सर्वांच्या जीवनातून हरवलेल्या दिवसांच्या रम्य आठवणी आहेत. ऋतूचक्राचे सूक्ष्म बारकावे आहेत. त्याचे बदलते संगीत आहे. निसर्गाने दिलेले नानाविध गंध आणि पक्षीकीटकांनी दिलेली मंतरधूनही आहे. हे सारे लेख वाचकांना निसर्गाशी, त्याच्या भाषेशी आपोआप जोडतात. येथील प्रत्येक लेख मानवाचे निसर्गाशी असलेले आदिम नाते पुन्हा उजागर करतात. त्याला पुन्हा निसर्गाशी जोडू पाहतात.
नंदकुमार मोरे, मराठी विभाग प्रमुख,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
हे पुस्तक म्हणजे निसर्गाशी तादात्म्य पावल्यानंतर ऐकू येणारी ही ‘मंतरधून’ आहे. येथील प्रत्येक लेखामध्ये निसर्गाबरोबरचा सुसंवाद आहे. या संवादाची भाषा जिज्ञासेतून घडली आहे. ऋतू बदलतात तसा निसर्ग नवे रूप घेतो. हे नवे रूप मनस्वीपणे न्याहाळणे हा अनेकांचा छंद असतो. योगिता राजकर यांनीही अशाच पद्धतीने जोपासलेला हा छंद आहे. तो त्यांनी येथे फार मनस्वीपणे शब्दबद्ध केला आहे. ऋतूनुसार बदलणारी निसर्गाची नानाविध रूपं येथे आलेली आहेत. या रूपांचा शोध निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निसर्गाचा रूपशोध अनेकांनी आपल्याआपल्या पद्धतीने घेतलेला आहे. हा शोध व्यक्तीनुसार बदलताना दिसतो. निसर्गाबरोबर संवादी होऊन केलेली निरीक्षणे आणि त्यावरील लेखनाचीही मोठी समृद्ध परंपरा आहे. या परंपरेतच हे वैशिष्ट्यपूर्ण लेखन समाविष्ठ करता येईल.
कडक उन्हाळ्याच्या म्हणजे ग्रीष्माच्या दिवसातील तगमग आणि अशात मिळणारा झाडाचा आधार येथूनच या निसर्गसंवादाची सुरुवात होते. ऋतुमानात बदलणारे आकाशाचे रंग, झाडांची परिभाषा येथे टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखिका करताना दिसते. जगताना निसर्गच आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न ठेवत असतो. मानवी जीवनाची संपन्नता निसर्गसान्निध्यात आहे. त्यामुळे निसर्गाचा साक्षात्कार आणि त्याच्या सहवासात प्रसन्न होणाऱ्या मानवी चित्तवृत्ती या लेखांमधून अभ्यासता येतात. आपल्या चित्तवृत्ती कुठे आणि कशा प्रसन्न होतात, याचाच एक शोध या लेखांमधून पुढे येतो.
‘खोड’ या पहिल्या लेखापासून सुरू होणारा निसर्गाबरोबरचा संवाद अनेक रूपे घेत बहरत जातो. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक वनस्पतींचे बारकाईने केलेले निरीक्षण येथे आत्मचिंतनास प्रवृत्त करते. आपणच निसर्गाचे एक घटक असल्याने आपल्या सभोवताली निसर्ग असतोच. परंतु, त्याचे निरीक्षण आणि बारकावे सर्वांनाच करता येतात असे नाही. त्यासाठी निसर्गवादी दृष्टी असावी लागते. सृष्टीबद्दलचा सद्भाव मनामध्ये असावा लागतो. मनात सभोवतालच्या जीवसृष्टीबद्दल अपार करुणा वसावी लागते. तेव्हाच निसर्ग तुमच्याशी संवादी होतो. येथे तसा निसर्ग संवादी झाला आहे.
निसर्गाची नानाविध रूपे न्याहाळताना सुचलेले सारे येथे शब्दबद्ध होत जाते. किती प्रकारची झाडे आपल्या सभोवताली आहेत, त्यांची रूपवैशिष्ट्ये काय असतात, त्यांचे स्पर्श कसे वाटतात, कोणत्या झाडावर कोण पक्षी राहतो, तो त्या खोडाशी कसा वागतो, या खोडांचे माणूस व्यावहारिक उपयोग काय करतो अशा नानाविध प्रश्नांचा शोधच येथे घेतला जातो. त्यासाठी वापरलेली प्रतिमांची भाषाही एखाद्या कवितेसारखी वाटते. उदाहरणार्थ, मक्याच्या झाडाबद्दल लिहिताना लेखिका म्हणते, ‘कडेवर बाळ घेतलेल्या बाईसारखी मका कणसांना खोडावर जोजवत असते…’ लेखिका अशा पद्धतीने बारीक निरीक्षण करते. काही झाडांवर बारीक लव असते. काही झाडांवर पक्षी ढोल कोरतात, काही खोडं काट्यांची, काही फुलांनी बहरलेली. निवडुंगाच्या खोडावर विविधरंगी फुलांचा नजराणा असतो तर ब्रह्मकमळासारखे झाड म्हणजे खोडच पान असते. पानाला पान फुटत जात ते घडते. ही निरीक्षणे आज दुर्मिळ होत चाललेल्या निसर्गसंवादाची नवी परिभाषा शिकवते.
निसर्गाची स्पंदने टिपणारी लेखिकेची नजर अतिशय सूक्ष्म आहे. शिवाय ती रोमँटिकही आहे. कारण त्या पातळीवरची वर्णने या लेखनात सतत येत राहतात. उदाहरणार्थ, शब्दांतून आपसूक पाझरत येते गुलमोहरलेली सांज, आकाशाची शांत निळाई, आभाळाच्या प्रतलावर चांदणफुलं, किरणांचे गोंदण, सायंकालीन रक्तिमा, आकाशाच्या अंगणात नक्षत्रफुलं पैंजण पावलांनी रुणझुणतात इत्यादी वाक्य किंवा शब्दप्रयोग हे दर्शवतात. वास्तविक आजच्या काळात सोनपंखी उन्हाचे कवडसे दिसतात का? खळाळून वाहणाऱ्या नद्या उरल्यात का? झऱ्यांचे अवखळ पाणी आणि डोंगरदऱ्याही सुरक्षित राहिल्या आहेत का? असे अनेक प्रश्न पडण्याचा हा काळ आहे. अशा काळात निसर्गाची ही वर्णने कवीकल्पनाच वाटण्याची शक्यता जास्त आहे. अशा पद्धतीचा अनुभव देणारी निसर्गरूपे लेखिकेला दिसतही असतील. परंतु, ती व्यक्त करण्यासाठी वापरलेली इतकी आलंकारिक भाषा एक वाचक म्हणून खटकते हे मात्र नक्की.
हे लेख म्हणजे एक प्रकारचा मनाशी चाललेला संवाद आहे. या संवादात निसर्गगंधाच्या अनुभवाचा पुनरुच्चार आहे. आपली जीवनजाणीव निसर्गाने समृद्ध केल्याचे लेखिका सांगतात. निसर्गाशी तद्रुप होताना सगळे पाश गळून पडतात, असा त्यांचा अनुभव आहे. वास्तविक या सृष्टीचे आकलन हेच खरे ज्ञान आहे. कारण निसर्ग मुक्तहस्ते माणसाला शिकवत असतो. त्यामुळेच निसर्गाशी संवादी माणूस ज्ञानी होतो. त्यामुळेच त्या आपली जीवनजाणीव निसर्गाने समृद्ध केल्याचे सांगतात. येथे माती, मातीतून येणारे अंकुर, झाडं, फुलं, पानं आणि त्यांचे नानाविध गंध आहेत. ते वाचकालाही निसर्गाशी जोडतात आणि निसर्गाची परिभाषा शिकवतात.
या लेखांमध्ये निसर्गाशी संवादी असलेल्या संत तुकारामांचा दाखला देऊन निसर्ग आणि माणसाच्या सहजीवनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. गतिमान जग, माहितीचा विस्फोट, सर्वत्र चंगळवाद आणि यामध्ये पर्यावरणाचे सुटलेले भान लेखिका तीव्रतर दु:खाने व्यक्त करतात. विकासाच्या नावाखाली झाडाझुडपांची चाललेली तोड, तस्करी लेखिकेला दु:ख देणारी आहे. त्या याला झाडांची कत्तल म्हणतात. झाडं म्हणजे आपल्या आवतीभोवती असलेली हिरवी लिपी आहे. ती कोरणारा निसर्ग किती अगाध आणि अनंत आहे. त्याची रूपं पाहूनच आपल्या जीवनातील दु:खाचे चटके सुसह्य होतात असे लेखिका म्हणते.
या पुस्तकात ऋतूंनुसार बदलणारा निसर्ग फार सूक्ष्मतेने टिपलेला दिसतो. विशेषत: ग्रीष्माची रूपं वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाली आहेत. या ऋतूत निसर्गाची नजाकत वेगळीच असते. वरून उन्हाचा तडाखा आणि डोळ्याला दिसणारी गुलमोहरासारखी तांबूस केसरिया रंगाची लयलूट हे निसर्गाचे अद्भुत दर्शन आहे. या लेखांमधून गावखेड्यातील पारंपारिक जगणं, तेथील बदल आणि रांजणासारख्या वस्तूचे महत्त्व, मातीपासून बनलेले माठ, कौले, झाकण्या, गाडगी, मडकी या वस्तू बनवणारा कुंभार त्याचे नव्या जगण्यातून जाणे अशा काही बदलत्या गावरहाटीबरोबरच अशा हरवलेल्या बालपणातील रम्य गोष्टीही लेखिका सांगत जातात. बालपणातील अनेक खेळ त्या समोर ठेवतात. वास्तविक हे हरवलेले जगणं वाचकाला आपल्या बालपणात घेऊन जाणारे आहे.
या लेखांमध्ये रातकिड्यांच्या किरकीरीपासून पक्ष्यांच्या मधुर आवाजाची रेलचेल आहे. कीटक आहेत, लहानमोठे कीडे आणि फुलपाखरेही आहेत. त्यांच्या आवाजांची ही मंतरधून आहे. या सर्वांच्या आवाजात शोधलेली धून लेखिकेच्या संवेदनेचे मनस्वी दर्शन आहे. या लेखांच्या निमित्ताने एका निसर्गप्रेमी व्यक्तीचे भावविश्व सर्वांसमोर येते आहे. मुलीचं माहेर, त्याबद्दलची समृद्ध लोकगीते, ओव्या याचाही गंध या लेखांना आहे. जसे ग्रीष्माचे दिवस येथे येतात, तसा पहिल्या पावसाच्या आगमनाने येणारे चैतन्यही आहे. पावसाआधी हवेत येणाऱ्या गारव्यापासून मातीच्या गंधापर्यंतच्या संवेदना येथे मनस्वीपणे व्यक्त झाल्या आहेत. पावसाळी दिवसात येणारे धुके आणि बालपणीच्या शाळेच्या आठवणी असे सारेच प्रत्येकाला आपले वाटावे असे भावविश्व येथे आहे.
एकूणच या लेखांमध्ये आज आटत चाललेल्या निसर्गसंवेदना आहेत. त्या येथे अधिक तीव्रतर जाणवतील. सर्वांच्या जीवनातून हरवलेल्या दिवसांच्या रम्य आठवणी आहेत. ऋतूचक्राचे सूक्ष्म बारकावे आहेत. त्याचे बदलते संगीत आहे. निसर्गाने दिलेले नानाविध गंध आणि पक्षीकीटकांनी दिलेली मंतरधूनही आहे. हे सारे लेख वाचकांना निसर्गाशी, त्याच्या भाषेशी आपोआप जोडतात. येथील प्रत्येक लेख मानवाचे निसर्गाशी असलेले आदिम नाते पुन्हा उजागर करतात. त्याला पुन्हा निसर्गाशी जोडू पाहतात. अलीकडच्या काही वर्षांमध्ये निसर्गाबरोबरचे मानवी नाते संपत चालले आहे. त्याच्याबरोबरचा सद्भभाव आटत चालला आहे. अशा काळात हा सद्भभाव जागे करणाऱ्या या पुस्तकाचे मनापासून स्वागत करावेसे वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.