सावित्रीच्या लेकी पुरस्काराने अॅड. यशोमती ठाकूर, डॉ. भावना पाटोळे सन्मानित
पुण्यातील ऐतिहासिक फुले वाड्यात डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते सन्मान
पुणे – सावित्रीच्या लेकी होणं म्हणजे काय हे तुम्ही नीट लक्षात ठेवायला पाहिजे, स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात तुम्ही पेटून उठले. संविधानाची एक प्रत आपल्या हातात ठेवून राज्यकर्त्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी सावित्रीच्या लेकींना केले आहे.
लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षन विज्ञानाभिमुखता व राष्ट्रवाद ही पंचसूत्री आदर्श मानून व माहिती व तंत्रज्ञान युगातील विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांची समतावादी संघटना हे घोषवाक्य घेऊन इंडियन स्डुडंट कौन्सिलची स्थापना झाली आहे. या इंडियन स्टूडेंट कौन्सिल तसेच महाराष्ट्र संचालनालयाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने सावित्रीच्या लेकी पुरस्कार सोहळा पुणे येथील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यात आयोजित केला होता. यावेळी डॉ. आढाव बोलत होते.
डॉ. आढाव म्हणाले, भारतीय संविधानाने कुणालाही मनमानी व निरंकुश राज्य करण्याची मुभा दिली नाही. मनुस्मृतीने स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नका असे सांगितले. सावित्रीच्या लेकी पुरस्काराच्या सन्मान प्राप्त करणाऱ्या लेकीवर आता महिलांच्या उत्थानाची मोठी जबाबदारी आलेली आहे ती त्यांनी पार पाडावी असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
गेली विधिमंडळाच्या अनेक दशके सदस्य म्हणून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुण, तसेच महिलांच्या विविध समस्यांवर महाराष्ट्र विधान मंडळात आपला आवाज बुलंद करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना मानाचा सावित्रीच्या लेकी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अॅड. ठाकूर यांना शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्यासह या सोहळ्यात अभिनेत्री अश्विनी गिरी, मुंबईच्या प्रा. भावना पाटोळे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रा. डॉ अनिता पाटील, ठाणे येथील प्रा डॉ. प्रज्ञा आशीर्वाद, लातूर येथील प्रा डॉ. माधवी महाके, नागपूरच्या अनिता मसराम, धाराशिव येथील आदर्श शिक्षिका बबीता महानोर यांचाही सावित्रीच्या लेकी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी मार्गदर्शक ठरलेल्या विविध क्षेत्रातील सावित्रीच्या लेकींना पुरस्कृत करण्यात आले होते, राजकीय क्षेत्रातून अॅड. यशोमती ठाकूर यांचाही त्यामध्ये समावेश होता.
या सोहळ्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्काराचे सुद्धा वितरण करण्यात आले. अभिनेते मकरंद अनुसपुरे, माजी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य महेश देशमुख, ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेश पाटील यांना शाहू महाराज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.