रस्त्यावरच्या फकिराच्या सुरातले गीत ‘खयाल कोई बुरा अब दिल से निकाला जाये’ हा हबीब भंडारे यांच्या काव्याशयाचा गाभा आहे. वेदनांच्या दाहक झळांना सामोरे जाण्याचे प्राक्तन कवीच्या वाट्याला आलेले आहे. परिणामी दुःखाच्या खोल गहिरेपणाची जाणीव येथे तीव्रतेने नोंदवली जाते.
डॉ. सतीश बडवे, औरंगाबाद.
ख्यातनाम समीक्षक व लेखक
“जगण्यातले सत्व शोधण्याची भूमिका आणि माणुसकीवरचा अढळ विश्वास प्रकट करणारी भावना, ताकदीने व्यक्त करण्याचे सामर्थ्य हबीब भंडारे यांच्या शब्दकळेत आहे. मनातील श्रद्धा जिवंत ठेवणारी, सामान्य श्रमिकांच्या मनाचे आशयगर्भ चिंतन मांडणारी, विषमतेचा स्पष्टोच्चार करणारी आणि नैतिकतेच्या बळावर विश्वास ठेवणारी ही कविता आहे. कष्टाच्या दैनंदिनीसारखे स्वरूप असलेल्या त्यांच्या कवितेत मेहनती व कष्टकरी व्यक्तिचित्रांचे एक जग ताकदीने उभे करण्याचा जाणता प्रयत्न आहे. दमलेली, थकलेली, इमानदारी जपणारी आणि अभावग्रस्त असूनही माणूसपणावर विश्वास असणारी ही माणसं आहेत. या समदु:खी लोकांचा आशावाद या कवितेतून उजागर होतो. टोकदार भावनांच्या हिंदोळ्यावर हिंदकळणारी भिन्न धर्मीय सामान्य माणसं आणि त्यांचं मजबूर जगणं या कवितेच्या केंद्रस्थानी आणण्याची प्रामाणिक व नैतिक भूमिका या कवितेत वारंवार डोकावते आणि त्यांच्या मनाची घालमेल संयतपणे अभिव्यक्त होते.
रस्त्यावरच्या फकिराच्या सुरातले गीत ‘खयाल कोई बुरा अब दिल से निकाला जाये’ हा हबीब भंडारे यांच्या काव्याशयाचा गाभा आहे. वेदनांच्या दाहक झळांना सामोरे जाण्याचे प्राक्तन कवीच्या वाट्याला आलेले आहे. परिणामी दुःखाच्या खोल गहिरेपणाची जाणीव येथे तीव्रतेने नोंदवली जाते. निसर्ग, शेती, पाखरे, प्राणी आणि श्रमिकांचे भौतिक विश्व कवितेतून साकारताना वर्तमानातल्या कोलाहलाला हबीब भंडारे प्रभावीपणे व्यक्त करतात. साहजिकच तीक्ष्ण पण प्रवाही शैली आणि तजेलदार पण चिंतनशील अभिव्यक्तीची असंख्य रूपं, या कवितेचे बलस्थान ठरते. मायबापांचे कष्टाचे धागे आणि भोवतालचे वाईट अनुभव यातून भेदक व प्रखर वास्तवाचे दर्शन घडविण्यात कवीला कमालीची यशस्विता लाभते, हे खात्रीने सांगता येते.”
पुस्तकाचे नाव – अस्वस्थ एकांत
कवी – हबीब भंडारे – मोबाईल -7507328383
प्रकाशक – डॉ. दादा गोरे, गोदा प्रकाशन, औरंगाबाद: 9422206820
किंमत – 200 रुपये