July 27, 2024
Book review of Kirankumar Dongardive by Balasaheb Labde
Home » काव्यप्रदेशातील स्त्री मराठी समीक्षेच्या प्रांतातील दखलपात्र समीक्षा लेखन
मुक्त संवाद

काव्यप्रदेशातील स्त्री मराठी समीक्षेच्या प्रांतातील दखलपात्र समीक्षा लेखन

“काव्यप्रदेशातील स्त्री” हा किरणकुमार डोंगरदिवे यांचा समीक्षाग्रंथ धुळे येथील अथर्व प्रकाशनने २०२२ मध्ये प्रकाशित केलेला आहे. हा ग्रंथ ५०६ पृष्ठांचा आहे. यात सह्यात्तर कवी-कवयित्रीचा समावेश आहे. याबद्दल…

बाळासाहेब लबडे
पालघर ता जि पालघर, मोबा 9145473378

स्त्रियांविषयी मानवी जीवनात नेहमीच ऋतज्ञतेची भावना राहिलेली आहे. संसार रथाचे एक चाक म्हणून तिचे स्थान अढळ आहे. आदिम काळापासून तर आज पर्यंत तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा कसा बदलत गेला याचा आढावा काव्याच्या माध्यमातून मराठी कवितेच्या संदर्भात त्यांनी घेतला आहे. प्रत्येक काळात स्त्रियांविषयीची भूमिका विविध नाते संबंधातून कशा बदलत गेली याचेही विवेचन या ग्रंथातून येते. तिची विविध रूपे किती शाश्वत आहेत याचा आलेख त्यांनी मांडला आहे. तिची सृजनशिलता, प्रेम, माया, वात्सल्य, त्याग, करूणा, दया, क्षमा, निर्णयक्षमता, रतिभाव वगैरे सगळ्या जाणीवांची चर्चा एकत्रित करणारा हा एकमेव समीक्षाग्रंथ आहे.

स्त्रीजीवनाच्या समस्या काळानुसार बदलत आलेल्या आहेत त्यामुळे पुरूषांनी या समस्या कशा जाणून घेतल्या, त्या संवेदनशीलपणे कशा मांडल्या ,हे या ग्रंथाच्या माध्यमातून जाणून घेता येते. प्रारंभी मुक्त असलेली स्त्री ते आजची स्त्री हा कालपटाचा मोठा आलेख यात आहे. जवळजवळ दोनशे वर्षातील स्त्री आपणास यातून समजते.

आधुनिक मराठी कवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांच्या काव्यसमीक्षेने काव्यप्रदेशातील स्त्री या समीक्षाग्रंथाची सुरूवात होते आहे. अनेक नवनवीन कवितेचे प्रवाह केशवसुतांनी मराठी कवितेमध्ये आणले त्यापैकी महत्वपुर्ण प्रदेश म्हणजे स्त्रीजाणीवांचा होय.
,”झपुर्झा हरवून जाण्याची अवस्था प्राप्त करणारा हा शब्द कवींनी स्त्रियांच्या खेळांमधून मिळवला आहे असे लक्षात येते . जरी झपूर्झा या कवितेमध्ये थोर महात्म्यांची एकात्म भावना अधोरेखित केली तरी त्या शब्दाची उत्पत्ती मुलींच्या खेळामधून झालेली असणे या मधून कवीची स्त्री जीवनाची निरीक्षणे आणि स्त्री जाणिवांचा समाजावर पडणारा प्रभाव व्यक्त करणारी दृष्टी लक्षात येते .”केशवसुतांची स्त्रीजाणिव लोकसाहित्याशी कशी जोडली गेली आहे हे डोंगरदिवे यांनी दाखवून दिले आहे. केशवसुतांच्या जाणीवांचे वेगळेपण जसे आशयात आहे तसेच अभिव्यक्तीत आहे. त्यांच्या काव्यविचारांवर वर्डस्वर्थ, शेली, किट्स यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता, असे मानले जाते पण त्यांची आविष्कार शैली स्वतंत्र होती.

इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार सुनीत या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी मोजक्याच एकशेपस्तीस कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. हे त्यांचे वेगळेपण प्रभावीपणे समीक्षकाने मांडले आहे. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी हाताळले आहेत. या विषयातील स्त्रीजीवनाचे विविध पैलू केशवसुत रेखाटतात. माता ,भगिणी, प्रेयसी, पत्नी, अशा विविध नात्यातील स्त्री त्यांच्या कवितेत भेटते.

या स्त्रीविषयी डोंगरदिवे म्हणतात,” केशवसुतांच्या कवितेमधील स्त्री ही तत्कालीन समाज व्यवस्थेचे प्रतिबिंब व्यक्त करणारी होती. खरे म्हणजे तत्कालिन स्त्रियांच्या स्थितीत चूल आणि मूल यापेक्षा वेगळे काही नव्हते. मात्र तरीही स्त्रियांमधील सचोटी, संसार दक्षता, कर्तव्यनिष्ठा, आपुलकी तसेच स्नेहभावना या सर्वांचा परिपाक केशवसुतांच्या कवितेमध्ये आढळून येतो. त्या काळातील कविता म्हणजे सहज आणि स्वाभाविक भावनांना शब्द रूपामध्ये शब्दांकित करून आपल्या मनातील भावना इतरांना सांगणे असा काहीसा प्रकार होता. केशवसुतांच्या काही कविता म्हणजे एक प्रकारचा संवाद आहे. स्त्री विषयक लेखन करताना प्रत्येक साहित्यिक आई या नात्याजवळ हळवा होतो, केशवसुतांनी सुद्धा आईवर, आईकरिता शोक ही कविता लिहिली आहे “

काळाच्यापुढे जाऊन केशवसुतांनी शृंगार रसात कविता केली. शृंगार रस निर्मिती करताना स्त्री आणि पुरुष यांचा मर्यादाशील प्रणय आपल्या कवितेमधून दिला आहे, भडक नाही. या कवितेबद्दल डोंगरदिवे केशवसुतांचे स्थान अधोरेखन करताना म्हणतात,”या कवितेतील अनेक शब्दांनी त्या काळात प्रचंड अस्वस्थता निर्माण केली कारण त्या काळामध्ये इतके शृंगारिक लेखन क्वचितच होत असेल. केशवसुतांनी मात्र संपूर्ण मराठी कवितेचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला .”

“आगबोटीच्या काठाशी समुद्राच्या शोभेकडे पहात असलेल्या उभ्या तरुणीस” हीसुद्धा केशवसुतांची एकच स्त्रीसुलभ वेगळी रचना आहे. “मदन आणि मदनिका” या कवितेमध्ये केशवसुतांनी रुपवती स्त्री आपल्या नेत्रकटाक्ष आणि करपल्लवी त्याचप्रमाणे स्त्रीसुलभ व्यवहाराने मदनालाही जिंकून घेते असे सांगतात ,केशवसुतांच्या कवितेचा आशय आगळा वेगळा दिसून येतो आपण त्यामुळे विचारप्रवृत्त होतो ही जमेची बाजू आहे.

महात्मा फुले यांच्या ‘अभंग अखंड आणि पोवाड्यातील स्त्री ‘डोंगरदीवे यांनी सत्यशोधकाच्या नजरेतून रेखाटली आहे. पुराणे अध्यात्म यांनी दिलेले स्त्रीला उपेक्षित स्थान दिले त्यामुळे सनातनी मनोवृत्तीवर प्रहार करण्यासाठी विज्ञानवादी सत्यशोधकी विचारांचा आग्रह फुले यांनी धरला. इतिहासाचा नव्याने अर्थ व संशोधन त्यांनी केले. महात्मा फुले याच्या या पैलूंवर डोंगरदिवे यांनी चांगला प्रकाश टाकला आहे.

काव्यप्रदेशातील स्त्रीच्या शोधात फिरताना त्यांनी संत जनाबाईच्या अभंग आणि ओवी काव्यातील स्त्री, सावित्रीबाई फुले ह्यांच्या काव्यातील स्त्री . रेव्हरंड ना . वा . टिळक ह्यांच्या कवितेतील स्त्री, लक्ष्मीबाई टिळक ह्यांच्या काव्यातील स्त्री, नारायण मुरलीधर गुप्ते ( कवी बी ) ह्यांच्या काव्यातील स्त्री, कवी विनायक ह्यांच्या कवितेमधील स्त्री , राजकवी भा . रा . तांबे ह्यांच्या कवितेतील स्त्री, बहिणाबाई चौधरी ह्यांच्या कवितेतील स्त्री, वि . दा . सावरकर ह्यांच्या काव्यातील स्त्री ,गोविंदाग्रज ह्यांच्या काव्यातील स्त्री, बालकवींच्या कवितेतील स्त्री , माधव ज्युलियन ह्यांच्या कवितेतील स्त्री , वासुदेव गोविंद मायदेव, ह्यांच्या कवितेतील स्त्री ,आचार्य प्र . के . अत्रे ह्यांच्या गीतकाव्यातील स्त्री, राजकवी यशवंत ह्यांच्या कवितेतील स्त्री , साने गुरुजी ह्यांच्या काव्यातील स्त्री , भाऊसाहेब पाटणकर ह्यांच्या रचनेतील स्त्री, राष्ट्रसंत तुकडोजी ह्यांच्या ग्रामोन्नतीचा केंद्रबिंदू स्त्री, ग . ल . ठोकळ ह्यांच्या कवितेतील स्त्री, ना . घ . देशपांडे ह्यांच्या कवितेतील स्त्री, बा . सी . मर्ढेकरांच्या काव्यप्रदेशातील स्त्री, असा खुप मोठा धांडोळा घेतला आहे. त्यासाठी प्रचंड वाचन करून चिकाटीने काम करावे लागले आहे.

पु . शि . रेगे ह्यांच्या कवितेतील स्त्री , बा . भ . बोरकर ह्यांच्या कवितेतील स्त्री , राजा बढे ह्यांच्या कवितेतील स्त्री , कुसुमाग्रजांच्या कवितेतील स्त्री , पद्मा गोळे ह्यांच्या कवितेमधील स्त्री ,इंदिरा संत ह्यांच्या कवितेमधील स्त्री, शाहीर अमर शेख ह्यांच्या काव्यातील स्त्री, विंदा करंदीकर ह्यांच्या कवितेमधील स्त्री ,ग . दि . माडगूळकर ह्यांच्या काव्यातील स्त्री , अण्णा भाऊ साठे ह्यांच्या लावणी आणि पोवाडे यातील स्त्री ,शरच्चंद्र मुक्तिबोध ह्यांच्या कवितेतील स्त्री , वसंत बापट ह्यांच्या कवितेतील स्त्री , वामनदादा कर्डक ह्यांच्या गीत काव्यामधील स्त्री , सदानंद रेगे ह्यांच्या कवितेतील स्त्री , शांताबाई शेळके ह्यांच्या गीतकाव्यामधील स्त्री ,यावर निष्कर्षात्मक भाष्य त्यांनी केले आहे.

नारायण सुर्वे यांच्या कवितेत एक परिवर्तनाचा विचार आहे. त्यांच्याकडे स्रियांकडे पाहण्याची दृष्टी आहे. ती निकोप आणि नितळ आहे .सहज अनुभव व्यक्त करण्याची संवादी शैली आहे. आतुन आलेली भाषा आहे. जगण्याकडे करूणेने पाहणारी जमिनीवरचीदृष्टी आहे. हे सारं स्त्रीच्या गुणांमुळे आहे हे त्यांनी सांगीतलं आहे. जो जीवनानुभव भोगलेला आहे तोच कवितेत आहे. त्यामुळे त्यांची कविता काळजाला भिडते. तिच्यात कोणतेही उसनेपण दिसून येत नाही. जगणं जसं आहे तसं त्यांनी वेदनांसहित स्वीकारलं आहे. यातील बायका वेगवेगळ्या नात्यात भेटतात परंतु त्यांचं पिचलेपण आणि महानगरीय जाणीव आपल्या मनात घर करून राहते.दारिद्र्य, उपेक्षा, मानहानी, वाट्याला आलेल्या ह्या बायका शोषिक आहेत हे डोंगरदिवे यांनी अधोरेखित केले आहे. एकंदरीत ठसठसीतपणे सुर्व्यांची स्त्री आपल्या मनात ठसते.

मंगेश पाडगावकर ह्यांच्या कवितेमधील स्त्री, अनिल ह्यांच्या कवितेतील स्त्री, आरती प्रभू ह्यांच्या कवितेमधील स्त्री, मधुकर जोशी ह्यांच्या रचनेतील स्त्री, सुरेश भटांच्या रचनेतील स्त्री, दया पवार ह्यांच्या कवितेतील स्त्री, श्रीधर शनवारे ह्यांच्या कवितेतील स्त्री, ग्रेस ह्यांच्या कवितेतील महानायिका, ग्रेस ह्यांच्या कवितेतील : संसारनायिका, भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कवितेतील स्त्री, ना . धों . महानोर ह्यांच्या कवितेतील स्त्री ,यशवंत मनोहर ह्यांच्या कवितेतील स्त्री, विठ्ठल वाघ ह्यांच्या कवितेतील स्त्री , इलाही जमादार ह्यांच्या रचनेमधील स्त्री , फ . म . शहाजिंदे ह्यांच्या कवितेतील स्त्री,शंकर बडे ह्यांच्या कवितेतील स्त्री सुधाकर गायधनी ,ह्यांच्या कवितेतील स्त्री .ही वेगळी कशी आहे ते त्यांनी मांडले आहे.

विठ्ठल वाघ यांची कविता स्त्री चित्रणामुळे वेगळी ठरते .ग्रामीण कवितेत तिने आपले वेगळेपण जपले आहे .तिच्यातील ग्रामीण संवेदना भावपुर्ण रितीने व्यक्त होतात. ग्रामीण स्त्रीच्या शोषिकतेची ही गाथा आहे. जी संतपरंपरेला घेऊन व्यक्त होते आहे. सगळ्या नव्या जगापासून दूर असलेली पण नवर्याच्या सुखात सुख मानणारी परिस्थितीला सामोरे जाऊन जगण्याला नवा अर्थ देणारी स्त्री त्यांच्या कविताममधुन भेटते. या वेगळ्या, पिचलेल्या, सोललेल्या, भोगलेल्या, नशिबावर विसंबलेल्या, तर निसर्गाने नाडलेल्या, स्त्रीची वेदना विठ्ठल वाघ वेगळ्या बोलीभाषेतून ,प्रतिमा, प्रतिक, रूपकातून मांडतात.अनेक पातळ्यांवर जाऊन स्त्रीपुरूष समानतेचा विचार ते मांडतात.

शरश्चंद्र मुक्तिबोधांची नवी जाणीव डोंगरदिवे यांनी मांडली. ती कविता नव्या आयामाची कविता आहे हे अधोरेखित केले आहे. मुक्तीबोध अधिक व्यापक व अधिक नितळ पातळीवरून सर्व स्तरातील स्त्रियांकडे पाहतात. नव्या प्रतिमा नव्या मांडणीतून ते स्त्रीयांकडे पाहतात त्यांच्या आशयात प्रगल्भता आहे. त्यामुळे त्यांची कविता अधिक गुणवत्ताप्रधान आहे.

विंदाच्या कवितेतील स्त्रीचे वेगळेपण डोंगरदीवे यांनी अधोरेखित केले आहे. त्यांच्या कवितेतील बकी वेश्या आहे. ती प्रवाहापासून दूर असलेली वंचित स्त्री आहे. तर दुसऱ्या कवितांमधुन स्त्री ही वेगवेगळ्या रूपात भेटत राहते. ती शोषिक आहे त्याच त्याच वर्तुळात जगत राहणारी, राबणारी ,नाडली गेलेली, पिडली गेलेली, आहे पारंपरिक आहे. ती आपले सामान्यपण मान्य करणारी आहे. लैगिक इच्छांमध्ये सामर्थ्य असणारी आहे. या पैलूवर समीक्षक डोंगरदिवे यांनी प्रकाश टाकला आहे.

अरुण कोलटकर यांच्या कवितेमधील स्त्री ही वेगळी आहे. पुरोभुमीकरणाच्या माध्यमातून त्यांच्या कवितेचे आकलन करता येते. अरुण कोलटकर हे मराठीतील अत्यंत महत्त्वाचे कवी असून त्यांनी नाविण्यपुर्ण कविता लिहीली आहे . त्यांच्या कविता वैश्विक पातळीवर स्त्रियांच्या वेदनेचे आलेख मांडतात . दुःखाची ,शोषिकतेची, कथात्म कविता त्यांची आहे . स्त्रियांचे दुःख नाहीसे होऊन स्त्रियांच्या अस्तित्वाला नव्या जगाच्या जाणिवा आणि समृद्धतेने समोर जाण्यासाठी मागणेही कवीने मागितलेले आहे .हे त्यांचे स्त्री पसायदान आहे ही नोंद डोंगरदीवे यांनी केली आहे. पिचलेल्या स्त्री जीवनाचा ,शोषिकतेचा ,स्त्रियांच्या एकंदर जीवन – जाणिवांचा , त्यांच्या दुःखाचा विचार कवीने मांडला आहे . स्त्रियांच्या अश्रूंच्या एकेक थेंबाची किंमत या विश्वाच्या निर्मिती सामर्थ्यांच्या ठिकाणी विरघळली आहे हे तिचे वेगळेपण समीक्षक अधोरेखित करतो. या तिच्या दुःखाचे असतेपण मानवी अस्तित्वाच्या ठिकाणी अंशा – वंशाने रुजलेले आहे .वामांगी सारख्या विलक्षण कवितेमधून अरुण कोलटकर यांच्या कवितेमध्ये आढळणारी सर्वसामान्य स्त्री रुक्मिणीच्या रूपात भेटली आणि त्या एकाच कवितेमधून भारतीय समाजव्यवस्थेतील स्त्रियांचे खरे स्वरूप , त्यांची मन:स्थिती , पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्यांना मानाचे स्थान देऊ केलेली अवहेलना , स्त्रियांची स्वतःची स्वतःच्या जीवनाबद्दलची उदासीनता इत्यादि अनेक गोष्टी एकाच वेळी अरुण कोलटकर यांच्या कवितेमधून व्यक्त होतात याची खात्री पटते .नेमके पणाने कोलटकरांच्या कवितेचे बलस्थान डोंगरदीवे यांनी मांडले आहे.

नामदेव ढसाळ ह्यांच्या कवितेतील स्त्री , नारायण कुलकर्णी कवठेकर ह्यांच्या कवितेमधील स्त्री , अनुराधा पाटील ह्यांच्या काव्यातील स्त्री , लोकनाथ यशवंत ह्यांच्या कवितेतील स्त्री,डॉ . सदानंद देशमुख ह्यांच्या कवितेतील स्त्री , श्रीकृष्ण राऊत ह्यांच्या कवितेतील स्त्री , विनायक तुमराम ह्यांच्या कवितेतील स्त्री , भुजंग मेश्राम ह्यांच्या कवितेमधील स्त्री , प्रदिप निफाडकर ह्यांच्या कवितेतील स्त्री , हिराबाई बनसोडे ह्यांच्या कवितेतील स्त्री ,अशोक कोतवाल ह्यांच्या कवितेतील स्त्री , डॉ . प्रतिमा इंगोले ह्यांच्या कवितेतील स्त्री, आशा पांडे ह्यांच्या काव्यातील स्त्री , शशिकांत हिंगोणेकर ह्यांच्या कवितेतील स्त्री , विष्णू सोळंके ह्यांच्या कवितेतील स्त्री , बाळासाहेब लबडे ह्यांच्या कवितेतील स्त्री , सुनीता झाडे ह्यांच्या कवितेतील स्त्री आजपर्यंत लिहिणार्या मराठीतील महत्वाच्या कवींच्या कवितांतील स्त्रीजीवनविषयक जाणीवेची समीक्षा त्यांनी केली आहे.

सौमित्र यांच्या कवितांचे रसग्रहन वाचले. त्यांच्या कवितेतील स्त्रीपुरूष संबध चांगले आकलन करून मांडले आहेत. कवीच्या मनातील समंजस भावनेचा प्रत्यय यातून येतो.कवीचे पिचलेपण आपल्या मनात ठसठसीतपणे उमटते हे या आकलनाचे वेगळेपण आहे. एक नितळ, निर्मळ ,अनुभव यातून व्यक्त केला आहे. त्याचा धागा समीक्षकाने नेमकेपणाने पकडला आहे. त्यामुळे गारव्यातील कवीपेक्षा स्त्रीपुरूष भावना व्यक्त करणारे सौमित्र वेगळे वाटतात.

“काव्यप्रदेशातील स्त्री”या समीक्षाग्रंथातील कवींच्या काव्यातील स्त्रीजीवनाचा शोध घेताना समीक्षक किरण डोंगरदिवे यांनी जी समीक्षा पद्धती योजलेली आहे ती महत्वपुर्ण आहे.आस्वादक आणि शास्त्रीय अशा दोन्ही पद्धतींचा वापर त्यांनी केला आहे. यातील स्त्रीप्रधान व स्त्रीवादी दृष्टीकोन अचूक मांडलेला आहे. जशी कविता तशी समीक्षा. यात स्त्रीवादी समीक्षापद्धती,समाजशास्त्रीय समीक्षा पद्धती ,चरित्रात्मक समीक्षा पद्धती,रूपवादी समीक्षा पद्धती शैलीवादी समिक्षा पद्धती, मनोविश्लेषणात्मक समीक्षा पद्धतीचा उपयोग केलेला दिसतो. या सर्व कवींचे समग्र कवितासंग्रह स्त्रीजाणीवांचे आहेत असे नाही .त्याकरिता प्रत्येक कवींच्या समग्र काव्यसंग्रहातील निवडक स्त्रीजीवनविषयक कविता घेऊन त्यांची समीक्षा केली आहे. समग्र मराठी काव्यातील स्त्री जीवनाचा हा एक्सरे आहे असे म्हणायला हरकत नाही.

पुस्तकाचे नाव : काव्य प्रदेशातील स्त्री
समीक्षक : किरण डोंगरदिवे
प्रकाशक: अथर्व प्रकाशन धुळे
मुखपृष्ठ :अरविंद शेलार चाळीसगाव
पृष्ठ्ये :५०६
किंमत:895 रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पिके, झाडांशी मैत्री केल्यास त्यांचीही भाषा समजते

अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल

बायो-इथेनॉल उत्पादनातून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न थेट शेतकऱ्यांना

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading