October 4, 2024
Vilas Kolpe is the flow of compassion
Home » Privacy Policy » विलास कोळपे म्हणजे करुणेचा प्रवाह
मुक्त संवाद

विलास कोळपे म्हणजे करुणेचा प्रवाह

नाट्यवेडे विलास कोळपे म्हणजे परोपकारी भावनेने काम करणारे सहृदयी कार्यकर्ते. त्यांच्या स्नेही स्वभाववृतीचे दर्शन घडविणारे हे लेखन !

✍️ अजय कांडर

काही माणसे अशी असतात, जी सतत समाजाबद्दलची सहृदयता बाळगून कार्यरत राहतात. जे करायचे त्याचा थांगपत्ता, ज्याच्यासाठी केलं त्यालाही लागू देत नाहीत. असा आपल्या आत करुणेचा प्रवाह सतत वाहत ठेवणारा कार्यकर्ता म्हणजे विलास कोळपे. एखादं पुस्तक आवडलं की, त्याच्या ५० – १०० प्रति विकत घेऊन समविचारी लोकांना मोफत देणे किंवा फार ओळख असो किंवा नसो माणूस मोठ्या अडचणीत सापडला की, त्याच्याकडून परतफेड काय होईल ? याचा क्षणभर विचार न करता त्याच्या नकळत सर्वतोपरी त्याला मदत करणे, हा चांगुलपणा जोपासणारे विलासराव म्हणजे आजच्या स्वार्थी काळातील दुर्मिळ माणूस.

लोकशाही धोक्यात येते आहे. धर्म आणि जातीचे ध्रुवीकरण करून माणसालाच संपवले जातेय. माणसांचा मेंदू ताब्यात घेऊन त्यांना भ्रमिष्ट करता करता लोकशाहीवर घाला घातला जातोय; हे लक्षात येताच त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी जिथे तिथे जाहीर सभेचं आयोजन करणे हेही काम आपलेच आहे; असे मानणारा हा नितळ मनाचा कार्यकर्ता आपले पाय जमिनीवर ठेवून कार्यरत आहे. तेव्हा स्वतःचा अजेंडा राबविण्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते झालेल्या लोकांसमोर हा पारदर्शी कार्यकर्ता आजच्या काळातही अनेकांना आदर्शच वाटतो आहे!
आपल्या मर्यादेत राहून सार्वत्रिक काम प्रामाणिकपणे करता येते. याचे उदाहरण म्हणून आपल्याला विलास कोळपे यांच्या इतरांसाठी कार्यरत राहणाऱ्या वृत्तीकडे पाहता येईल.

बऱ्याच व्यक्ती सामाजिक काम करत असतात, सांस्कृतिक कार्यकर्ता म्हणून स्वतःची छबी उभी करण्यात यशस्वी होतात पण यातल्या अनेकांच्या मुळांचा शोध घेतला असता असे लक्षात येते की, यांच्या बुडाखाली वेगळेच काही जळत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक सहभावनेच्या नावाखाली समरसतेचा रस्ता अनेक धरतात. नाटकं करता करता अनेकांचे नाटकी चेहरे खूप उशिरा लक्षात येतात. कलाकार म्हणून कोणतीच भूमिका कधीच घ्यायची नाही आणि जाहीर भूमिका घेणाऱ्यांना चेष्टेचा विषय बनवायचा. तेव्हा विलास कोळपे यांच्यासारखी व्यक्ती स्वतः च्या कृतीतून ‘निर्भय बनो’ असा संदेश देते तेव्हा नाट्यक्षेत्रातला छोटा कार्यकर्ता समजणारा हा कलावंत मोठाच वाटत राहतो. कोळपे म्हणतात, “मी स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेत नाही. मी आवश्यकता असेल त्या ठिकाणी काम करतो.”

वीस वर्षांपूर्वी देवरूख येथे चिरेखाणीवर काम करणा-या एका महिलेला तिच्या नवऱ्याने दारूला पैसे दिले नाही म्हणून त्याची बायको व मोठी मुलगी बाहेर गेली असताना रॉकेलचा कॅन ओतून झोपडीला आग लावली. यात त्या कुटुंबातील दोन मुलांना भाजल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुदैवाने बाहेर गेल्यामुळे ती बाई आणि तिच्या दोन छोट्या मुली वाचल्या. ही बातमी वृत्तपत्रात वाचल्यावर तिथे नोकरीनिमित्त असलेल्या कोळपे यांनी त्यांना मदतीसाठी जो प्रयत्न केला त्यातून समाजातून मदतीचा ओघ चालू राहिला. प्रसंगी भाजलेल्या दोन मुलांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी रोजचा डबा कोळपे यांनीच आपल्या घरातून सुरू ठेवला परंतु ती दोन्ही मुले वाचविण्यात अपयश आले. जास्त भाजल्यामुळे अखेर त्यांना मृत्यूने कवटाळले.

तरीही पुढे विलास कोळपे यांनी प्रयत्न करून वाचलेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजाराचे किसान पत्र काढले. पुढे त्या दोन्ही मुली चांगल्या शिकल्या. एक एल् एल् एम् झाली व दुसरी एम् एस् डब्लू झाली. ५ वर्षांपूर्वी त्या दोन मुली, त्यांचे नवरे आणि आई -वडिल असे सगळे कुटुंबिय कोळपे यांना भेटायला आले. त्या बाईच्या नवर्‍याला २८ वर्षांची जन्मठेप झाली होती. कोळपे यांच्या घरी ते कुटुंब आल्यानंतर २४ वर्षे सजा भोगलेल्या त्या दोन मुलींचा बापही सोबत आला होता. कोळपे यांच्या सहृदयतेमुळे संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं कुटुंब अतिशय चांगल्या मार्गाला लागले.

त्याच प्रेरणेतून कोळपे यांनी रत्नागिरीत एएचा(अल्कॉहोलिक्स ॲनाॅनिमस संघटना) ग्रुप तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. यावर्षी सदर ग्रुपला २० वर्षे पूर्ण होत आहेत. ए ए मध्ये येऊन व्यसनमुक्त झालेले लोक जेव्हा कोळपे पाहतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर झालेला आनंद अपरिमित असतो. ते म्हणतात, “अल्कॉहोलिक्स ॲनाॅनिमस मिटिंगच्या सभेचे मला बरेच फायदे झाले. माझा ईगो कमी झाला”. त्यांनी रत्नागिरीत असताना आशादीप मतिमंद मुलांच्या वसतीगृहाच्या मदतीकरीता नाट्य प्रयोग केले. सलग तीन वर्षे या प्रकारची मदत त्यांनी केली. त्यांच्या मते इतरांना मदत करणे ही माणसाची अंत:प्रेरणा असावी.

कोळपे एकदा चंद्रपूरला गेले होते. तेथील बांबू क्राफ्ट मध्ये काम करणाऱ्या मुलाकडून काही वस्तू त्यांनी घेतल्या. एवढीच काय ती त्याच्याशी ओळख. पुढे कोविडमध्ये त्याच्याशी त्यांनी सहज संपर्क केला तेव्हा कळलं, की तो कोविडमुळे धंद्यात कंगाल झाला. त्यावेळी त्या मुलाने आत्महत्या करावीशी वाटते असे कोळपे यांना सांगितले. त्याच्या एकूण बोलण्यातील प्रामाणिकपणा लक्षात घेऊन कोळपे यांनी त्या तरुणाला त्याचा व्यवसाय पुन्हा उभा रहावा म्हणून दुसऱ्याच दिवशी तब्बल एक लाख रुपये पाठविले. यावर ते म्हणतात, त्याने मदतीची हाक मारली नि मी त्या हाकेला प्रतिसाद दिला नसता तर त्याने जीवाचे बरेवाईट केले असते. मग आयुष्य भराची टोचणी लागून राहिली असती. मात्र त्या मुलाने पुढील काही काळातच त्यांचे पैसे परत केले.

कोळपे यांनी पोटापाण्याचा विषय म्हणून नोकरी केली;पण त्यांचं नाटकावर प्रचंड प्रेम. त्यांना १९८२ साली राज्य नाट्यस्पर्धेत रौप्य पदक मिळाले. १९७२ ते १९८४ पर्यंत ते एकांकीका करत होते. अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम नाटक आहे, असे ते मानतात. सामाजिक भान नसलेला नट कितीही मोठा असला तरी तो त्यांना महत्वाचा वाटत नाही. अर्नेस्ट हेमिंग्वे म्हणतो, “कला संस्कृतीची आवड असणारा माणूसच परोपकारी वृत्तीतून निव्वळ माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करत असतो.” कोळपे यांची ही जगण्याची वाटचाल लक्षात घेता अर्नेस्ट हेमिंग्वेच्या याच विचाराचा प्रत्यय आपल्याला येतो.

✍️ अजय कांडर
लेखक, विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत – 9404395155


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading