September 12, 2024
Importace of Meditation article by Rajendra Ghorpade
Home » साधना का करायची ?
विश्वाचे आर्त

साधना का करायची ?

दोन मिनिटे चहा देण्यास उशीर झाला तर घरात आरडाओरड सुरु होते. वेळेचे महत्त्व आहे की नाही असे शब्द साहजिकच तोंडातून बाहेर पडतात. इतक्या व्यस्त पिढीला साधना म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत ? इतका वेळ देऊन काहीच साध्य होत नसेल तर ती करायची कशासाठी ? या प्रश्नांची उत्तर मिळणे गरजेचे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

जंववरी अर्जुना । तो बोध भेटेना मना ।
तवंचि यया साधना । भजावें लागे ।। 149 ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा

ओवीचा अर्थ – अर्जुना, जोपर्यंत अंतःकरणात ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते.

साधना का करायची ? साधनेने आपणाला काय मिळते ? या प्रश्नांची उत्तरे नव्यापिढीला मिळाली तरच ते अध्यात्माकडे वळतील किंवा ते अध्यात्मावर विश्वास ठेवतील. अन्यथा हे सर्व म्हणजे वेळ फुकट घालवण्यातला प्रकार आहे असे समजून याकडे पाहणारही नाहीत. कारण सध्या विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की जग हे आता सेकंदावर चालू लागले आहे. पूर्वी रेल्वे किती तास उशाराने धावणार आहे हे सांगितले जायचे. त्यानंतर लोकल किती मिनिटाने उशीराने धावत आहे हे सांगीतले जाऊ लागले. आता मेट्रोचा दरवाजा किती सेकंद उघडा राहीले हे सांगितले जात आहे. म्हणजे तासावरून जग आता सेकंदावर धावू लागले आहे.

सेकंदावर कमाई मोजली जाऊ लागली आहे. वेबसाईट किती सेकंद पाहीली गेली किंवा जाहीरात किती सेकंदाची आहे यावर पैसे ठरवले जात आहेत. त्यावरच उत्पन्न मोजले जात आहे. म्हणजेच आता उत्पन्न सेकंदात मोजले जाऊ लागले आहे. इतका वेग जगाने पकडला आहे. या जमान्यातील नव्या पिढीला साधनेसाठी एक तास देणे काय पाच मिनिटे सुद्धा देणे कठीण वाटणार आहे. हे स्वाभाविक आहे. जग इतके वेगवान झाले आहे की अशावेळी पाच मिनिटांची फुरसतही मिळणे कठीण आहे.

प्रत्येक क्षण हा आता महत्त्वाचा झाला आहे. कार्यालयातही वेळेला महत्त्व आहे. आठ तासाच्या कामाचे मोजमाप केले जाऊ लागले आहे. अशा स्थितीत तासभर साधनेसाठी देणे म्हणजे फुकट वेळ घालवण्याचा प्रकार आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. कामावर जाताना किंवा परतताना वाहतूक कोंडी पाच – दहा मिनिटांची असली तरी त्यावर चर्चा होऊ लागली आहे. कारण घरात पोहोचण्यासही उशीर होता कामा नये. इतके वेळेला महत्त्व आले आहे. मग अशावेळी साधनेला पाच मिनिटे बसणे म्हणजे फुकट वेळ घालवण्यासारखे आहे, असे वाटणे स्वाभाविक आहे.

दोन मिनिटे चहा देण्यास उशीर झाला तर घरात आरडाओरड सुरु होते. वेळेचे महत्त्व आहे की नाही असे शब्द साहजिकच तोंडातून बाहेर पडतात. इतक्या व्यस्त पिढीला साधना म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत ? इतका वेळ देऊन काहीच साध्य होत नसेल तर ती करायची कशासाठी ? या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. तरच त्यांचा अध्यात्मावर विश्वास बसेल. तरच ते याकडे वळतील अन्यथा हे सर्व थोतांड आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतील.

साधनेसाठी दिलेल्या पाच मिनिटांनीही खूप काही मिळते. मनाला शांती मिळते. अंगातील राग शांत होतो. मन एका वेगळ्या वळणावर येते. सकारात्मक विचारांची पेरणी होते, विचारात झालेला हा बदल बोध येण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. साहजिकच यामुळे कामामध्ये उत्साह वाढतो. या अशा अनेक फायद्याच्या गोष्टी साध्य होत असल्याने साधनेकडे मन वळते. मन रमते. विशेष म्हणजे धकाधकीच्या जीवनात पाच मिनिटांच्या साधनेने सर्व थकवा दूर होऊन शांत झोप लागते. यासाठी साधनेची सवय लावून घ्यायला हवी. साधना यासाठी गरजेची आहे. भावीकाळात याचे महत्त्व अधिकच वाटणार आहे हे नव्या पिढीने विचारात घ्यायला हवे.

साधनेत होणाऱ्या ज्ञानाचा बोध त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. साधनेचा अनुभव येणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. जो पर्यंत त्या ज्ञानाचे महत्त्व पटणार नाही. अनुभुती येणार नाही तो पर्यंत हे सर्व थोतांड आहे असेच वाटणार. यासाठी साधना का करायची हे समजून घेणे गरजे आहे. साधनेची खटपट बोधापर्यंत आहे. एकदा बोध झाल्यानंतर पुन्हा पुन्हा बोध घेण्याची सवय लागते. या ज्ञानाच्या बोधातूनच मग आत्मज्ञानाची प्राप्ती होते. यासाठी या अंतःकरणात ज्ञानाचा बोध होणे महत्त्वाचे आहे तो पर्यंत साधना करत राहाणे गरजेचे आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भरली ढोबळी मिरची…

भाषा आणि साहित्याच्या समृद्धतेची ओळख करून देणारे पुस्तक

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर

1 comment

ramesh kulkarni March 22, 2022 at 3:15 AM

your thoughts and writings are guiding points in this mechanical world

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading