प्रपंचात मग गुंतता कामा नये याचा अर्थ त्याचा आपल्या मनावर परिणाम होता कामा नये. त्यामुळे आपले मन विचलित होता कामा नये. याचाच अर्थ त्यात आपण गुंतून पडता कामा नये. त्यात राहूनच आपणाला प्रगती साधायची आहे. मग मन कशात गुंतवायचे ?
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
जैसा शरत्कालु रिगे । आणि सरिता ओहटूं लागे ।
तैसे चित्त काढेल वेगें । प्रपंचिनि ।। 107 ।। अध्याय 12 वा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे शरद ऋतुचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी होऊ लागतें त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरुपांत तसतसा प्रवेश होईल तसतसे तुझें चित्त प्रपंचातून वेगाने निघेल.
विषयांत अरुची वाटायला हवी. अशी अवस्था कशी प्राप्त होते. ? विषयातून आपले मन कसे बाहेर काढायचे ? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. विषयांना टाळून किंवा जबरदस्तीने त्यांना दूर सारून ते तात्पुरते तुमच्यापासून दूर जातात. पण ते दूर जात नाहीत तर ते आपण जितके दूर गेलो तितके ते आपल्या जवळ आलेले असतात. विषय नेहमी मागे मागे येतच राहतात. त्याचा त्रास आपणाला होत राहातो. म्हणजे मनातून ते निघून जायला हवेत. यासाठी मन अन्य ठिकाणी रमवणे तितकेच गरजेचे आहे.
संगत कोणाची असावी ?
वातावरण बदल झाला की विचारही बदलतात. मनाची अवस्था बदलते. म्हणजेच विषय आपल्यातून निघून जाण्यासाठी आपण दुसऱ्या विषयात मन गुंतवायला हवे. दुसऱ्या वातावरणात आपण प्रवेश करायला हवा. यासाठी संत संगत सांगण्यात आली आहे. सद्विचार, मनात चांगले विचार निर्माण करायला हवेत. त्याची गोडी मनाला लावायला हवी. यासाठीच चांगल्या विचारांच्या संगतीत राहायला हवे. चांगल्यात आपण राहीलो तर आपले निश्चितच चांगले होते. चांगल्याची संगत कधीही चांगलीच होते. यासाठी संगत कोणाची करायची हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याचा आपल्या मनावर, विचारावर परिणाम होत असतो.
मन कशात गुंतवायचे ?
प्रपंचाला कंटाळून किंवा टाळून देऊन आपणास अध्यात्मिक प्रगती साधता येत नाही. प्रपंचाचा पूर्ण त्याग करणे सध्याच्या स्थितीत शक्य नाही. प्रपंचात राहूनच आपणाला अध्यात्मिक प्रगती साधायची आहे. यासाठी प्रपंचात मन न गुंतवता आपणाला प्रपंच करत आध्यात्मिक प्रगती करायची आहे. प्रपंचात मग गुंतता कामा नये याचा अर्थ त्याचा आपल्या मनावर परिणाम होता कामा नये. त्यामुळे आपले मन विचलित होता कामा नये. याचाच अर्थ त्यात आपण गुंतून पडता कामा नये. त्यात राहूनच आपणाला प्रगती साधायची आहे. मग मन कशात गुंतवायचे ?
असे आत्मसात करा विषयांना दूर न्यायचे तंत्र
भगवंताच्या नामस्मरणात मन जसे गुंतत जाईल तसे हळूहळू मन विषयापासून दूर जाते. प्रपंचापासून दूर जाते. प्रपंचातील विषय त्याला नकोशे वाटतात. तो प्रपंच करत असतो. पण प्रपंचाचा त्याला त्रास होत नाही. प्रपंचातील घडामोडींचा त्याच्या मनावर परिणाम होत नाही. मन जितके साधनेत गुंतेल तितका तो प्रपंचातील विषयांपासून दूर जातो. यासाठी मन साधनेवर केंद्रित करायला हवे. साधनेतून मन भगवंतामध्ये गुंतत गेले तर वाईट विषयांची बांधा होत नाही. ही प्रगती क्षणात होत नाही. हळुहळु होत असते. होत राहाते. यासाठी मनाला साधनेत हळूहळू गुंतवून विषयांना दूर न्यायचे तंत्र आत्मसात करायला हवे. म्हणजे आपली अध्यात्मिक प्रगती होईल. साधनेत मन गुंतवून मनात चांगले विचार आणण्याचा प्रयत्न केल्यास मन निश्चितच विषयांना विसरते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.