पणजी, 30 ऑक्टोबर 2023 – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)- राष्ट्रीय महासागर संस्था (NIO) येथील वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक आणि जैविक समुद्रविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश उत्तम गौंस यांची नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया (NASI) चे फेलो म्हणून निवड झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रातला हा एक महत्त्वाचा सन्मान मानला जातो. प्राध्यापक मेघनाद साहा यांच्या नेतृत्वाखाली नामवंत शास्त्रज्ञांच्या गटाने 1930 मध्ये स्थापन केलेली नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया ही भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात प्रतिष्ठेची एक वैज्ञानिक प्रशिक्षण संस्था आहे.
नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियाचे फेलो म्हणून डॉ. गौंस यांची झालेली निवड ही त्यांच्या उत्तर हिंद महासागरातील (NIO) सागरी जैवविविधता आणि जैव-रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दलच्या प्रशंसेची पावती आहे. त्यांच्या समग्र अभ्यासातून सागरी परिसंस्थेमधील जैव-भौतिक युग्मन, हवामान बदलानुसार अन्नसाखळीत होणारे बदल आणि कार्बन चक्र यांच्यातील गुंतागुंतीच्या आंतरक्रिया जगासमोर आल्या.
पर्यावरणशास्त्र आणि परिसंस्था कार्यप्रणाली, उत्पादकता आणि आहारशास्त्र, सागरी जैवविविधता-जैव-रसायनशास्त्र आणि हवामान बदल या विषयात, तज्ज्ञ असलेल्या डॉ. गौंस यांनी वैज्ञानिक समुदायात आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 100 हून अधिक शोधनिबंधांचे लेखन केले आ. हे तसेच त्यांनी 6 पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचे काम केले असून, सध्या 6 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत आहेत.
नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया (NASI) ही भारतातील तीन राष्ट्रीय विज्ञान प्रशिक्षण संस्थांपैकी एक असून या संस्थेला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून आर्थिक सहाय्य मिळत आहे. याव्यतिरिक्त, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागा अंतर्गत येणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेची मान्यता आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.