February 29, 2024
the-guru-enlightens-the-disciple through perception
Home » बोधातूनच गुरू शिष्याला आत्मज्ञानी करतात
विश्वाचे आर्त

बोधातूनच गुरू शिष्याला आत्मज्ञानी करतात

हृदया हृदय एक झाले । ये हृदयीचे ते हृदयी घातले ।
द्वैत न मोडिता केले । आपणाऐसे अर्जुना ।। १४२१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – तेंव्हा अलिंगनाच्यावेळी देवाचे व अर्जुनाचे हृदय एक झाले, देवांनी आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देव व भक्त हे द्वैत न मोडता देवांनी अर्जुनाला आपल्यासारखे केले.

अध्यात्म हे अनुभवातूनच शिकता येते. अनुभुतीतूनच प्रगती साधली जाते. अनुभवच येत नसतील तर हे शास्त्र समजणार नाही. ते आत्मसातही होणार नाही. जेवताना जेवणाला चवच नसेल तर जेवण जाणारच नाही. बेचव जेवण आपण जेवूच शकत नाही. खाल्ले तरी ते मानसिकता नसल्याने पचण्याचीही शक्यता कमी असते. जेवणाला चव असेल तर ते पटकण ग्रहण केले जाते. अगदी मनसोक्त त्याचा आनंद घेतला जातो. असे रुचकर जेवण पचतेही अन् त्याचा शरीराला लाभही होतो. असेच अध्यात्माचे आहे. ते अनुभवातूनच शिकता येते. अनुभवन नसतील तर ते आत्मसातही होणारही नाही.

जीवनात आनंद असेल तर ते जीवन जगण्यात रस वाटतो. अन्यथा ते जीवन निरस होते. जीवनात नैराश्य उत्पन्न झाले तर ते जीवन संपविण्याचाही विचार मनात डोकावतो. यासाठीच आनंदी जीवन कसे जगता येईल याचा विचार करायला हवा. मनात नैराश्य उत्पन्न होणारच नाही याची काळजी घ्यायला हवी. अध्यात्म हे नित्य आनंदी बनविणारे शास्त्र आहे. या शास्त्राचा अभ्यास करून जीवन आनंदी करायला हवे. जीवनाचा खरा अर्थ समजून घेऊन जीवन आनंदी करायला हवे. अन्यथा जन्माला आला काय अन् गेला काय यात काहीच अर्थ नाही. मिळालेले जीवन आनंदाने जगणे अन् अमर होणे यातच खरा आनंद आहे. तेच जीवन खरे श्रेष्ठ आहे.

प्रत्येक गुरु हा प्रथम शिष्य असतो. शिष्यातूनच अभ्यासाने गुरुत्व प्राप्त होते. जसा अभ्यास असेल तशी पदवी प्राप्त होते. तशी पदेही प्राप्त होतात. आजकाल अध्यात्म शिकवणाऱ्या संस्थाच उभ्या राहील्या आहेत. या संस्थात अध्यात्माचे अभ्यासक्रम शिकवले जातात. आचार्य, विद्यावाचस्पती अशा पदव्याही दिल्या जातात. काही संस्थात दहा दहा वर्षे अभ्यास करून आचार्य ही पदवी मिळवता येते. आपण तो विषय शिकून पंडितही होऊ शकतो. विषयाचे पांडित्यही प्राप्त होते. पण आपणास अध्यात्म शिकून आत्मज्ञानी व्हायचे आहे, पांडित्य नाही हे लक्षात घ्यायला हवे. मग हे पद कसे प्राप्त होते याचा अभ्यास करायला हवा. यासाठी ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने समजून घ्यायला हवी.

आत्मज्ञान हे बोधानेच शिकता येते. यासाठीच हे शास्त्र शिकण्यासाठी आत्मज्ञानी गुरूची गरज आहे. आत्मज्ञानी गुरूकडूनच हे शास्त्र समजू शकते. यासाठी आत्मज्ञानी संताचे शिष्यत्व पत्करायला हवे. ज्याचा अभ्यास करायचा आहे तो विषय शिकण्यासाठी गुरुही त्या पात्रतेचा असायला हवा. तरच शिष्य त्या पात्रतेचा होऊ शकेल. पांडित्य अन् आत्मज्ञान यातील फरक यासाठीच समजून घ्यायला हवा. ज्ञानेश्वरीतील ओव्या व त्याचा अर्थ पाठ असणे वेगळे व त्या ओव्या अनुभवातून समजून घेणे यात फरक आहे. पाठांतर करून पांडित्याच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण आपणास मिळू शकतात. पण त्या ओवीचा बोधच होत नसेल तर हे सर्व पांडित्य व्यर्थ आहे. आत्मज्ञानी व्हायचे असेल तर त्या ओव्या बोधातून समजून घ्यायला हव्यात. आत्मज्ञानी गुरू हे शिष्याला बोधातून आत्मज्ञानी करतात. तेंव्हाच तो शिष्य त्यांच्या पात्रतेचा होतो. हे त्यांचे शिक्षण अखंड सुरू असते. शिष्य आत्मज्ञानी झाला तरीही बोधामृताचा वर्षाव ते शिष्यावर करत असतात. सद्गुरू हे शिष्याला आत्मबोधातून आपल्या पदावर बसवतात. त्याला त्या पात्रतेचा बनवितात. आपल्यासारखे आत्मज्ञानी करतात.

Related posts

आंबट-गोड चिंचेच्या आठवणी अन् प्रबोधन

चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण

पूर, महापूर आणि दरडी !

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More