April 16, 2024
Abhijat Marathi Bhasha article by Sanjay Sonavani
Home » मराठी भाषा अभिजातच !
विशेष संपादकीय

मराठी भाषा अभिजातच !

खरे तर मराठी अथवा महाराष्ट्री प्राकृताच्या उगमाबद्दल अनेक विद्वानांनी चर्चा केलेली आहे. जे. ब्लॉख यांनी १९१४ साली लिहिलेल्या “फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेज’ या पुस्तकात फार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. या संदर्भात थोडक्यात माहितीवजा लेख…

संजय सोनवणी

जे. ब्लॉख यांनी नोंदवलेली निरीक्षणे…

  • ऋग्वेदाच्या प्राचीन संपादकांनी अन्य बोलीभाषांना आत्मसात करत अथवा त्यापासून उधारी करत ऋग्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा घडवली आहे. (पृ.२)
  • मराठी ही सरळ महाराष्ट्री प्राकृताशी नाते सांगते. अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव नगण्य आहे. मराठीचे ध्वनिशास्त्र गुंतागुंतीचे व अन्य आर्यभाषांपेक्षा स्वतंत्र आहे. (पृ ४५),
  • अनेक प्राकृत घाट संस्कृतात घुसले आहेत. संस्कृत ही स्वतंत्र भाषा नसून मिश्र भाषा आहे. (पृ. ४८) हेमचंद्र ज्यांना अपभ्रंश भाषा म्हणतो त्या भाषांचा मराठीशी काहीही संबंध नाही तर मराठीचा संबंध थेट प्राचीन प्राकृताशीच आहे. (पृ. ३०-३१)
  • प्राकृत म्हणजेच महाराष्ट्री प्राकृत. शौरसेनी, मागधी, अर्धमागधी वगैरे अन्य प्राकृत भाषा दुय्यम आहेत. मराठीचा पाया स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन बोलींचा आहे जो अन्य भाषांत समांतरपणे आढळत नाही. (पृ.३२)
  • सातवाहन काळात स्थानिक प्राकृत राजभाषा व साहित्यभाषा बनली व तिला वैभव आले. भारतातील कोणतीही भाषा कोणावर लादली गेल्याचे भाषाशास्त्रीय उदाहरण मिळत नाही. (पृ. ४४).

ब्लॉख यांनी दिलेली अत्यंत थोडकी अशी ही उदाहरणे येथे घेतली आहेत, पण ती मराठी भाषेच्या स्वतंत्र वास्तवावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत. आणि याला एकशे दहा वर्ष झाली आहेत पण एकाही अभिजात मराठीचा आक्रोश करणाऱ्या विद्वानाने अथवा संस्कृत हीच मुळची भाषा असा अशास्त्रीय आग्रह धारणा-या विद्वानाने दुर्लक्षित ठेवले.

पण हे जाऊद्या. खुद्द ऋग्वेदात अनेक प्राकृत प्रयोग आणि शब्द जसेच्या तसे आलेले आहेत त्याचे काय करायचे? . किंबहुना प्राकृत आणि अवेस्तन शब्दांचेच सुलभ ध्वनीबदल करीत वैदिक संस्कृत व नंतरचे संस्कृत बनले आहे. अहुरऐवजी असुर, मिथ्रऐवजी मित्र अशी अवेस्तन शब्दांचे ध्वनीबदल केल्याची असंख्य उदाहरणे देता येतील. इंद्रऐवजी इंद, वृंद ऐवजी वुंद असे मूळचे प्राकृत प्रयोग ऋग्वेदात जसेच्या तसेच राहिलेले आहेत. व्याकरणाचा पायाही प्राकृतच असल्याचे अनेक उदाहरणांवरून आढळून येते. उदा. देवास:, सत्यास: ऐवजी देवा:, सत्या: इ. खरे तर ऋग्वेदाची भाषा अवेस्तन (प्राचीन पर्शियन) आणि भारतातील स्थानिक प्राकृत यांचे मिश्रण आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील ६% शब्द द्रविड व मुंड भाषेतून वैदिक भाषेत उधार घेतलेले आहेत. संस्कृत तर प्राकृत शब्द आणि भाषेवरच संस्कार करत बनली. त्यामुळेच संस्क्रुत शब्दसंग्रह अत्यंत मर्यादित राहिलेला आहे.

“भाषेचं मूळ’ या माझ्या पुस्तकात मी संस्कृत भाषा इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कशी क्रमश: विकसित होत गेली हे ग्रांथिक, शिलालेखीय व नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्या दृष्टीने संस्कृत हीच नंतरची भाषा ठरत असून ती प्राचीन प्राकृत भाषांवर संस्कार करत ही नवी भाषा बनवलेली आहे. परंतु ती नंतरची भाषा असूनही तिला अभिजात दर्जा आणि ज्यापासून ती बनली त्या महाराष्ट्री प्राकृताला व त्या भाषेची थेट वंशज असलेल्या मराठीला मात्र अभिजात दर्जा नाकारणे हे कर्मदरिद्रीपणाचेच नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनही नसल्याचे निदर्शक आहे.

त्यामुळे संस्कृत भाषा अपभ्रंश स्वरूपात येऊन प्राकृत (पाअड) भाषा बनल्या हे इंडो-युरोपीय भाषा सिद्धांत मांडणाऱ्या या पाश्चात्त्य व एतद्देशीय संस्कृतनिष्ठ विद्वानांचे अभिनिवेशी मत टिकत नाही. उलट मूळ प्राकृत शब्दांचेच उच्चारसुलभीकरण करीत संस्कृत विकसित होत गेली हे बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत ग्रंथ, शिलालेखीय ते नाण्यांवरील भाषेतून सिद्ध होते. महाराष्ट्री प्राकृतात हालाचा ‘गाथा सतसई’ हा अनमोल काव्यसंग्रह जसा उपलब्ध आहे तसेच ‘अंगविज्जा’ हा तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकणारा इसवी सनाच्या पहिल्या शतकातील गद्य ग्रंथही उपलब्ध आहे. या भाषेतील शब्द व व्याकरण पूर्णतया स्वतंत्र असून ते संस्कृताचे रूपांतरण नव्हे. समजा तसे असते तर या प्राकृत शब्दांआधीचा त्यांच्या मूळ संस्कृत स्वरूपाचा लिखित अथवा शिलालेखीय पुरावा अस्तित्वात असला असता. एवढेच नव्हे तर प्राकृत व्याकरणाचा संस्कुत अनुवाद करायची गरज भासली नसती.

अगदी वैदिक धर्माचे आश्रयदाते असलेल्या शुंग कालातील शिलालेखही स्वच्छ प्राकृतात आहेत. ‘गाथा सप्तशती’चे संपादक स. आ. जोगळेकरांनाही सातवाहनांनी केलेल्या यज्ञांचे वर्णन प्राकृतात कसे, हा प्रश्न पडला होता व त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो नमूदही केला. शुंगांच्याही अश्वमेध यज्ञाचे वर्णन प्राकृतात आहे. मुळात जी भाषाच अस्तित्वात नव्हती त्या संस्कृत भाषेत त्यांचे वर्णन कसे करणार? आणि मग संस्कृत शब्दांचे अपभ्रंश म्हणजे प्राकृत असा अर्थ पुराव्यांच्या अभावात कसा काढता येईल? संस्कृत भाषा व तिचे पाणिनीकृत व्याकरण गुप्तकाळात सिद्ध झाले. तेही इसवी सनाच्या तिसऱ्या शतकानंतर.

नंतर मात्र आधी द्वैभाषिक (आधी प्राकृत लेख व नंतर त्याचा संस्कृतमधील अनुवाद) व नंतर संस्कृत शिलालेख/ताम्रपटांचा विस्फोट झालेला दिसतो हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे. असंख्य प्राकृत ग्रंथांची भाषांतरे अथवा छाया याच काळात झाल्या. कारण आता संस्कृत भाषा जन्माला आलेली होती. या काळात रामायणाचं काय, पण महाभारत, गुणाढ्याची ‘बृहत्कथे’चेच काय पण “प्राकृतप्रकाश” या वररुचिकृत प्राकृत व्याकरणाचेही संस्कृत अनुवाद झाले. पुढे प्राकृत शिलालेखांची जागा संस्कृत शिलालेखांनी घेतली. लोकांना अचानक संस्कृत समजू लागली होती आणि आधी समजत नव्हती हा तर्क जे देतात ते भाषाशास्त्राचे प्राथमिक ज्ञानही ठेवत नाहीत
संस्कृत ही ग्रंथव्यवहाराची मुख्य भाषा बनली नाही. प्राकृतात समांतरपणे अवाढव्य ग्रंथनिर्मिती होतच राहिली, त्यामुळे संस्कृत प्रेमीसाठी प्राकृत व्याकरणाचाही अभ्यास गरजेचा बनला. म्हणून व्याकरणाचेही अनुवाद झाले.

महारठ्ठी प्राकृताचा कालौघातील विकास म्हणजे आजची मराठी. आपली भाषा स्वतंत्र होती आणि आहे. तिचा आत्माही महारठ्ठी आहे. तिला अभिजात भाषा दर्जा न देणे ही संस्कृतनिष्ठ वृथाभिमान्यांचे पाप आहे. एकही शब्द मुळचा संस्कृत नसता असे करणे अयोग्य आहे. मराठी भाषा स्वतंत्र असून तिला अभिजात मराठीचा सन्मान मिळणे प्रत्येक मराठीभाषकासाठी अत्यावश्यक बाब आहे.

Related posts

स्वतः बद्दलचे सत्य जाणण्यासाठीच सत्यवादाचे तप

राजेशाही अन् भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट

कहाणी वाक्प्रचारांची : मराठी माणसाची, त्याच्या इतिहास-संस्कृतीची ओळख देणारे पुस्तक

Leave a Comment