January 25, 2025
The speed of earth's rotation around itself decreases
Home » पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग होतोय कमी !
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग होतोय कमी !

पृथ्वी स्थिर होतेय !

एक तप्त वायुचा गोळा विश्वामध्ये भरकटत होता. अचानक त्या वायुच्या गोळ्यामध्ये मोठा स्फोट झाला. त्या स्फोटामुळे एका मोठ्या गोळ्याचे असंख्य लहान-मोठे तुकडे झाले. ते तुकडे अवकाशात मुख्य गोळ्याभोवती फिरू लागले. गोळ्याच्या गुरूत्वाकर्षणामुळे ते त्याच्या गुरुत्वीय क्षेत्रात त्यांच्या वस्तुमानानुसार प्राप्त कक्षांमध्ये सुस्थापित झाले. या वायुच्या गोळ्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया सूर्यासारख्या घडत नसल्याने त्यांच्यासोबत आलेली ऊर्जा उत्सर्जीत होत राहिली. ऊर्जा कमी झाल्याने ते हळूहळू घनावस्थेत येऊ लागले. यातील मूख्य गोळा म्हणजे आपला सूर्य आणि त्याभोवती फिरणारे लहान गोळे म्हणजे विविध ग्रह. या ग्रहातील एक ग्रह म्हणजे आपली पृथ्वी.

पृथ्वीसुद्धा स्फोट झाला तेव्हा एक तप्त वायुचा गोळा होती. पृथ्वीही सूर्याभोवती फिरू लागली. त्याचवेळी ती स्वत:भोवती फिरू लागली. तिला सुरुवातीला एक गती मिळाली होती. ती दोन प्रकारची होती. पृथ्वी सूर्याभोवती फिरत होती. सूर्याच्या गुरूत्वाकर्षण बळामुळे ती एका कक्षेत धावू लागली. त्याचवेळी ती स्वत:भोवती फिरू लागली. स्वत:भोवती ती फिरत असल्याने तिला गोलाकार प्राप्त झाला. स्वत:भोवती मिळालेली गती कायम ठेवण्यामध्ये पृथ्वीच्या पोटात फिरत असणारा लाव्हा महत्त्वाची भूमिका पार पाडतो, असे मानले जाते. त्या गोळ्यातील ऊर्जा बाहेर पडत राहिली. ऊर्जा बाहेर पडत असताना होत असणाऱ्या रासायनिक अभिक्रियेत विविध मूलद्रव्ये तयार होत राहिली. या रासायनिक मूलद्रव्यांच्या पुन्हा अभिक्रिया होऊन त्यातून विविध संयुगे बनत राहिली. पृथ्वीवर माहीत असलेल्या ११८ मूलद्रव्यातील ९२ मूलद्रव्ये स्थीर अवस्थेत कमी जास्त प्रमाणात तयार झाली तर अब्जावधी रासायनिक संयुगे बनली. या संयुगातील काही घन, काही द्रव आणि काही काही वायु अवस्थेत पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेत राहिली. घन संयुगांपासून पृथ्वीचा पृष्ठभाग जमिनीच्या रूपात अस्तित्वात आला. या पृष्ठभागाच्या खाली आतमध्ये द्रवावस्थेत आलेला विविध रसायनांचा गट फिरत राहिला. तो आजही फिरत आहे. काही भौतिक घटनामुळे हा पोटातील द्रवावस्थेतील लाव्हा घन पृष्ठभागाला आतून धडका देत असतो. पृथ्वीच्या घन पृष्ठभागाला सपाट न ठेवता चढ-उताराचा बनवण्यामध्ये या फिरणाऱ्या लाव्हाच्या धडकांचे योगदान मोठे आहे.

लाव्हा आतून फिरत असताना त्याची धडक जेव्हा कमकुवत आणि पातळ जमिनीचा पृष्ठभाग असलेल्या ठिकाणी बसते, तेव्हा पोटातील लाव्हा भूपृष्ठावर येऊन पसरतो. या धडका जेव्हा खूप मोठ्या असतात, तेव्हा त्यापासून उंच पर्वतरांगा, टेकड्या बनल्या. तसेच काही ठिकाणी खोल खड्डे बनले. पृथ्वीवर असणारा सर्वात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असणारा द्रव पदार्थ म्हणजे पाणी. द्रवाचा एक नियम आहे. द्रव पदार्थ नेहमी उताराच्या दिशेने वाहत राहतात. पाणीही असेच उताराच्या दिशेने धावत राहिले आणि खड्ड्यामध्ये साठत राहिले. त्यातून समुद्रांची निर्मिती झाली. समुद्रामध्ये प्रथम अमिबा हा एकपेशीय जीव अस्तित्वात आला. नेमका तो कसा जन्मला हे अजूनही न सुटलेले कोडे आहे. मात्र त्यानंतर जीवसृष्टी कशी अस्तित्वात आली याची डार्विनने केलेली मांडणी आजही प्रमाण मानली जाते. नोवेल यांनी होमोसेपियन्समधून मानवाची उत्क्रांती सविस्तर आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत मांडली आहे.

पण मानवाने आपल्या बुद्धिच्या वापरातून स्वत:चे जगणे सुखकर बनवत असताना इतरांचे जगणे दुस्वर करून ठेवले. याचे अनेक दुष्परिणाम आज पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टिला भोगावे लागत आहेत. यामध्ये सर्वात कळीचा घटक आहे तो म्हणजे पाणी. मागील एका लेखामध्ये पृथ्वीचा अक्ष १८० इंचानी सरकल्याचे संशोधकांनी शोधल्याचे लिहिले होते. संशोधकांनी हा अक्ष सरकण्याचे कारण भारत आणि उत्तर अमेरिकेतून कुपनलिकांच्या सहाय्याने करण्यात आलेला अमर्याद पाण्याचा उपसा हे सांगितले होते. ही गोष्ट लक्षात येण्यास पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ जावा लागला.

निसर्गात घडणारे बदल हे खूप सावकाश घडत असतात. त्याच्या संवेदना खूप कमी लोकांना लवकर जाणवतात. ते ज्यावेळी बोलतात, तेव्हा त्यांच्या बोलण्याकडे मान्यवर दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे ते बदल वाढत जातात. तसेच मानवाने एका गोष्टीत आणलेला असमतोल इतर अनेक गोष्टींमध्ये बदल आणत असतो. प्रत्येक कुपनलिकेतून उपसले जाणारे पाणी हे तसे पृथ्वीच्या एकूण वस्तुमानाच्या तुलनेने नगण्यच असते. मात्र कालौघामध्ये कुपनलिकातून उपसल्या गेलेल्या आणि पुनर्भरण न झालेल्या पाण्याचे वस्तुमान हे २१८० गिगाटन इतके आहे. याचा परिणाम अखेर पृथ्वीचा अक्ष बदलण्यापर्यंत गेला. अक्ष बदलल्यामुळे शीत, समशितोष्ण आणि उष्ण कटिबंधाच्या क्षेत्रामध्ये शेकडो किलोमीटरचा बदल झाला. या बदलामुळे तेथील जीवसृष्टी आणि जैवविविधतेवरही मोठा परिणाम झाला. मानवाला या परिणामाचे चटके वैयक्तिक पातळीवर जाणवत नाहीत कारण शोधलेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तो स्वत:भोवती सुखकारक वातावरणाची निर्मिती घेऊन तो सुखी राहण्याचा प्रयत्न करत असतो.

मात्र आज आणखी एक परिणाम संशोधकांच्या निदर्शनास आला आहे. पृथ्वीच्या पोटात असणारा लाव्हा, द्रव पदार्थ सातत्याने फिरत आहे. त्यामुळे पृथ्वीची स्वत्:भोवती फिरण्याची गती कायम आहे. ही आंतरिक ऊर्जा आहे. ती कमीकमी होत आहे, असे संशोधकांच्या लक्षात आले आहे. पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती प्रतितास १६०० किमी वेगाने फिरत आहे. स्वत:भोवती एक आवर्तन पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला २३ तास ५६ मिनिटे आणि ४.१ सेकंद लागतात. यामुळे पृथ्वीच्या एका भागात दिवस असतो, तेव्हा दुसऱ्या भागात रात्र असते. विषुववृत्त प्रमाण मानले तर हा कालावधी बारा, बारा तासाचा असतो. मात्र पृथ्वीचे अंतरंग थंड होत असल्याने पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग कमी होत आहे. असेच होत राहिले तर त्याचे भविष्यात होणारे परिणाम अत्यंत भीषण असणार आहेत. पृथ्वीचा वेग कमी झाला तर रात्र छोटी होईल असा अंदाज काहीजन बांधत आहेत. मात्र एकूण दिवसाचा कालावधी वाढत जाईल. काही ग्रहावर सहा, सहा महिने सूर्याचे दर्शन होत नाही. तसेच दिवसाचा कालावधीही दिर्घ असतो. तशीच परिस्थिती पृथ्वीवर दिसेल. मात्र हे सर्व आपण अनुभवू शकणार नाही, कारण यासाठी कित्येक कोटी वर्षे लागतील.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading