छापील वृत्तपत्रांचा खप कमी होऊ लागला म्हणजे पत्रकारिता संपू लागली असे कधीच होत नसते. त्याची कारणे अनेक आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे कारण मुल्यांची अन् विश्वासार्हता याची जपणूक हे आहे. हे जपले जात नसल्यानेच खरी कसोटी लागली आहे.
राजेंद्र घोरपडे
बदलत्या युगात अनेक माध्यमे ही बंद पडू लागली आहेत. पण हे काही आत्ताच घडते असे नाही. पूर्वीच्याकाळीही घडले आहे. जे बदलत्या काळानुसार बदलायला शिकले तेच टिकले. पण यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बदलताना मुल्यांची जपणूक ज्यांनी केली तेच चिरंतर राहीले. सांगण्याचा उद्देश हाच की पत्रकारिता हा एक विचार आहे. अन् तो कधीच संपत नसतो. फक्त त्याचे स्वरुप बदलते. पूर्वीच्याकाळी नारद मुनी इकडच्या बातम्या तिकडे देत होते. तिकडच्या बातम्या इकडे देत होते. म्हणजे ते एक पत्रकारच होते. चालते फिरते वृत्तपत्रच ते. त्यावरच त्यांचा चरितार्थ चालत होता. पण त्यांनी मुल्ये जपली म्हणूनच त्यांचे गुणगान आजही गायिले जाते.
छापील वृत्तपत्रांचा खप कमी होऊ लागला म्हणजे पत्रकारिता संपू लागली असे कधीच होत नसते. त्याची कारणे अनेक आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे कारण मुल्यांची अन् विश्वासार्हता याची जपणूक हे आहे. हे जपले जात नसल्यानेच खरी कसोटी लागली आहे. विचारांना संपविण्यासाठी गोंधळ घालणाऱ्या गोंधळ्यांचा आजकाल सुळसुळाट झाला आहे. स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांची ही कृत्ये सुरू आहेत. म्हणूनच सावध होणे गरजेचे आहे. गोंधळ घालायचा अन् निवडणूक जिंकायची हा एक ट्रेन्डच आहे. तोडा फोडा अन् राज्य करा हा इंग्रजी विचारच सध्या जोर धरत आहे. पत्रकारिता ही याचीच बळी ठरू लागली आहे. म्हणून पत्रकारिता संपली असे म्हणता येत नाही. इंग्रज आपल्या संस्कृतीच्या विचारांना कंटाळूनच गेले. कारण या मातीत त्यांचा उद्योग जोर धरू शकला नाही. शाश्वत विचारांची आपली संस्कृती आपण यासाठीच जपली पाहीजे.
विचाराकडे उद्योग म्हणून पाहू नका, हे लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच पत्रकारितेचा उद्योग होऊ शकत नाही. कॉर्पोरेट संस्कृतीने हे लक्षात घ्यायला हवे. इंग्रजाप्रमाणे पत्रकारितेत आलेले हे कॉर्पोरेट उद्योग हे क्षेत्र सोडून जातील. पण माझा भारत जसा राहीला तसा ही पत्रकारिता आहे तिथेच राहील. कारण भारतीय संस्कृती एक विचार आहे तो विचार कधीच संपत नाही. इंग्रज हे व्यापारी होते. व्यापारात नुकसान होऊ लागल्यानेच ते सोडून गेले. पत्रकारितेत आलेले हे कॉर्पोरेट इंग्रज उद्योग चालत नाही म्हणून निघून जातील. म्हणजे पत्रकारिता संपली असे समजू नका. सध्या सोशल मिडिया हे सुद्धा एक पत्रकारितेचे माध्यम आहे. आपले विचार मांडण्यासाठी मुक्त व्यासपीठच आहे. मुल्ये अन् विश्वासार्हता जपली तर यातही आपण आपले वर्चस्व सिद्ध करू शकतो हे विचारात घ्यायला हवे. येणारी नवी माध्यमे वापरून आपण आपल्या विचारांची पत्रकारिता जीवंत ठेऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.