29 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा पडदा उघडण्यापूर्वी…
झाडीपट्टीतील साहित्यिक व त्यांचे साहित्य (झाडीबोली, मराठी व हिंदीतीलही) सुद्धा आजही अनुल्लेखित ठेवण्याचे प्रमाण मराठीतील बहुतेक तथाकथित साहित्यिक-मार्तण्डांचे मनसुबे आजही विरलेले नाहीत. त्यांचे हे विद्वेषी मनसुबे प्रेमपूर्वक समादराने उधळून लावण्यासाठी आमच्या झाडीबोली साहित्य चळवळीचा हातभार लागावा आणि हे (तथाकथित) कारस्थान आमच्या स्नेहार्द्र सहभागाने हाणून पाडावे असे आम्हा झाडीपट्टीवासीयांचे स्वाभाविक प्रयत्न आहेत.
बोरकन्हार (झाडीपट्टी) – 441902,
ॲड.लखनसिंह कटरे
ता. आमगांव, जि. गोंदिया.
विदर्भ – महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या अगदी पूर्वटोकावरील, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या (तीन तिगाडा) सीमाक्षेत्रात वसलेल्या झाडीपट्टीतील गोंदिया जिल्ह्याच्या इतिहास-प्रसिद्ध आमगांव तालुक्यातील पदमपूर (पद्मपूर) येथे होऊन गेलेला भवभूति हा महाकवी/नाटककार अजूनही दुर्लक्षितच आहे. मिराशी यांनी भवभूति यांचे (पदमपूर) हे स्थान संशोधनानंतर सिद्ध केले आहे.
राजदरबारपुरती मर्यादित असलेली नाट्यकला खऱ्या स्वरूपात बहुजनांसाठी मोकळी करणारा, खुले रंगमंच या आधुनिक संकल्पनेचे कदाचित मूळ ठरावे अशा खुल्या दगडी खांबाच्या कायम नाट्य सभामंडपाचेआविष्कार(!) करणारा भारतातील पहिलाच महाकवी/नाटककार म्हणून पुरातत्ववेत्त्यांद्वारे अनुमानित असलेला भवभूति, झाडीपट्टीतील पदमपूर येथील, तत्कालीन दगडी नाट्य-सभामंडपाच्या भग्नावशेषात अजूनही दडवूनच ठेवण्यात आला आहे, ही कटू वस्तुस्थितीच आहे.
भवभूतिने त्याच्या मालतीमाधव या नाटकात एक श्लोक लिहिला आहे. तो असा
ये नाम केचिदिह न प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यत्नः |
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिः विपुला च पृथ्वी ||
याचा संक्षिप्त भावार्थ असा की, समकालीन विद्वानांनी जरी भवभूतिच्या रचनांची कदर केली नसेल तरी काळ आणि पृथ्वी अनंत असून भविष्यात कधीतरी/कोणीतरी समानधर्मा गुणग्राहक भेटेल व भवभूतिला न्याय मिळवून देईल.
असे असले तरी आमचा शेजारी भवभूति अजूनही महाराष्ट्रात पाहिजे त्या प्रमाणात चर्चिला, अभ्यासला, नावाजला जाताना दिसत नाही. उलट हिंदी पट्ट्यात विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात भवभूतिच्या काव्याचे/नाटकाचे अध्ययन केले जात असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील संस्कृती-अभ्यासकांनी, इतिहासकारांनी, संशोधकांनी, पुरातत्ववेत्त्यांनी, साहित्यिकांनी आतातरी भवभूतिचे महत्त्व व एकूणच साहित्यिक, सांस्कृतिक इतिहासातील त्याचे महत्वपूर्ण स्थान अभ्यासून त्याची कटू भविष्यवाणी सत्य ठरवावी असे आम्हाला वाटते.
भवभूतिचे वास्तव्य असलेल्या झाडीपट्टीतील या पदमपूरच्या परिसरातच कै. लक्ष्मणराव मानकर गुरुजींनी स्थापित केलेल्या भवभूति शिक्षण संस्थेचे भवभूति कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय असून या महाविद्यालयाच्या 30 जून 2021 ला निवृत्त झालेले प्राचार्य डाॅ. श्रीराम भुस्कुटे यांनी या महाविद्यालयाच्या प्रांगणात अतिशय दुर्मिळ अशा वनस्पतींची अतिशय देखणी अशी बाग फुलवून एक मिनी पर्यटन स्थळच तयार केले आहे.
अशा या आमच्या झाडीपट्टीतील शेजाऱ्याला समजून घेण्यासाठी पदमपूर येथे त्याचे भव्य स्मारक उभारून गोंदिया या जिल्हास्थळी भवभूतिच्या नावाने एखादे सर्वसुविधासंपन्न नाट्यगृह सुद्धा उभारण्यात यावे अशी समस्त झाडीपट्टी-वासीयांची मागणीआहे. तसेच किमान नागपूर विद्यापीठात तरी भवभूतिच्या सर्व साहित्याचा सर्वंकष अभ्यास करता येईल अशी अद्यतन व्यवस्था उभारण्यात यावी, अशीही आमची इच्छा आहे. अशी मागणी बोरकन्हार येथे यशस्वीरित्या पार पडलेल्या 9व्या (2002) व 26व्या (2018) झाडीबोली साहित्य संमेलनातील एकमुखी ठरावाद्वारे शासनाकडे केलेली असून अजूनही आम्ही सारे झाडीपट्टीवासी आमच्या या मागणीवर कायम आहोत.
या झाडीपट्टीतील कवी/नाटककार भवभूतिच्या खेददर्शक अभिमताची कटू प्रचीती आम्हाला आजसुद्धा येतच असते. आमच्या झाडीपट्टीतील साहित्यिक व त्यांचे साहित्य (झाडीबोली, मराठी व हिंदीतीलही) सुद्धा आजही असेच अनुल्लेखित ठेवण्याचे प्रमाण मराठीतील बहुतेक तथाकथित साहित्यिक-मार्तण्डांचे मनसुबे आजही विरलेले नाहीत. त्यांचे हे विद्वेषी मनसुबे प्रेमपूर्वक समादराने उधळून लावण्यासाठी आमच्या झाडीबोली साहित्य चळवळीचा हातभार लागावा आणि हे (तथाकथित) कारस्थान आमच्या स्नेहार्द्र सहभागाने हाणून पाडावे असे आम्हा झाडीपट्टीवासीयांचे स्वाभाविक प्रयत्न आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.