December 11, 2024
Know About Real Ghost Sunetra Joshi article
Home » भूत म्हणजे काय ?
मुक्त संवाद

भूत म्हणजे काय ?

Sunetra Joshi

आपण म्हणतोच ना देव पावला तुमच्या रुपाने. तर मग वाईट वागून किंवा कुकर्म करुन आपल्या छातीवर भुतकाळातली भुतं नाचवून घेण्यापेक्षा आणि त्या भितीच्या भुतांच्या छायेत जगण्यापेक्षा चांगले कर्म करून देवाची भेट झालेली केव्हाही चांगलीच ना?

सौ सुनेत्रा विजय जोशी, रत्नागिरी
मोबाईल 9860049826

एकदम भूत बघितल्यासारखे घाबरू नका.. ही भूतं नेहमी भुतकाळातलीच असतात.. जी मनातच ठाण मांडून बसलेली असतात आणि आपल्याला घाबरवत असतात.

इये मराठीचे नगरी वरील अपडेटसाठी जॉईन व्हा टेलिग्रामवर त्यासाठी क्लिक करा लिंकवर  https://t.me/MarathiliteratureAgriResearch

पडक्या वाड्यात हेच असणार !

लहानपणापासून आपण ही कार्टी म्हणजे वळल तर सूत नाहीतर भूत आहे अगदी.. किंवा एकदा काही हवं असले की मानेवर नुसती भुतासारखी बसते असे आपण ऐकलेले असते. पण अंधारातून जाताना किंवा एकटे सुनसान जागी असो की रस्त्यावरून किंवा पडक्या वाड्यात वगैरे गेलो तर तिथे देव भेटेल का? असे मनात येत नाही. पण कुणाचे भुत इथे असेल का? असे मात्र हमखास मनात येते आणि भिती वाटते. अतृप्त इच्छांचे भुत नक्की असणार असे आपण वाचले म्हणण्यापेक्षा ऐकलेलेच जास्त असते.

भूत म्हणजे काय ?

भुताखेतांच्या गप्पा मोठी मंडळी हमखास सांगायची. जशा परीकथा असायच्या तशा भुतकथा पण असायच्या. आता परीकथा पण नाहीत नी भुतकथा पण. खरे तर भूत म्हणजे आपल्या भुतकाळातल्या वाईट आठवणी किंवा घडलेल्या गोष्टींचे मनात असलेले प्रचंड दडपण असावे. त्या वाईट घटनेचा मनावर इतका प्रभाव असतो की एरवी सगळ्या लोकांत आपल्याला ते जाणवत नाही. पण त्या गोष्टी आपल्या अंतर्मनात खूप खोलवर असतातच. मग एकांतात किंवा अंधारात त्या बाहेर येतात. आणि आपल्याला काहीतरी भास झाला की आपण त्याला भूत म्हणतो. दचकतोही. मग कुणीतरी आपल्याला विचारत देखील असा काय भूत बघितल्या सारखा चेहरा केला आहेस.

ही भिती म्हणजेच भूत

काही व्यक्तिच्या आयुष्यात असतातही काही अप्रिय चुकून घडलेल्या घटना. कधी स्वार्थापोटी कळतेपणी केलेल्या किंवा कधी नकळत हातून झालेल्या. अगदी गुन्हा असा नाही पण चुका किंवा अपराध असा जो की त्यांना आत कुठेतरी नेहमी सलत असतो. मग त्या भुतकाळाचे रुप भूत बनुन त्यांच्या मनात लपलेले असतं. ते अस एकांतात बाहेर येत. मग ज्या व्यक्तीच्या संदर्भात असेल ती व्यक्ती असल्याचा किंवा दिसल्याचा भास होतो. आणि आपण वाईट केलेले असेल तर ते आपल्याला त्रास देणार ही भिती मनात निर्माण होते. ही भिती म्हणजेच भूत असावे…

भूतांच्या तावडीतून सुटायचे कसे ?

त्या भुतांच्या तावडीतूनही तुम्ही प्रयत्न पुर्वक सोडवून घेऊ शकता. प्रायश्चित्त घेऊन. म्हणजे मनापासून माफी मागून. ज्या व्यक्तीला दुखावले असेल तिला मदत करू शकता. तुमच्या चुकीमुळे जर कुणाचे काही वाईट घडले असेल तर… आणि पुन्हा ती चूक होणार नाही याची पण दक्षता घ्यायला हवी.. आपल्याकडे म्हणतात. नेहमी चांगले कर्म करत राहा. नेहमी परोपकार करा. कुणालाही त्रास देवू नये. असे जे म्हणतात ते उगाच नाही. कारण चांगले कर्म केल्याचे फळ चांगले मिळते म्हणजे तरी काय? तर आपण कुणाचे भले केले तर संकटकाळी त्या माणसातला देव म्हणजे सद् बुध्दी आपल्या मदतीला नक्कीच धावून येईल. तेव्हा आपल्याला देवच भेटतो. आपण म्हणतोच ना देव पावला तुमच्या रुपाने. तर मग वाईट वागून किंवा कुकर्म करुन आपल्या छातीवर भुतकाळातली भुतं नाचवून घेण्यापेक्षा आणि त्या भितीच्या भुतांच्या छायेत जगण्यापेक्षा चांगले कर्म करून देवाची भेट झालेली केव्हाही चांगलीच ना? तेव्हा चांगले कर्म करा.. माणसातला देव नक्की भेटेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading