October 18, 2024
India Become trachoma free country
Home » Privacy Policy » भारत झाला खुपऱ्यामुक्त ( ट्रॅकोमा )
संशोधन आणि तंत्रज्ञान

भारत झाला खुपऱ्यामुक्त ( ट्रॅकोमा )

भारताचा खुपऱ्यामुक्त होण्याचा प्रवास सार्वजनिक आरोग्यातील संघटित कामाचे आणि समुदायाच्या पाठिंब्याचे एक उदाहरण आहे. डबल्यूएचओच्या (SAFE ) धोरणाचा अवलंब करून देशाने या गंभीर डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण यशस्वीपणे कमी केले आहे. सरकारी संस्थां, आरोग्यसेवा कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांमधील सहकार्य या यशात महत्त्वाचे ठरले आहे.

खुपऱ्याचा परिचय

सुस्पष्ट दृष्टी ही जीवनातील सर्वात मौल्यवान भेटवस्तूंपैकी एक आहे, जी दैनंदिन आयुष्यातील व्यवहार, शिक्षण आणि एकूणच आपल्या कल्याणासाठी गरजेची आहे. मात्र, ट्रॅकोमा अर्थात खुपऱ्यांसारख्या अनेक रोगांमुळे डोळ्यांच्या दृष्टीस गंभीर धोका निर्माण होतो, ज्यामुळे उपचार न केल्यास अपरिवर्तनीय अंधत्व येऊ शकते.

ट्रॅकोमा, हा एक अतिशय संसर्गजन्य जीवाणू संसर्गाचा आजार असून, जगभरात प्रतिबंध करता येण्याजोग्या अंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे.

डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार जगभरात 150 दशलक्ष लोक ट्रॅकोमाने प्रभावित आहेत आणि त्यापैकी 6 दशलक्ष अंध आहेत किंवा दृष्टिहीन होण्याची गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका आहे. यापैकी ट्रॅकोमाचे संसर्गजन्य टप्पे सहसा बालकांमध्ये आढळतात.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताला अधिकृतपणे ट्रॅकोमापासून मुक्त घोषित केल्याने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कामगिरी भारताने साध्य केली आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी निरोगी दृष्टीच्या आवश्यकतेवर भर देत लाखो लोकांच्या दृष्टीचे संरक्षण करण्यासाठी सरकारच्या अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर हा टप्पा गाठला गेला आहे.

ट्रॅकोमा म्हणजे काय ?

ट्रॅकोमा हा क्लॅमिडीया ट्रॅकोमायटिस या जीवाणूच्या संसर्गामुळे होणारा डोळ्यांचा एक अतिशय गंभीर आजार आहे. संक्रमित व्यक्तींच्या डोळ्यातील स्राव ट्रॅकोमा संसर्गाचा प्राथमिक स्त्रोत आहे, तो अनेक मार्गांद्वारे प्रसारित केला जाऊ शकतो, ती कारणे अशी :

  • एकत्र खेळणे किंवा एकाच बिछान्याचा वापर, विशेषतः माता आणि संक्रमित बालकांमध्ये होणाऱ्या संपर्कासारखे निकटचे प्रत्यक्ष संपर्क.
  • एकमेकांचे टॉवेल, रुमाल, उशा आणि इतर वैयक्तिक वस्तूंचा वापर करणे.
  • संसर्ग पसरवू शकणाऱ्या घरमाशा.
  • खोकणे किंवा शिंकणे.

ट्रॅकोमाचे संक्रमण फैलावणासाठी पोषक ठरणाऱ्या पर्यावरणीय जोखमी खालीलप्रमाणे आहेत:

  • अस्वच्छ व्यवहार.
  • अतिशय जास्त दाटीवाटीने रहावे लागणे.
  • पाणी टंचाई.
  • अपुरी शौचालये आणि स्वच्छता सुविधा

संसर्गाचे चक्र खंडीत करण्यासाठी आणि संसर्ग अधिक पसरण्यास प्रतिबंध करण्यासाठी जोखमीचे असलेले हे घटक विचारात घेणे महत्त्वाचे आहे.

बालकांना ट्रॅकोमाचा सर्वाधिक जास्त धोका:

मुलांना वारंवार संसर्ग होत असल्याने, त्यांच्या वरच्या पापण्यांच्या आतील पृष्ठभागावर व्रण निर्माण होऊ शकतात.या व्रणांमुळे ट्रॅकोमॅटस ट्रायकियासिस म्हणून ओळखली जाणारी वेदनादायक स्थिती निर्माण होते, ज्यात पापण्यांच्या कडा आतील बाजूला वळतात, ज्यामुळे पापण्यांचे सातत्याने डोळ्यांच्या बुबुळांसोबत घर्षण होते. परंतु हा धोका इतकाच मर्यादित नसतो. उपचार न केल्यास, या स्थितीचे रुपांतर दृष्टीदोषात होऊ शकते. संशोधन असे दर्शविते की अंधत्व निर्माण करू शकणाऱ्या ट्रॅकोमाशी संबंधित गंभीर गुंतागुंत निर्माण होण्यासाठी व्यक्तींना त्यांच्या आयुष्यभरात 150 पेक्षा जास्त संसर्गांना तोंड द्यावे लागू शकते.

ट्रॅकोमाविरोधातील लढाईत भारताचा विजय

1950 आणि 1960 च्या दशकात ट्रॅकोमा ही भारतातील सार्वजनिक आरोग्याची एक गंभीर समस्या होती. गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि निकोबार बेटे यांसारख्या राज्यांमध्ये त्यांच्या लोकसंख्येपैकी 50% पेक्षा जास्त लोकांना या संसर्गाला तोंड द्यावे लागल्याने, या राज्यांना याची मोठ्या प्रमाणावर झळ पोहोचली होती. 1971 पर्यंत, देशातील अंधत्वाच्या सर्व प्रकरणांमध्ये 5% प्रकरणांसाठी ट्रॅकोमा जबाबदार होता. या गंभीर समस्येला प्रतिसाद म्हणून, भारताने या समस्येचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने अनेक उपाययोजना राबवल्या.

ट्रॅकोमाला तोंड देण्यासाठी उपाययोजनाः

ट्रॅकोमा या आरोग्यविषयक समस्येचा सामना करण्याची तातडीची गरज लक्षात घेऊन, भारताने राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रम (NPCBVI) अंतर्गत अनेक प्रमुख उपक्रम सुरू केले. या उपक्रमांमधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे WHO SAFE धोरणाचा अवलंब करणे, ज्याचा उद्देश केवळ विद्यमान प्रकरणांवर उपचार करणे नव्हे तर सुधारित स्वच्छता पद्धतींद्वारे भविष्यातील संक्रमणास प्रतिबंध करणे हा देखील होता. ट्रॅकोमाचा सामना करण्यासाठी भारताने वेळोवेळी उचललेल्या विविध उपाययोजनांवर एक नजर टाकाः

  1. राष्ट्रीय ट्रॅकोमा नियंत्रण कार्यक्रमाचा प्रारंभ:

1963 मध्ये, भारत सरकारने, WHO आणि UNICEF च्या सहकार्याने, राष्ट्रीय ट्रॅकोमा नियंत्रण कार्यक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे खालील गोष्टींवर भर देत सर्वसमावेशक ट्रॅकोमा व्यवस्थापनाचा पाया घातला गेला:

  • शस्त्रक्रिया उपचार: ट्रॅकोमॅटस ट्रायकियासिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंधत्वकारक स्थितीवर उपाय करणे.
  • प्रतिजैविकांचा वापर: अस्तित्वात असलेला संसर्ग दूर करणे
  • चेहऱ्याची स्वच्छता: संक्रमण कमी करण्यासाठी स्वच्छतेला प्रोत्साहन देणे
  • पर्यावरणीय सुधारणा: पाणी आणि स्वच्छतागृहांच्या उपलब्धतेत वाढ करणे.

राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये एकीकृत:

    1976 मध्ये, खुपऱ्या नियंत्रणाच्या प्रयत्नांचा समावेश एनपीसीबीव्हीआय (नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस अँड व्हिज्युअल इम्पेअरमेंट) च्या व्यापक कार्य कक्षेमध्ये करण्यात आला, ज्यामुळे निर्मूलनाच्या उपक्रमांसाठी सातत्यपूर्ण लक्ष देणे शक्य झाले आणि संसाधने सुनिश्चित करण्यात आली.

    महत्वपूर्ण प्रगती:

      2005 मध्ये, भारतातील अंधत्वाच्या प्रकरणांमध्ये खुपऱ्याचा वाटा 4% होता. उल्लेखनीय म्हणजे, 2018 पर्यंत हा आकडा केवळ 0.008% पर्यंत घसरला. या यशाची पडताळणी प्रभाव मूल्यांकन, पूर्व-प्रमाणन, आणि ट्रिचियासिस सर्वेक्षणांच्या मालिकेद्वारे झाली, ज्यामुळे पूर्वी खुपऱ्याची साथ असलेल्या सर्व प्रांतांमध्ये निर्मूलनाचे लक्ष्य पूर्ण झाले असल्याचे सिद्ध झाले.

      या निरंतर प्रयत्नांमुळे, भारताने खुपऱ्या निर्मूलनाकडे महत्वपूर्ण वाटचाल केली आहे. 2017 पर्यंत, भारताला संसर्गजन्य खुपऱ्यामुक्त घोषित करण्यात आले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय खुपऱ्या सर्वेक्षण अहवाल (2014-17) प्रकाशित करताना ही घोषणा केली. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, सर्व सर्वेक्षण केलेल्या जिल्ह्यांमध्ये मुलांमध्ये सक्रिय खुपऱ्याच्या संसर्गाचा नाश झाला होता आणि एकूण प्रसार फक्त 0.7% होता – (जागतिक आरोग्य संघटनेच्या {डबल्यूएचओ} 5% निर्मूलनाच्या मर्यादेपेक्षा बरेच कमी)

      या उल्लेखनीय प्रगतीनंतर देखील, सार्वजनिक आरोग्याप्रति वचनबद्धता याबरोबर संपली असे नाही. 2019 ते 2024 दरम्यान, भारताने सर्व जिल्ह्यांमध्ये खुपऱ्याच्या प्रकरणांवर सतर्कतेने देखरेख सुरू ठेवली, जेणेकरून हा संसर्ग पुन्हा उद्भवू नये. ही चालू असलेली देखरेख प्रक्रिया, खुपऱ्यामुक्त स्थिती कायम ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि भारताच्या नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तसेच टाळता येण्याजोग्या आंधळेपणास प्रतिबंध करण्यासाठी भारताच्या समर्पणाचे दर्शन घडवते.

      डबल्यूएचओने खुपऱ्याविरुद्ध भारताच्या प्रभावी उपायांचे केले कौतुक

      जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस एडनॉम घेब्रेयसस यांनी खुपऱ्यामुळे होणारा त्रास दूर करण्याप्रति भारताच्या वचनबद्धतेचे कौतुक केले, सरकार, आरोग्यसेवा व्यावसायिक, आणि आंतरराष्ट्रीय भागीदार यांच्यातील महत्त्वपूर्ण सहकार्यामुळे ही कामगिरी साध्य झाली आहे.

      भारत आता नेपाळ, म्यानमार आणि इतर 19 देशांच्या यादीत आहे, ज्यांनी खुपऱ्या ला एक सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून यशस्वीपणे निर्मूलन केले आहे. मात्र, हा रोग अजूनही 39 देशांसाठी एक मोठे आव्हान आहे, जागतिक स्तरावर अंदाजे 1.9 दशलक्ष लोक यामुळे प्रभावित होतात आणि अनेक प्रकरणांमध्ये अपरिवर्तनीय अंधत्व येते.

      निष्कर्ष

      भारताचा खुपऱ्यामुक्त होण्याचा प्रवास सार्वजनिक आरोग्यातील संघटित कामाचे आणि समुदायाच्या पाठिंब्याचे एक उदाहरण आहे. डबल्यूएचओच्या (SAFE ) धोरणाचा अवलंब करून देशाने या गंभीर डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण यशस्वीपणे कमी केले आहे. सरकारी संस्थां, आरोग्यसेवा कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांमधील सहकार्य या यशात महत्त्वाचे ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून खुपऱ्याचे निर्मूलन करणाऱ्या इतर राष्ट्रांमध्ये भारत सामील होत असून ते विद्यमान प्रयत्न , सातत्यपूर्ण सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम आणि भावी पिढ्यांना चांगली दृष्टी मिळू शकेल याची खात्री करण्यासाठी समर्पित वृत्तीची गरज अधोरेखित करते.


      Discover more from इये मराठीचिये नगरी

      Subscribe to get the latest posts sent to your email.

      Related posts

      Leave a Comment

      श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
      error: Content is protected !!

      Discover more from इये मराठीचिये नगरी

      Subscribe now to keep reading and get access to the full archive.

      Continue reading