अशीच अमुची शेती असती.... अशीच असती अमुची बक्कळ शेती, अहो, नोकरीच कधी मी केली नसती...! कौलारू छपराची असती तेथे वस्ती, गाय-म्हशी अन् दोन खिल्लारीही सोबती... कबूल, व्यवसाय-नोकरदारांची बाजारी चलती, परी, भूमीस भुकेली बाला भेटलीच असती ... दह्या-दुधासह रवाळ तुपाचा घमघमाट असता, शेजाऱ्यांना टाकभर जास्तीचाच रतीब असता... ऊस पिकाला दिला असता हो मी फाटा, घेतला असता भात, ज्वारी, गहू न् टमाटा... मेथी, पोकळा, भेंडी, गवारीही केली असती, मध्यस्थांची जिरवून, स्वस्तामध्ये विकली असती... पाला-पाचोळा, शेण-मुताला कुजवून गारी, मातीसाठी बनवले असते सेंद्रीय खत लै भारी... जहरी रासायनिक खतांना देऊन फाटा, उचलला असता मी इको फ्रेंडलीचा वाटा... वाचून माझे हे इमले सारे, हसू नका हो, स्वप्नरंजनाचे सुख तरी हिरावू नका हो... कवी - दिलीप गंगधर ९८८११३३९२९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.