April 16, 2024
Spiritual Development through self recognisation article by Rajendra Ghorpade
Home » स्वःच्या अनुभुतीतूनच आध्यात्मिक विकास
विश्वाचे आर्त

स्वःच्या अनुभुतीतूनच आध्यात्मिक विकास

ही शक्ती सर्वांना मान्य करावीच लागेल. कारण हा प्राण प्रत्येक सजीवात आहे. तोच सर्वत्र व्यापलेला आहे. सर्वांच्या ठायी असणारा प्राण हा एकच आहे. सर्वत्र जाणवणारी शक्ती ही तीच आहे. या शक्तीच्यामुळेच जगातील व्यवहार सुरू आहेत. अगदी सूर्यही या शक्तीमुळेच अस्तित्वात आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

म्यां हालविल्या वेदु बोले । म्यां चालविल्या सूर्यु चाले ।
म्यां हालविल्या प्राणु हाले । जो जगातें चाळितां ।। 283 ।। ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा

ओवीचा अर्थ – मी बोलविल्याने वेद बोलतो, मी चालवल्याने सूर्य चालतो. मी हालवल्याने जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो.

विज्ञानाचे विचार जिथे संपतात, तेथून अध्यात्माला सुरवात होते. अवकाशाच्या पोकळीला अंत नाही. विज्ञानही हा अंत शोधू शकलेले नाही. येथे विज्ञानाची मर्यादा संपते. तेथून या विश्वाच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्यासाठी अध्यात्मशास्त्राचा विचार सुरू होतो. पूर्वीच्या काळात मृत्यूलासुद्धा रोखण्याचे सामर्थ्य मनुष्यामध्ये होते असे सांगितले जाते. आपण या घटनांना सध्या दंतकथा म्हणून सोडून देतो. संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविले हीसुद्धा आपण दंतकथा समजतो. पण बारकाईने विचार केला तर यातही तथ्य आहे.

संगीताच्या तालावर गायीचे दूध देण्याची क्षमता वाढते, काही पिकांचे उत्पादन वाढते. हे सिद्ध झाले आहे. ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण सुरू असलेल्या ठिकाणी वातावरणात फरक जाणवतो. तेथे गेल्यानंतर विचार बदलतात. वृत्तीमध्ये फरक पडतो. ते शब्द फक्त कानी पडल्यानंतर हा फरक जाणवतो. मग प्राण्यांचे हंबरणे का बदलणार नाही ? तितके सामर्थ्य त्या काळातील योगीपुरुषांमध्ये निश्चितच असू शकेल. विज्ञानाने हा चमत्कारही सिद्ध करता येऊ शकेल. पावसाची दिशा बदलण्याचे सामर्थ्यही योगीपुरुषांमध्ये होते. पण सध्या सिद्धता असेल तरच त्यावर भाष्य करणे योग्य आहे. शक्यतेच्या गोष्टी सध्या पटत नाहीत. त्याला अंधश्रद्धाही म्हटले जाते.

सध्या हे आपण सिद्ध करू शकत नाही त्यामुळे या दंतकथा समजल्या जातात. रेड्याऐवजी रेडे नावाची व्यक्ती असेल असेही सांगितले जाते. पूर्वीच्याकाळी वेदपठणाचा अधिकार फक्त ब्राह्मण समाजासच होता त्यामुळे रेडे नावाच्या व्यक्तीने वेद म्हटले तर ते आश्चर्य होऊ शकते. पण यामुळे मूळ विचाराला बगल दिली जाते. ही अद्भुत शक्ती, सामर्थ्य याला बगल मिळते. पण ही शक्ती म्हणजे प्राण आहे. जीव आहे. तो देहात कसा आला आणि कसा गेला हे विज्ञान सिद्ध करू शकत नाही. तो देहात आणण्याचे सामर्थ्यही विज्ञान करू शकत नाही.

ही शक्ती सर्वांना मान्य करावीच लागेल. कारण हा प्राण प्रत्येक सजीवात आहे. तोच सर्वत्र व्यापलेला आहे. सर्वांच्या ठायी असणारा प्राण हा एकच आहे. सर्वत्र जाणवणारी शक्ती ही तीच आहे. या शक्तीच्यामुळेच जगातील व्यवहार सुरू आहेत. अगदी सूर्यही या शक्तीमुळेच अस्तित्वात आहे. तेथे असणारी शक्तीही तीच आहे. हे जग त्यामुळेच अस्तित्वात आहे. सूर्यापासूनच सूर्य मालिका उत्पन्न झाली आहे. ही सृष्टीही सूर्यापासूनच उत्पन्न झाली आहे. शेवटी ती सूर्याभोवती फिरते अन् सूर्यातच मिसळणार आहे.

विश्वाचा विचार केला तर आपण कोण आहोत हेच प्रथम आपणास शोधावे लागेल. हे जेव्हा समजेल तेव्हांच आपणास आपले सामर्थ्य लक्षात येईल. म्हणजे आपल्यामध्ये असणारी सर्व प्रकारची शक्ती ही वेगळी आहे. येणारे विचार ही अन्य कोणीतरी आपणास सांगते आहे. म्हणजेच आपणाला कोणीतरी बोलते करते आहे. या शक्तीची जाणीव आपणास होईल तेव्हाच आपणाला आपली ओळख समजेल. मीची ओळख होईल. म्हणजेच आपले सामर्थ्य आपल्या लक्षात येईल. स्वः सामर्थ्यातूनच स्वःच्या अनुभुतीतूनच आपला आध्यात्मिक विकास होतो. यासाठी स्वःची ओळख आपण करून घ्यायला हवी.

Related posts

आमचा अशोक इकडे आलाय का ?

निरोगी करडांसाठी अशी घ्या शेळ्यांची काळजी

“दुर्गांच्या देशातून : वैविध्याने नटलेला दिवाळी अंक नव्हे, संदर्भ ग्रंथ”

Leave a Comment