February 29, 2024
Aadtas Hanumant Chandgude Poetry collection book review
Home » आडतास…. लोकलयींचा वारसा जपणारा कवितासंग्रह..!
मुक्त संवाद

आडतास…. लोकलयींचा वारसा जपणारा कवितासंग्रह..!

जी कविता जात्याच्या दळणातून, लोकगीतांच्या वळणातून, आणि माती घामाच्या मळणातून बाहेर येते, तिची अनुभूती घ्यायला माणूस सातत्याने निसर्गाच्या कुशीतच असावा लागतो

किरणकुमार मडावी
गझलकार
मोहदा, ता.केळापूर, जि.
यवतमाळ.

तसे पाहिले तर माणसाचे जगणेच सुख, दुखांच्या, वेदना, संवेदनांच्या एका क्रमवार लयीत असते. उन्हामागून सावली यावी, सावलीमागून उन्ह यावे त्याप्रमाणेच माणसाच्या आयुष्यात अमावश्या पौर्णिमेच्या पाठशिवणीचा खेळ सतत चालू राहतो. आणि त्यात माणूस हाडापिंडाचा शेतकरी असेल आणि वरून कवी मनाची हिरवी फांदी जपणारा असेल तर मग ही जगण्यातल्या लयीची तिव्रता त्याला अधिक जवळची असते. कवी हनुमंत चांदगुडे हे कवित्वाच्या नात्याने मातीच्या, निसर्गाच्या सृजनाचे लालित्य जपणारे काव्य प्रतिनिधी आहेत हे त्यांचा काव्यसंग्रह आडतास वाचतांना प्रकर्षाने जाणवते.

एका विशिष्ट भुमिकेतून कविता येणे ही वेगळी बाब, पण निसर्गाच्या बोलीची, मातीच्या खोलीची कविता लिहिली जाणे म्हणजे, जो मूक संवाद इथली पाने, फुले, झाडे, वेली, दऱ्या खोऱ्यात करतात आणि माणसांच्या जाणिवेला सतत साद घालत राहतात त्या हाकेला “ओ” देणे होय.

शेतीची मशागत झाल्यानंतर पेरणीसाठी शेत तयार होते तेव्हा शेताच्या चारही बाजूने बांधाच्या अगदी काठाने आडतास मारुन पुर्णविराम दिला जातो. तसेच जवळपास बारा तेरा प्रकारच्या लोकलयीतील गीत, कवनाची मशागत करून सकस पिकांची बीजे रसिकांच्या काळजाच्या मातीत रोवण्यासाठी कवीने “आडतास” घेतलाय.

एक एक कविता जणू आशयाने टंच भरलेल्या ज्वारीच्या कणसासारखी आहे. यातील कोणत्याही कवितेचे कणीस उचला कोरड्या दुधाळ हुरड्याचा आनंद आपल्या जिभेवर रेंगाळावा तसेच, कोणतीही कविता आपल्या अंगभूत लयीने ओठांवर गुणगुणणे सोडून जाण्यात यशस्वी होतांना दिसेल.

आजच्या सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे अनेक काव्यप्रकार विकसीत झाले, त्याचे तंत्र मंत्र लिहणाऱ्यांना सहज अभ्यासता येतात, पण जी कविता जात्याच्या दळणातून, लोकगीतांच्या वळणातून, आणि माती घामाच्या मळणातून बाहेर येते, तिची अनुभूती घ्यायला माणूस सातत्याने निसर्गाच्या कुशीतच असावा लागतो, कविता ही प्रतिभावंताच्या पायातील वेदनेची चाळ आहे आणि त्याच्या कळा मातीशी नाळ जुळून असलेल्या डोंगरदऱ्यातील बाळालाच कळतात. आडतास वाचून याची खात्री पटते.

या संग्रहात लावणी आहे तशीच त्यातली शिघ्र कवितेचा कस लावणारी जुगलबंदी तथा सवाल जवाब ही आहे. ओवी, अभंगाची पेरणी आहे तशीच हादगा, सुंबरान, गोंधळगिताची साजुणी ही आहे. कोणत्याही एकाच कवितेतील प्रतिमा, प्रतिके, उपमा उलगडून पाहात बसण्यापेक्षा आपण आपल्या लहाणपणी गाव खेड्यात जो लोकगितांचा गोड वसा, मग तो जात्यावरील असो, अंगणी येणा-या वासुदेवाचा असो, चाबूक कडाडणा-या पोतराजाचा असो, शेतात काम करतांनाचा असो किंवा ग्रामीण सण, समारंभ उत्सवाचा असो तोच धागा पकडून वाचक रसिकांनी हा कवितासंग्रह अनुभवण्यास घ्यावा, आपण आपल्या मातीच्या नाळेपर्यंत आणि कवीच्या काळजापर्यंत नक्कीच पोहोचू. हा ठाम विश्वास मला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मी हनुमंतच्या कविता वाचत आलो आहे. सह्याद्री देवराईसाठी ‘झाड नामाची समाधी’ या त्याने लिहीलेल्या कवितेचे गीतसुध्दा मी रेकॉर्ड केले आहे. या पुस्तकातील बहुतेक कविता लोकलय घेऊन आलेल्या आहेत. वेगवेगळ्या लयीतील आशयसमृद्ध कविता या संग्रहात आहेत. याच संग्रहातील काही कविता मी माझ्या आवाजात देखील रेकॉर्ड केल्या आहेत. विशेषतः
निसर्गातील प्रतिमांमधून हनुमंतची कविता जे काही बोलते ते अप्रतिम असते. कविता व गीतलेखन दोन्ही गोष्टी तेवढ्याच ताकदीने लिहिणारा हा कवी आपल्या कवितांमधून ग्रामीण बोलीभाषेतील अनेक शब्दांना कवितेत बेमालूमपणे गुंफत जातो. आशय व लय हातात हात घेऊन एकसाथ येत
असल्याने आशयघन शब्दकळा गुणगुणत रहावी वाटते. हनुमंतच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश असल्याने त्याचे नाव व कविता आपल्यासाठी नवीन नाही. ‘आडतास’ हा कवितासंग्रह वेगळ्या धाटणीचा आहे. प्रत्येक कवितेला स्वतंत्र लय असल्याने वाचताना ठेका धरायला लावते.

– सयाजी शिंदे
सुप्रसिद्ध अभिनेते

पुस्तकाचे नाव – आडतास
लेखक – हनुमंत चांदगुडे
प्रकाशन – परिस पब्लिकेशन, पुणे
किंमत – २०० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 9130552551

Related posts

भोवतालाच्या अंधारगर्भातून उगवून येणारे ‘मातीविश्व’

नाही हरायचे…

कातकरी मुलांच्या भाषेत शिकताना, शिकविताना…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More