October 14, 2024
Beauty-of-Krishna-River-And-Ghat-Special-article-by-Ravindra-Salunkhe
Home » Privacy Policy » कृष्णे…ऽऽऽ !
मुक्त संवाद

कृष्णे…ऽऽऽ !

घाटाला त्याच्या रंग रूपासहित स्वत:चे म्हणून एक व्यक्‍तिमत्त्व असते. त्याची म्हणून एक भाषा असते. देहबोली असते. त्याचा स्वत:चा म्हणून एक विशिष्ट असा गंध असतो. भिलवडीच्या कृष्णेच्या तीरावरचा एैसपैस पण अत्यंत कमी पायऱ्यांचा दीर्घघाट आळसावलेल्या म्हातारी सारखा वाटतो. रांगत रांगत एखादे मूल सहजपणे आईच्या पदराखाली लपावे तसा हा घाट अलगद कृष्णेच्या प्रवाहात लपल्यागत वाटतो.

रमेश साळुंखे, मोबाईल 9403572527

कृष्णा आली स्वप्नात माझ्या. कितीतरी दिवसांनी. सायंकाळची वेळ. कृष्णेच्या घाटावर उभा आहे मी. लहानखुरा. पाचेक वर्षांचा असेन. पैलतीराच्या घाटावर जुनं देखणं दगडी मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यातील निरांजन तेवते आहे. गाभारा उजळून गेला आहे. एैलतीरावर मी. अवतीभवती माझ्या दहा बारा माणसांचा वावर. समोर कृष्णेचा वाहता खळाळ. शांत, नितळ, स्फटिकासारखं पारदर्शी पाणी. कृष्णा दुथडी भरून वाहते आहे. अनेकजण गुडघाभर पाण्यात उभे आहेत. थंड थंड पाण्याचा हबका चेहऱ्यावर मारताहेत. शांत होताहेत. निवलेल्या डोळ्यांनी कृष्णा न्याहाळताहेत. मीही या वातावरणात विरघळून जातो आहे. मीही गुडघाभर पाण्यात उभं राहून ओंजळी भररभरून पोटभर पाणी पितो आहे….

वेध सांगलीचे…

कृष्णेचे आणि माझे नाते तसे खूप जुने आहे. कोल्हापूरहून सांगलीला जाणे तसे आता पूर्वीसारखे होत नाही. मित्रांच्या आणि पाहुणेरावळ्यांच्याही गाठीभेटी प्रसंगोपातच होतायत. आई वडीलांना भेटून फार दिवस झाले; की मन उचल खाऊ लागते. सकाळी जाऊन सायंकाळी परतायच्या बोलीवर मग भल्यापहाटेच प्रवास सुरू होतो. पंचगंगेचा पूल ओलांडून पुढे आले की दोनएक फर्लांगावर उजवे वळण लागते. ते घेतले की सांगलीचा रस्ता सुरू होतो. पावसाळा असला; की प्रवास अधिकच सुखाचा. वर काळ्यानिळ्या ढगांची गर्दी गार गार वाऱ्याचे झोतच्या झोत, मधूनच झडणारी एखादी पावसाची सर, बाजूची हिरवी शेतं, गुऱ्हाळघरं, छोट्या मोठ्या टेकड्या हे सारे वैभव पाहात पाहात हातकणंगले, जयसिंगपूर कधी आले ते कळतच नाही.

जयसिंगपूर ओलांडले की मग सांगलीचे वेध लागतात. आठवणी घर करू लागतात. रेल्वेच्या बारक्‍या पुलाखालून बाहेर पडले की उजव्या हाताला पहिल्यांदा लागते ते स्मशान. बऱ्याचदा इथे तसा शुकशुकाटच असतो. आजकाल तशी घाई गडबड सर्वांनाच आहे; पण इथं कायमचा मुक्‍काम करायला कुणालाही घाई नाही. पळताहेत आपले बिचारे ? कुठे ते मात्र कुणालाच ठाऊक नाही. क्‍वचित एखादे प्रेत इथे जळत असते. तेव्हा माणसे आजूबाजूला वाट पहात गळ्यातला टॉवेल सांभाळीत उभी असलेली दिसतात. दबक्‍या आवाजात काही बोलत असलेलीही दिसतात. म्हातारी माणसं एक पाय दुमडून सिमेंटच्या बाकड्यावर खिन्नपणे बसलेली दिसतात. हे पाहिलं की मन उदास विषण्ण होऊन जातं.

अविरत वाहणारी कृष्णा…

तसेच पुढे आलो तर एक चढण लागते छोटीशी. ती चढून वर आलो; की आपण कृष्णेच्या पुलावर असतो. पहिल्यांदा दिसतं खूप भलं थोरलं आभाळ. ते निरभ्र असलं की निळ्याभोर आकाशात दूरवर पसरलेले असंख्य शूभ्र चंदेरी ढग त्यांच्यासारखेच मनाला हलकं हलकं करतात. मग नजर जाते; ती समोरच उभ्या ठाकलेल्या हिरव्यागार वडाच्या झाडाकडं. खूप जुनं असावं ते. चार सहा माणसांनी हातात हातात गुंफुन त्याला कवेत घेण्याचा प्रयत्न केला; तरीही ते बेटं सापडतं का नाही कुणास ठाऊक? मग नजरेच्या टप्यात कृष्णेचं पात्र येतं. शांत पण धिम्या गतीने अविरत वाहणारी कृष्णा. महाबळेश्वरात उगम पावलेली. वेण्णा, कोयना, पंचगंगा, भीमा व तुंगभद्रा या नद्यांना सामावून घेत आंध्र प्रदेशातील विजयवाड्याजवळ बंगालच्या उपसागरास मिळणारी कृष्णा.

आकाशाएवढं झाल्याचं समाधान

पुलावरून दिसणारी दोनही तीरांवरची हिरवी गर्दी. मळीची शेती. शेतातली झाडं. उजव्या हातालाही हे असच सारं पसरलेलं. यातच दोनही काठ सांधणारा रेल्वेचा चिंचोळा लांबलचक पूल. त्याच्या पायथ्यालाच झाडीत दडलेलं लहानसं रामलिंगाचं मंदिर. हे सारं एकत्रित होऊन मनाच्या आश्रयाला आलं; की अणुरेणू इतका छोट्या असलेल्या मला खरच आकाशाएवढं झाल्याचं समाधान गाठीला लागल्यासारखं होतं. शरीर नकळत खोलवर श्वास घेतं. वृत्ती पुलकित होतात; असं बऱ्याचदा वाचलेलं असतं. त्याची अनुभूती येऊ लागते. क्षणभर डोळे मिटतात. निवतात. मग नदीच्या पाण्यात डोळे काहीतरी शोधू लागतात. उजवा हात आपसूक छातीच्या मध्यावर स्थिरावतो आणि ओठांमधून अस्फूट शब्द बाहेर पडतात… कृष्णे…ऽऽऽ ! हे नेहमीचेच झाले आहे आता. कित्येकदा पापण्यांच्या पाणावलेल्या कडा तशाच ठेवून कृष्णेचा हा पूल ओलांडला आहे मी…. हे असे का होते; ते कळत नाही. साऱ्याच प्रश्‍नांना कायमच्या निजेचे पंख कुठे असतात? ते शोधण्याचा वेडा प्रयत्नही मी केव्हाच सोडून दिला आहे. एकदा सारेच स्वीकारायचे ठरवले; की मग निवांतपणाचे पाझर आपसुकच स्त्रवू लागतात.

पूर्वजांच्या कल्पकतेला दाद द्यायलाच हवी

नदीकाठचा घाट पाहिला की आखीव रेखीव दगडांची घनता आणि मृदृता अंगा अंगाला निवांत करते. हलकं हलकं, अलगत अलगत मोरपिसासारखं वाटतं. चित्तवृत्ती बहरून येतात. काळ आणि अवकाशाच्या सीमांचं बंधन गळून पडतं. नजर आसमंतात रेंगाळत राहते. घाट बांधणाऱ्यांच्या तन, मन आणि धनाविषयीची कृतज्ञता दाटून राहते. घाट बांधून या माणसांनी किती मोठा ऐवज आपल्यासाठी आंदण म्हणून ठेवला असल्याची भावना काही केल्या मनातून हटता हटत नाही. नदीकाठचे विस्तीर्ण दगडी घाट पाहिले; की पूर्वजांच्या कल्पकतेला, सौंदर्यात्मक दृष्टीला दाद द्यावी वाटते. “तहें दिलसें सलाम’ करावासा वाटतो.

कृष्णेचा घाट जिवलग मित्रच…

आजकाल असं वेडं धाडस केल्याचं उदाहरण अपवादानंच सापडतं. अजस्त्र यंत्रांचा नांगर किनाऱ्यावर फिरवून दगड, माती, मुरूम, सिमेंट आणि सळ्यांचा बिनदिक्कत वापर करून कॉक्रिटचा रूक्ष गिलावा करण्याचा घाट घाटावर घातला जातो. आणि कुरूप, बेगड्या वातावरणात निर्माण केलेल्या कृत्रीम सौंदर्यात माणसांना मश्‍गुल केलं जातं. आस्वादाचा गळा घोटला जातो. नदीच्या देखण्या काठाचा दिवसाढवळ्या अपमान केल्यासारखं वाटतं. विटंबनाच की ती एकप्रकारची ! भावनेची ओल, प्रेम, माया, ममता असले शब्द अशा वातावरणातल्या घाटावर नांदूच शकत नाहीत. केवळ सोय आणि अविचारी तडजोडीतून अशी सौंदर्यांच्या नरडीला नख लावणारीच कलाकृती जन्म घेणार. असे घाट दूरस्थ, परके आणि उपरे वाटू लागतात. दगडी बांधीव घाटांचं मात्र असं नसतं. ते केव्हाही कुणाहीसाठी जिवाभावाचं माणूस म्हणून तुम्हाला पाहताच हात पसरून कवेत घ्यायला आतूर झालेले असतात. ते आधार देतात, काळजातलं ऐकतात आणि सांगतातही. प्रसंगी भांडतातदेखील. पण मैत्र अखंड राखतात. कृष्णेचा घाट केव्हापासून हा असाच माझा सखा बनून राहिला आहे. जिवलगच आहे तो माझा !

घाटाची देहबोली…

घाटाला त्याच्या रंग रूपासहित स्वत:चे म्हणून एक व्यक्‍तिमत्त्व असते. त्याची म्हणून एक भाषा असते. देहबोली असते. त्याचा स्वत:चा म्हणून एक विशिष्ट असा गंध असतो. कोल्हापूरच्या पंचगंगेवरील आटोपशीर आणि मजबूत बांधणीचा घाट दिवसभराच्या उजेडात पिळदार रांगड्या पैलवानासारखा दिसतो. तर दिपोत्सवातील या घाटावरील लखलख सौंदर्य पडदा नशीन खानदानी स्त्रीच्या सौंदर्यासारखे झळाळून निघते. कित्येक दिवस ते नजरेसमोरून हलता हलत नाही. भिलवडीच्या कृष्णेच्या तीरावरचा एैसपैस पण अत्यंत कमी पायऱ्यांचा दीर्घघाट आळसावलेल्या म्हातारी सारखा वाटतो. रांगत रांगत एखादे मूल सहजपणे आईच्या पदराखाली लपावे तसा हा घाट अलगद कृष्णेच्या प्रवाहात लपल्यागत वाटतो. हा घाट राक्षसांनी एका रात्रीत बांधल्याची दंतकथाही अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते. अनेक जुन्या मंदिरांच्या आणि घाटाच्या निर्मितीच्या अशा कित्येक कुळकथा इथेतिथे विखरून पडलेल्या आहेत. या घाटापासून उत्तरेकडे तिथेच काहीसा पुढे असलेला; औदुंबराच्या दत्तासमोरील डोहावरचा तीव्र उताराचा घाट अवखळ व्रात्य मुलासारखा भासतो. या घाटावरून पलीकडच्या तीरावर नावेतून जावं आणि पांदीतली पायवाट पार करून भुवनेश्वरीत दाखल व्हावं; यातलं सुख तिथे गेल्याशिवाय कळणे तसे कठीणच. असाच एक देखणा घाट नरसोबाच्या वाडीत संगमावर आपली वाट पहात बसलेला दिसतो. दूरवरून पाहिलं; की संगमावरील हा घाट जणूकाही मस्तानीच्या आरस्पानी सौंदर्यवतीसारखा दिसू लागतो. या घाटावरून कृष्णा आपल्याला अगदी खेटून उभी असल्याची भावना जागवते. नाशिकच्या गोदावरीवरील लांबलचक पसरलेला देखणा घाट माणसाला नम्र आणि लीन बनवतो. घाटावर कुणी नसलं तर पावित्र्याच्या चारदोन गोष्टीही तो सांगतो.

हिरण्यकेशीचा घाट

कोल्हापूरहून बेळगावला निघालं की वाटेवर संकेश्वर नावाचं एक गाव लागतं. या गावाच्या पुढे थोड्याच अंतरावर हिरण्यकेशी दिसते. अंबोलीच्या घाटातून उगम पावलेली. या नदीतीरावरील घाटही चित्रातल्यासारखा सुरेख दिसतो. वॉटरकलर पेंटिंगच जणू. विस्तीर्ण पात्र नसलेली ही नदी, नदीवर बांधलेला घाट, घाटाचा सुंदर उतार, घाटावर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी आलेली तुरळक बायकामाणसं, घाटमाथ्यावर बांधलेलं दगडी देऊळ हे सारं नजरेत साठवता साठवता गाडी झरकन्‌ पुढे गेलेली असते. पण मनावर रेखाटलेल्या या दृश्‍यांचे रंग उतरता उतरत नाहीत. हे आणि असे कितीतरी प्रत्यक्ष पाहिलेले, अनुभवलेले घाट सदैव खुणावत राहतात. या साऱ्यांशीच मैत्र करावे. जिवाभावाचे काही सांगावे-बोलावे-ऐकावे असे सतत वाटत राहते. पण मनीचे व्यवहाराचे पाश झडता झडत नाहीत.

कृष्णेच्या घाटास पहिली भेट

कृष्णेच्या खूप साऱ्या आठवणी मनात तशाच वसती करून राहिलेल्या आहेत. कृष्णेला पहिल्यांदा केव्हा पाहिले मी ? नक्की नाही आठवत. पण सात दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यासाठी या घाटावर आल्याचे आठवते. लहानपणी वडरवाड्यात आम्ही सारेजण मिळून गणपती बसवत असू. रस्त्याच्याकडेला. बारक्‍या जागेत. दगड फोडणारी, गाढवांवर ओझी लादून मातीची वाहतूक करणारी, घरांचे बांधकाम करणारी, वेताच्या काठ्या सोलून टोपल्या बनवणारी अनेकजणं इथे घरं बांधून राहिलेली. त्यांच्या मुलांना गणपतीचे पाच-सात दिवस म्हणजे दिवाळीच की. ते दिवस मस्त मजेत जात. गणपतीच्या घराकरिता बांबू, फळ्या, पत्रे, खिळे, मोळे हे सारे अगदी फुकट मिळायचे. आई बाबा राबत असतील त्या कुणाच्याही बांधकामावर जायचे. घर मालकाला सांगून हवे ते बैलगाडीत किंवा ढकलगाडीत टाकायचे आणि सुखेनैव वडरवाड्यात आणायचे. या शेडमध्ये आमचा गणपती आरामात राहायचा आणि आमचा पाहुणचार आनंदाने घ्यायचा. आरती, प्रसाद, जिवंत देखावा, मिरवणूक प्रसंगी शाळा बुडवून आम्ही ही दिवाळी साजरी करत असू. एकदा कापसाचा डोंगर करून त्यावर गणपती बसवल्याचेही नीट आठवते आहे. कसे कुणास ठाऊक पण निरांजनाची आच लागून क्षणार्धात डोंगर जळून गेला आणि आमचा गोरागोमटा बिचारा गणपती पुढील तीन दिवस कृष्णमुखी होऊन बसला. पण गणपती दुखावला गेला; विटंबना झाली त्याची. असे म्हणून आम्हा मुलांना कुणी हटकले नाही; की रागावले नाही. “झाकुन ठेवून कोणाला न सांगता सवरता याला पाण्यात विसर्जित करा.’ असा अनाहूत सल्लाही कुणी दिल्याचे आठवत नाही. मला वाटते याच गणपतीला विसर्जित करण्यासाठी म्हणून कृष्णेच्या माईघाटावर मी पहिल्यांदा आलो असेन. कुणा एकाकडून मागून आणलेल्या ढकलगाडीला झेंडुच्या फुलांची आरास आणि बाबांनी कापून दिलेल्या नक्षीदार पताका डकवून बाप्पाच्या नावाचा जयजयकार करत आम्ही धडपडणारी मुले कृष्णेच्या घाटावर पोहोचलो; तेव्हा रात्र झाली होती. पाणी बेताचेच होते. पूर ओसरून गेल्याच्या खुणा घाटाच्या दोनही बाजूला दिसत होत्या. घाटाच्या पायऱ्यांवर गाळाच्या मातीचा चिखल पसरलेला होता. त्यातूनच येरझार करत माणसांनी पायवाट काढलेली. घाटावरील कृष्णाच्या मंदिरापासून पाण्यापर्यंत पसरलेल्या वीसएक पायऱ्या असाव्यात. त्या उतरून खाली गेलं की थेट कृष्णेच्या गढूळलेल्या पाण्याचा थंडगार वाहता स्पर्श. पायापासून मेंदूपर्यंत सरसरत वर चढत जाणारा निनावी गारवा. तेव्हा घाट बायका माणसांनी, लहान मुलांनी नुसता फुलून गेलेला होता. घाटावरून वाहती कृष्णा देखणी दिसत होती. पैलतीरावर भलेमोठे विजेचे दिवे लावलेले. त्याचा प्रकाश वाहत्या पाण्यावर पसरलेला. दोनही तीरांवरील घाटावर अनेक गणपती विसर्जित होत होते. काही गणपती नावेतून पात्राच्या मध्यावर जाऊन कृष्णेशी एकरूप होत होते. माणसांच्या येरझारीमुळे घाट ओलाकंच झालेला. क्‍वचित निसरडा. जपून चालावं लागायचं. बाप्पाला विसर्जित करून बायाबापडे, लहानगी मुले प्रसाद म्हणून चिरमुरे खोबरे वाटत परतत होती. आम्हीही आमच्या कृष्णवर्णीय बाप्पाला कृष्णेच्या स्वाधीन केले होते. याआधी कधी कृष्णेला पाहिल्याचे आठवत नाही. पण हा दिवस मात्र लख्ख आठवतो आहे.

कृष्णेचा पूर…

आषाढात ही अशी कृष्णा मनमोकळी होते. बेभान होऊन वाहत राहते. अगदी काठालगतची एैलतीरावरील लहान मोठी मंदिरं पूर ओसरेपर्यंत पाण्याखाली जातात. पैलतीरावरील घाटाच्या मध्यावर बांधलेले देऊळही पाण्याखालीच असते कित्येक दिवस. पूर ओसरू लागला; कि कळस आणि कळसाखालचा भला थोरला दगडी रायआवळा दिसू लागतो. मग टप्याटप्याने अखंड देऊळ. काही दिवसांनी पुन्हा घाटावर जाऊन पाहिले; तर पुराच्या पाण्याच्या खुणा सर्वत्र विखरून पडलेल्या दिसतात. एकप्रकारचं प्रसन्न रितेपण भरून पावलेलं जाणवत राहतं. काठावर अथवा पुलावर उभे राहिलो; की सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागते. पुलाच्या भव्यतेलाही तिने सामावून घेतलेले असते. ब्रिटिशकालीन वास्तूचा उत्कृष्ट नमूना असलेला पूल मग कृष्णेपुढे लहानगा दिसू लागतो. तीरावरील प्रचंड झाडंही पाण्याखाली समाधीस्थ होतात. काहीचे केवळ शेंडेच पाण्यावर प्रवाहाबरोबर डोलताना दिसतात. हवेत मस्त गारवा पसरून राहिलेला असतो. पाऊस थांबलेला असला आणि ढगांचीही पांगापांग झालेली असली; तर अवचित सोनेरी उन पडतं आणि कृष्णेचं पाणी झळाळून उठतं. पुराची भव्यता अधिकच जाणवू लागते. पुलाचे भव्य दगडी खांब पाण्याखाली जातात. पाणी आणि पुलावरील दोनही काठ जोडणारा रस्ता यादोहोंमध्ये पुलाच्या महिरपीखाली काही मचाण बांधलेले आहेत. तिथे जाण्यासाठी पुलाच्या रस्त्यावरून खाली आठ-दहा पायऱ्या उतरल्या की या मचाणावर जाता येते. तिथे उभे राहिले की, पुलाच्या भव्य कमानी आणि त्या कमानी खालून वेगाने वाहणारी कृष्णा आपल्या अवघ्या दोन हात अंतरावर वाहताना दिसते. एका बाजूला असते विलक्षण भय आणि तितकेच विलक्षण आकर्षण. जगणं मरणं एका श्‍वासाचं अंतर म्हणजे काय याची साक्षात प्रचितीच येते इथे. चिमण्यांच्या, कबुतरांच्या आणि हिरव्यागार पोपटांच्या कितीतरी पिढ्यांना आश्रय दिला आहे या पुलानं.

पुलाच्या दंतकथा

इतर अनेक पुलांप्रमाणंच या पुलाभोवतीही दंतकथा वेढून बसल्या आहेत. रात्रीची जेवणं झाली साऱ्यांची; की दिव्याच्या हलत्या प्रकाशात आजी पुलाच्या संदर्भातील एक ऐकीव गोष्ट सांगायची. पुलाच्या पायाचे बांधकाम चालू असताना म्हणे तिथे एका गर्भवती स्त्रीला जिवंत गाढलेले आहे. अजूनही अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री पुलाच्या पायथ्याशी तान्हुल्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. अंधारात ऐकलेल्या या गोष्टीने कितीतरी दिवस मला अस्वस्थ केलेले होते. घाटावर गेलो; की माझे डोळे अजूनही पुलाच्या कोणत्या खांबात त्या मातेला पुरले असेल याचा शोध घेत राहतात. या अशा कथा इतरही पुलांच्या संदर्भात मी ऐकलेल्या आहेत. या साऱ्याला तसा काहीच अर्थ नसतो; हे ठाऊक असूनही आता त्या स्त्रीची आणि त्या नवजात अर्भकाची भीती नाही वाटत. ती माऊली बोललीच माझ्याशी तर दोनचार शब्द बोलेनही मी तिच्याशी. विश्वासाने तिने तिचे मूल माझ्या ओंजळीत दिलच; तर त्याला जवळ घेऊन थोपटेनही कदाचित.

घाटाने खूप काही शिकवले

या घाटाने खूप काही पहायला आणि सहायलाही शिकविले आहे मला. घाटावरल्या पुराच्या पाण्याची दहशत आणि आकर्षण ही नित्याचीच बाब बनली आहे. रात्र असली आणि आजूबाजूला फारशी वर्दळ नसली तर वाहत्या पाण्याचा गंभीर नाद ऐकताना भीती वाटते. पाण्यातील भोवरे अंगांगावर शहारे आणतात. पट्टीचे पोहणारे या अशा पाण्यातही झोकून देतात स्वत:ला. पुलावरून नदीत टाकलेले नारळ मोठ्या शिताफीने घाटावर आणले जातात. असे जिवावर उदार होऊन नदीच्या प्रवाहात सापडलेले नारळ विकणारे आणि काठावर बसून गळ टाकून मासे पकडणारे अनेकजण दिवसभराच्या पोटापाण्याचा प्रश्‍न सहज मिटवतात.

आठवणीतील पुर

मला पोहायला येत नव्हते; तेव्हाची गोष्ट. सावित्री – बहीण माझी. तिसरी चौथीला असेल जेमतेम. तिला कृष्णेचा पूर पहायचा होता. सायंकाळ होत आलेली. बाबांची सायकल घेतली. आणि तिला घेऊन थेट कृष्णेच्या घाटावर. घाट पुरता पाण्याखाली गेलेला. पाणी घाटाच्या पायऱ्या जिथून सुरू होतात तिथे बांधलेल्या कृष्ण मंदिरापर्यंत आलेले. बाजूलाच एक भला थोरला चौकोनी दगडी पार. पुरूषभर उंचीचा आणि तितकाच लांब व रूंद. पाण्यात पूर्ण बुडून गेलेला. पुराचे पाणी दगडी पाराशी समांतर आलेले. पायाचे तळवे ओले होतील इतके पाणी पारावर आलेले. माणसांची गर्दी तशी तुरळकच. सावित्रीला पाण्यात पाय बुडवायचे होते. दगडी पार तसाच पुढे पसरलेला असावा या अंदाजाने तिचा एक हात हातात धरून मीच तिला किंचित पुढे ढककले. आणि काही कळायच्या आतच सावित्री पाण्यात दिसेनाशी झाली. पुरूषभर पाण्यात ती आणि तिचा एक हात माझ्या हातात मी गच्च पकडलेला. क्षणभर काहीच सुचले नाही. मग मीही तिचा हात हातात तसाच पकडून थेट पारावरून पाण्यात. तिला वर उचलून धरले; कुणीतरी धावत येऊन तिला पाण्यातून ओढून पारावर ठेवले. आणि नंतर मलाही. प्रचंड घाबरलेलो आम्ही दोघेही. ओलेकंच. ती भ्यायलेली प्रंचड. थंडीने थरथरू लागलेली आणि मी घरात गेल्यानंतर प्रसाद म्हणून मिळणाऱ्या रट्टयांकरिता धीर एकवटण्याच्या प्रयत्नात. अस्मादिकांचा हा पराक्रम घरात सांगणे शक्‍यच नव्हते. रट्टे मिळाले नाहीत कारण सावित्रीही काही बोलली नसावी. तिला गरमागरम भजीचे आमीश तर दाखविले होते मी. मग बोलण्याचा प्रश्‍नच कुठे येतो? बोलली असती ती; तर रट्यांमध्ये तिलाही भागीदार व्हावे लागले असतेच की !

सर्वांना कवेत घेणारा घाट

घाटावरल्या राधाकृष्णाच्या मंदिरात दररोज आरती होत असे. आरतीच्या घंटेचा, टाळांचा आवाज घाटावरच्या शांततेत मनावर प्रसन्नतेचा गोड शिडकावा पसरायचा. आरतीचे शब्द कानी यायचे नाहीत; पण वाद्यांचा कल्लोळ गात्रं शिथील करायचा. अशाच एका सायंकाळी आरती सुरू होती. आम्ही नेहमीप्रमाचे घाटावर पाण्यात पाय सोडून बसलेलो. बोटभर लांबीच्या माशांचा पायांना हुळहुळता स्पर्श. एखादा साधू, भिकारी संथ पावलं टाकत घाटावर यायचा. बोचकं बाजूला ठेऊन कमरेएवढ्या पाण्यात उतरायचा. दोनचार डुबक्‍या मारल्या की परत दोनतीन पायऱ्या चढून वर यायचा; अंग कोरडं करायचा. हात जोडून कृष्णेकडे पाहत काहीतरी पुटपुटायचा. कपडे चढवून आला तसाच शांतपणे निघून जायचा. कपडे धुण्यासाठी आलेल्या बायाबापड्या एकमेकींना मनातलं हितगूज सांगायच्या. त्यांच्या मनगटावरील भरलेल्या बांगड्यांची किणकिण खूप छान आवाजात बोलायची. गाईगुरं पाण्यावर यायची. तर अशी ही हूरहूर लावणारी संध्याकाळ होती.

मित्रमंडळींची हक्‍काची जागा

संध्याकाळ होऊ लागली की पक्षांचे थवेच्या थवे घरट्याकडे परतू लागत; आणि आम्ही मित्र आमची घरटी सोडून बाहेर पडत असू. कृष्णेचा घाट हा आमच्या समग्र मित्रमंडळींची हक्‍काची जागा होती. साऱ्यांनीच आपापले खिसे झाडून काढले की पंधरा ते वीस रूपये कसेबसे जमा व्हायचे. मग चिरमुऱ्याच्या दुकानातून चिरमुरे, भाजलेले खारे – गोडे शेंगदाणे, भंडग असा सुकामेवा यायचा भरपूर. घाटावरल्या दगडांवर हा सगळा बत्ता एकत्र केला जायचा. कोंडाळ्याच्या मधोमध हा ऐवज ठेवून तोबरे भरले जायचे. गप्पांना-टिंगळटवाळ्यांना उत यायचा. मनं मोकळी व्हायची आणि पोटं भरलेली. घाट सामसूम व्हायला लागायचा. अंधार पसरू लागला की आम्ही परत आपापल्या घरट्याकडे.

ती पिंड आजही आमच्या सोबत

एकदा मी आणि युवराज असेच सायंकाळी परतत होतो घाटावरून. वाहून आलेल्या, सोडून दिलेल्या, टाकून दिलेल्या कितीतरी वस्तू कुणीतरी भावीक एकत्रित करायचा आणि घाटावर विटंबना होणार नाही; अशा बेताने काळजीपूर्वक ठेऊन द्यायचा. एकदा दोनएक वीतभरेल; अशी एक अतिशय देखणी दगडी पिंड कुणीतरी घाटावर आणून ठेवलेली होती. काळ्या रंगातील डमरूच्या आकारातील चकचकीत पॉलिश केलेली पिंड पाहून आम्हाला ती ओलांडून पुढे जाताच येईना. डमरूच्या मध्यावर एका सर्पाने वेटोळा घालून आपल्या मस्तकावर पिंडीच्या शाळुंकेला तोलून धरलेले होते. शाळुंकेवर चारसहा ठिकाणी बाजरीएवढ्या आकाराचे टवके निघालेले होते. पंचामृताचा अभिषेक करून तो तसाच ठेवून दिल्यामुळे हे असे झाले असावे. पण भंगल्याच्या भीतीने कुणीतरी या पिंडीला हा असा घाट दाखविला असावा. घाटावर येताना आम्ही दोघेच दुचाकीवरून आलेलो होतो. जाताना मात्र दोघांच्या मध्ये मोठ्या दिमाखात ही पिंड आमच्या सोबतच घरी आली. सांगलीतल्या घरी कितीतरी दिवस ती सुखेनैव राहिली. मग निपाणी आणि आता कोल्हापूरातील माझ्या घरासमोरील बागेत कमळाच्या कुंडीत दररोज उमलणाऱ्या लाल, निळ्या, पांढऱ्या, गुलाबी कमळांसोबत ऐटीत ती उभी राहिली आहे. आता तिची सोबत करतो आहे नाशिकच्या कुंभमेळ्यात गोदावरीच्या घाटावर दिसलेला दगडी नंदी. कोण कोणाला कसे आणि कुठे भेटेल; खरच नेम नाही.

कृष्णा आता थकलेली वाटते !

आता कृष्णाही थकलेली दिसते आहे मला. पुलालाही आता नटवून सजवून उभे केले गेले आहे. पण वृद्धत्त्वाच्या खुणा झाकल्या जात नाहीत. आता हा पूल पाहताना ग्रेसांच्या कवितेतील ओळी फेर धरू लागतात. “सुन्न देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे पराभवाच्या पर्वामध्ये जसे उजळती राजे’ हा असा उजळणाऱ्या राजाचा उत्तररंग पाहून जिवाची कालवाकालव होते. उजव्या बाजूच्या पात्राकडे जरा दूरवर पाहिलं; की ताठ उभा असलेला पण सौंदर्यहीन, शुष्क नवा पूल दिसतो आहे. नाल्यातल्या काळ्याशार पाण्याने कृष्णेचे आणि तिच्या आधाराने राहणाऱ्यांचे जगणेच हतबल करून टाकले आहे. कृष्णेला ओंजळीत घ्यायचे तर सोडूनच दिले आहे केव्हापासून; पण पाय पाण्यात सोडून निष्काळजीपणे बसण्याचीही भीती वाटते. वाऱ्यासोबत वाहत आलेल्या पाण्याचा आणि पाण्यावर मरून पडलेल्या माशांचा दर्प हैराण करतो.

जिवाभावाचं – रक्‍ताचं कायमचं दुरावतयं

पोर्णिमेच्या चंद्राचा आणि शारदीय नक्षत्रांचा उत्सवातील खेळ आता रंगता रंगत नाही. चिमण्यांच्या कलकलाटाला पोरकेपण येतं गेलं आहे. कावळयांची शाळा आता कुठे भरते ठाऊक नाही; आणि पोपटांचे-कबुतरांचे थवे कुण्यादेशी निघून गेल्याचीही गंधवार्ता नाही. पाण्यावर हमखास येणारी गाईगुरं गळ्यातल्या किणकिणत्या घंटांचा गांधार घेऊन केव्हाच कुठेतरी निघून गेलेली आहेत. किती, काय आणि कसे सांगावे?… उदास नजर दूरवर फिरून तशीच माघारी फिरते. काहीच सापडत नाही. एव्हाना रात्र झालेली असते. रस्त्यावरच्या लाईट्‌सही केव्हाच गुल झालेल्या असतात. घाटावरच्या कृष्ण मंदिरालाही भल्या थोरल्या लोखंडी साखळीचं कुलूप लागलेलं असतं. मी वळून पाहतो; कृष्णा थकल्या भागल्यासारखी वाहत असते. जिवाभावाचं – रक्‍ताचं कायमचं दुरावत असल्याची चिरवेदना सावरत मी कृष्णेला पाठमोरा होतो.
कृष्णा आली स्वप्नात माझ्या. कृष्णेच्या घाटावर उभा आहे मी…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading