर्वीची आहे हे सुद्धा लक्षात घेणे जरूरीचे आहे.

कौल लावणे, देवऋषीपणा, घुमणं, सूप नाचवणं व त्यातून देवाची इच्छा सांगणं वगैरे प्रकार तुकारामांना मान्य नव्हते. एखादी दुसरी गोष्ट योगायोगाने अपघाताने रूटीन म्हणून खरी ठरते. मग त्याच्या आधारे सर्वसामान्य माणसे या सर्व प्रकारांच्या नादी लागतात. त्या गोष्टी सांगणाऱ्यांनाही वाटू लागते की आपल्या अंगात दैवी शक्ती आहे. शिवाय ‘गॉसिप’ उपयोगी पडते. त्या व्यक्तींचा बोलबाला होतो आणि भोवती माणसं जमविण्यासाठी काहीजण प्रयत्नशीलही असतात. परिणामी अंगात येणं, कौल लावणं, देवऋषीपण यांचा प्रभाव वाढतो. तुकारामांनी या प्रकारातील फोलपणा दाखवून दिला.

देवऋषाला वश केले की आपली इच्छा पूर्ण होईल. विशिष्ट बाजूला वाहिलेले फूल पडले, देवाच्या मस्तकावर वाहिले की शुभ व इच्छापूर्तीचे प्रतीक मानणे इत्यादी प्रकार सत्यतेपासून दूर आहेत. हा लोकांचा भ्रम आहे. कमकुवत मनाचे निदर्शक आहे, असे तुकारामांनी ठणकावून सांगितले. डोळे उघडून पहा, विचार करा, शांत चित्ताने विचार करा, अंगात येण्याच्या माणसाला त्याच्या समस्याची उत्तरे का मिळत नाहीत. याचाही विचार करा, असे तुकारामांनी सांगितले.

उगाच फसू नका, भुलू नका, वृथा आहारी जाऊ नका, स्वत:वर विश्वास ठेवा असे तुकाराम स्पष्ट बजावतात. अंगारा देऊन आणि लावून आजार कसा बरा होऊ शकेल ? तीर्थ देऊन रोगावर इलाज कसा होईल ? संकटे दूर होण्यासाठी कौल कसा उपयोग पडेल ? हे प्रश्न स्वतःला विचारा, असे तुकारामांनी सागितले.

कोण, का, कसे, कशासाठी, कोणासाठी? असे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधल्यास लोकांना झालेले भ्रम त्यांचे ते सोडून खोडून काढू शकतील. आजच्या विज्ञान युगात सुद्धा अंगात येणं विशेषतः बायकांच्या हे सर्रास चालू आहे. अमावास्या, नवरात्र व इतर विशिष्ट दिवस हे अंगात येणारे भक्त निवडतात. यात्रा जत्रेच्या दिवशीही घुमू लागतात. बघे तर असतात. काही भावूक माणसं तर पाया पडून भंडारा लावून घेऊन घुमणारा भक्त म्हणजे देवच त्यांच्या मुखातून बोलतो अशी श्रद्धा असणारे आजही दिसतात.

खरे तर हा भ्रम आहे. अंधश्रद्धा तर आहेच. पण अडाणीपणातून अशा प्रकारच्या आहारी जाणारे लोक आहेत. धर्माच्या नावावर लोकांची होणारी फसवणूक विज्ञान युगातही पाहायला मिळते. धर्माच्या नावावर व ईश्वराचे अंगी संचारणे अशा भूलथापा व बतावण्या करणे म्हणजे पाप होय. अशा पापी माणसांच्यापासून सावध राहाव. दुर्दैव असे की प्रसार माध्यमातून विशेषतः टीव्ही मालिकांमध्ये असे प्रकार दाखविले जातात.

डॉ. लीला पाटील, कोल्हापूर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading